Onion News: कांदा निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. निर्यात बंदीनंतर दरात घसरण सतत सुरू आहे. याचा परिणाम बाजार समिती, व्यापारी, निर्यातदार, वाहतूकदार, मजूर, आणि शेड व्यावसायिकांवर होत असल्याचे सांगितले जात आहे.
कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून ८ डिसेंबर रोजी कांदा निर्यातबंदीचा निर्णय परिपत्रक काढून घेण्यात आला. यानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत ही कांदा निर्यातबंदी कायम राहणार आहे. कांद्याचे उत्पन्न चांगले होत असताना कांदा निर्यातीवर बंदी आणल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. दिवाळी दरम्यान ८० रुपये प्रति किलो गेलेले कांद्याचे दर १० रुपयांपर्यंत घसरले. सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याचे दर सतत घसरतच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापारी दरातील घसरणीमुळे चिंतेत आहेत. लासलगाव बाजारपेठेत लिलाव बंद पाडून आंदोलन सुरू असतानाच वाशीतील बाजारपेठेतही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. सोमवारी (ता.२९) कांदा दरात १०० रुपयांची घसरण पहायला मिळाली.
नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा १० ते १५ रुपये प्रतिकिलो विकला जात असून त्यापेक्षा कमी प्रतीचा कांदा ४ ते ८ रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरून येणारा कांदा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत येऊ लागल्याने कांद्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे केंद्राने लवकरात लवकर निर्णय घेऊन कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी व्यापारी संघाकडून करण्यात येत आहे.
दरवर्षी होते तितकेच उत्पन्न यंदाही होणार आहे. त्यामुळे आमची शासनाकडे मागणी आहे की ही निर्यातबंदी लवकरात लवकर उठवावी. जेणेकरून कांद्याचे दर जरी २-४ दिवस थोडे वाढले तरीही येत्या काळात ते १५-२० रुपये प्रतिकिलो इतपतच राहतील व शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील. जर कांदे १५-२० प्रति किलो दराने विकले तरच शेतकऱ्याला त्याच्या खर्चाच्या दीडपट उत्पन्न मिळेल.
- संजय पिंगळे, अध्यक्ष, कांदा-बटाटा आडत व्यापारी संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.