मुंबई: नव्या वर्षाच्या स्वागताची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. अनेकांनी नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी ही केली असेल. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. अन्यथा कोरोना संसर्ग अधिक वाढण्याची भीती ही व्यक्त होत आहे. मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे, दैनंदिन वेळापत्रकानुसार जगण्याची शिस्त तसेच एकमेकांपासून अंतर राखण्याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.
यावर्षी नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला नेहमीसारखी गजबज आणि झगमगाट असणार नाही. कोविड-19 च्या नव्या लाटेला रोखण्यासाठी सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशाच्या विविध भागांमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी पाळली जाईल. तेव्हा सर्वानीच सणासुदीचा हा काळ घरच्या घरीच साजरा करणे योग्य ठरेल. अगदी जवळच्या आप्तेष्टांबरोबर घरातच छोटेसे गेट टूगेदर करण्याचा विचार असेल तर तर सुरक्षेच्या दृष्टीने सारे काही नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे कल्याण येथील फोर्टिस हॉस्पिटलचे चीफ इन्टेन्सिव्हिस्ट डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले आहे.
मास्क घालूनच राहणे उत्तम
आपल्या छोट्या घरातच सेलिब्रेशनसाठी एकत्र जमणार असला तर हे धोक्याचे ठरू शकते. अशावेळी मास्क लावल्यामुळे एकत्र धोका काही प्रमाणात कमी व्हायला नक्कीच मदत होईल, पण लहानशा जागेत अनेक तासांसाठी एकत्र घालविणे जोखमीचे ठरू शकेल. तेव्हा या भेटीगाठींसाठी एखादी प्रशस्त, हवा खेळती असणारी जागा निवडण्याची काळजी घ्या. एकमेकांपासून योग्य अंतर राखणे हाच सुरक्षित राहण्यासाठीचा एकमेव मूलमंत्र आहे.
आपली सुरक्षितता आपल्या हाती, हॅण्ड सॅनिटायझर हाताशी ठेवा
हॅण्ड सॅनिटायझर तसेच साबण, पाणी, पेपर टॉवेल्स, टिश्यूज, डिसइन्फेक्टन्ट वाइप्स, नो-टच/ पायांनी उघडबंद करता येण्याजोगे ट्रश कॅन्स (झाकण असलेले अधिक चांगले) अशा सर्व गोष्टींचा पुरेसा साठा करून ठेवा. यामुळे पार्टीमध्ये स्वच्छता आणि सुरक्षितता बाळगण्यास मदत होईल. घराच्या विविध कोपऱ्यांमध्ये सॅनिटायझरच्या बाटल्या पटकन हाताशी मिळतील अशाप्रकारे ठेवून द्या, म्हणजे पाहुण्यांना गरज भासल्यास त्या चटकन सापडू शकतील.
गाण्यांचा आवाज कमी ठेवा
मोठ्या आवाजात संगीत सुरू असले तर माणसांना एकमेकांशी मोठमोठ्याने बोलणे भाग पडते. अवतीभोवती आवाजाचा गोंधळ असेल तर लोक अधिक जोरात बोलतात. म्हणजे थुंकी आणि तृषार हवेमध्ये मिसळण्याची शक्यता असते. त्यातून संसर्ग अधिक पसरण्याची भीती आहे.
खानपानासाठी वस्तूंचे स्वतंत्र संच ठेवा
संशोधकांनी ही साथ पसरण्यासाठी अन्नपदार्थांना कुठेही दोषी धरलेले नाही, तरीही बुफे किंवा कॉकटेल्सभोवती एकत्र जमा झाल्याने विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते. एकदाच वापरून फेकून द्यायच्या डिस्पोझेबल प्लेट्स आणि ग्लासेस वापरा. प्रत्येक पाहुण्यासाठी या वस्तूंचा स्वतंत्र संच ठेवा म्हणजे कोणाशीही प्रत्यक्ष संपर्क येण्याची शक्यता कमी होईल.
टच मी नॉट
कोणत्याही पृष्ठभागावर विषाणूचे अस्तित्व असू शकते ही गोष्ट वारंवार सिद्ध झालेली आहे. त्यामुळे पार्टीची जागा सॅनिटाइझ करा आणि तिथे स्वच्छता राखा. पाहुण्यांकडून सामायिकपणे वापरण्यात येणाऱ्या वस्तूंवर डिसइन्फेक्टन्ट स्प्रे मारून त्यांना निर्जंतुक करा. गेट टूगेदरचे नियोजन करताना रेस्टरूम्सची स्वच्छता अत्यंत काटेकोरपणे पाळली जायला हवी.
ताटात काय असणार त्याकडे लक्ष द्या
पार्टीसाठीच्या मेन्यूमध्ये आरोग्यासाठी पुरक असेच पदार्थ असायला हवेत आणि त्यातून रोगप्रतिकारशक्ती वाढायला हवी. एकदाच वाढण्याची गरज भासेल असे, चविष्ट तरीही आरोग्यकारक असे पदार्थ निवडा. एकमेकांच्या ताटातल्या पदार्थांची देवघेव करू नका. रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी पेये हा चांगला पर्याय ठरू शकेल आणि तुमचे पाहुणेही त्यांचा मनापासून आस्वाद घेऊ शकतील.
व्हर्च्युअल पार्टीचा पर्याय सर्वात उत्तम
या पॅनडेमिकमध्ये प्रत्येकाने डिजिटल बदलांशी स्वत:ला जुळवून घेतले आहे. दूर राहत असलेल्या मित्रमंडळीसाठी व्हर्च्युअल पार्टी हा चांगला पर्याय ठरू शकेल. शिवाय अशा पार्टीमध्ये मोजक्याच माणसांना बोलवायचे बंधन असणार नाही. तुम्ही घरच्या घरीच राहून 2020 ला अलविदा म्हणू शकाल. घरामध्ये लहानसे गेट टूगेदर करण्याचे तुम्ही ठरवलेच असेल तर कमीत-कमी लोकांना बोलावण्याची काळजी घ्या. अशाप्रकारे तुम्ही स्वत:ची आणि आपल्या आप्तेष्टांची सुरक्षितता जपू शकाल.
--------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
New Year 2021 Planning a New Year party then take care
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.