मुंबई : मुंबईतील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन खासगी प्रयोगशाळांनी केलेल्या सर्वेक्षणातून महत्वाची माहिती पुढे आली आहे. या खासगी प्रयोगशाळांनी 9590 लोकांचे नमुने चाचण्यांसाठी जमा केले होते. त्यात नोकरदार, व्यापारी, सलून कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांचा समावेश केला होता. मुंबईत थायरोकेयर या प्रयोगशाळेने 5,485 लोकांची तपासणी केली, तर उपनगरीय डायग्नोस्टिक्स प्रयोगशाळेमध्ये 4,105 लोकांची तपासणी करण्यात आली.
मुंबईतील दोन खासगी प्रयोगशाळांनी केलेल्या एका सर्व्हेनुसार, 24 टक्के लोकांच्या शरीरात कोरोना विरोधातील अँटीबॉडीज तयार झालेल्या आढळल्या आहेत. या खासगी प्रयोगशाळांनी 9590 लोकांचे नमुने चाचण्यांसाठी जमा केले होते. त्यातील 24.3 टक्के लोकांमध्ये कोव्हिड-19 च्या अँटीबॉडीज आढळल्या. याचा अर्थ असा की मुंबईतील एक चतुर्थांश लोकांचा कोरोनासोबत सामना झाला असून कोरोना व्हायरस विरोधात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत.
ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईपेक्षा दिल्लीत कोरोनाव्हायरसचा जास्त धोका आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) आणि थायरोकेयरने यांनी एकत्रित केलेल्या सेरो सर्वेक्षण चाचणीतूनही 25.10 टक्के लोक पॉझिटीव्ह दर्शवले आहे. एनसीडीसीने दिल्लीच्या 11 जिल्ह्यांमधील 21,387 लोकांवर आयजीजी अँटीबॉडी चाचणी केली आणि सुमारे 5,022 पॉझिटिव्ह (23.48 टक्के) आढळले. थायरोकेअर खासगी प्रयोगशाळेने 3,956 लोकांची चाचणी घेतली आणि 1,340 (33.8 टक्के) लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या. त्यामुळे कोरोनाव्हायरसच्या संपर्कात असलेल्या अनेक लोकांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती आणि त्यांना रोग प्रतिकारशक्तीही मिळाली आहे, असे सायन रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्र प्रमुख डॉ. सुजाता बावेजा यांनी सांगितले.
आयजीजी अँटीबॉडी चाचणीद्वारे एखाद्या संसर्गाविरूद्ध एखाद्या व्यक्तीने अँटीबॉडीज विकसित केले आहेत की नाही आणि त्यामध्ये प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे की नाही हे तपासले जाते. कोव्हिड रूग्णाला विषाणूविरूद्ध अँटीबॉडी विकसित होण्यास दोन आठवडे लागतात. फक्त संसर्गाच्या पातळीचे मूल्यांकन करण्यासाठीच ही चाचणी साधन म्हणून वापरली जाते. निदानासाठी या चाचणीचा वापर केला जात नाही. निदानासाठी आरटी-पीसीआर (रिअल टाइम पॉलिमरेज चेन रिअॅक्शन) या चाचणीचा मानक म्हणून वापर केला जातो. ही चाचणी स्वॅबमध्ये व्हायरस शोधते.
आरटी-पीसीआर चाचणीद्वारे मुंबईत पॉझिटीव्ह रुग्ण आढळण्याचा दर 23.3 टक्के आहे, तर अँटीबॉडीजनुसार पॉझिटीव्ह येणाऱ्यांची संख्या 24.3 टक्के आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. आणखी बरेच लोक या विषाणूच्या संपर्कात आले आहेत. परंतु त्यांना लक्षणे कधीच विकसित झाली नाहीत आणि बरेही झाले आहेत. अँटीबॉडी पॉझिटिव्हिटी रेटनुसार, मोठ्या प्रमाणात लोक संक्रमित झाले आहेत. मात्र, त्यांना कोणतीही लक्षणे उद्भवली नाहीत, असे थायरोकेअर मधील ऑपरेशन प्रमुख डॉ. सीझर सेन गुप्ता यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि आरटी-पीसीआर चाचणी लक्षणे व जवळच्या संपर्कांना लक्ष्य करते, म्हणून अँटीबॉडी आयजीजी पॉझिटिव्हिटी रेट नेहमीच आरटी-पीसीआरपेक्षा जास्त असेल. ताज्या संशोधनातून, प्रतिकारशक्ती काही महिन्यांत शरीरात निघून जाते. अँटीबॉडी पॉझिटिव्हिटी रेट दीर्घकाळापर्यंत राहू शकत नाही.
-डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य सचिव, महाराष्ट्र शासन
----
संपादन : ऋषिराज तायडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.