नवी मुंबई : ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून बायोमिथेन गॅस तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. तुर्भे कचराभूमीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पातून तयार होणारा गॅस एनएमएमटीच्या बस चालवण्यासाठी वापरला जाणार आहे. महापालिकेच्या या प्रकल्पामुळे शहरातील ओल्या कचऱ्याचा प्रश्न मिटणार असून, एनएमएमटीच्या इंधनवर होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे.
नवी मुंबई शहरातून दैनंदिन तब्बल 800 मेट्रिक टन कचरा तुर्भेच्या कचराभूमीवर गोळा होतो. या कचऱ्यातून प्लास्टिक, सॅनेटरी नॅपकिन, पॅड, थर्माकोल आदी कचरा वर्गीकरण केल्यावर सुमारे 300 ते 350 टन ओला कचरा शिल्लक राहतो. वर्गीकरणानंतर शिल्लक राहिलेल्या या कचऱ्यावर नंतर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाते. परंतु ओल्या कचऱ्यातील काही वस्तूंना पूर्णपणे नष्ट होण्यास बराच कालावधी लागत असल्यामुळे सध्या तुर्भेच्या जागावर कचऱ्याचा भलामोठा डोंगर उभा राहत आहे. हा कचरा सडण्याच्या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात मिथेन वायूची निर्मिती होते. याचा वापर वीजनिर्मिती; तसेच वाहन चालवण्यासाठी केला जाऊ शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा वायू असाच हवेत वाया जात आहे. परंतु आता या वायूचा वीजनिर्मितीसोबतच एनएमएमटीच्या बस चालवण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो, असा अभिप्राय असणारा प्रस्ताव अभियांत्रिकी विभागाने तयार केला आहे. तुर्भे क्षेपणभूमी येथील कार्यरत असलेला पाचवा विभाग बंद केला जाणार आहे. त्यामुळे आता सहावा विभाग विकसित केल्यावर यातील दैनंदिन नागरी घनकचऱ्याची शास्त्रोक्तरीत्या विल्हेवाट लावण्यात येणार आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमिथनायझेशन प्रकल्प उभारणे प्रस्तावित केले आहे. या प्रकल्पातून तयार होणारा मिथेन गॅसवर एनएमएमटीच्या चालवण्याचे पालिकेच्या विचाराधीन आहे.
एनएमएमटीला फायदा
तुर्भे कचराभूमीवर बायोमिथेन तयार करणारे दोन प्रकल्प तयार केले जाणार आहेत. 40 मेट्रिक टनाचा एक प्रकल्प असे दोन प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पातून एनएमएमटीच्या दिवसभरातील 20 बस सलग आठ तास असे अनुक्रमे दोन प्रकल्पातून 40 बस 8 तास चालतील एवढा मिथेन वायूची निर्मिती होणार आहे. या बायोमिथेनमुळे महापालिकेची इंधनावरील खर्चात बचत होईल.
बायोमिथेन तयार करणाऱ्या दोन प्रकल्पांचा प्रस्ताव आम्ही तयार केला आहे. मात्र, अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर पूढील प्रक्रिया सुरू होईल. या प्रकल्पामुळे शहरातील ओल्या कचऱ्याचा प्रश्न कायमचा निकालात निघेल. कारण कचऱ्यामुळे सध्या शहरात हळूहळू जागेची कमतरता भासू लागली आहे.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.