मुंबई : गेल्या वर्षीपेक्षा यंदा मुंबईत ऑनलाईन कर्जाच्या नावाने फसवणुकीचे गुन्हे दुपटीने वाढले आहेत. बनावट लोन ॲपची कार्यपद्धत वापरून गुन्हेगार संबंधितांना धमकी देऊन फसवणूक करत असल्याने सायबर गुन्हेगारीचे नवे प्रकार समोर येत आहेत. दुसरीकडे गुन्ह्याची उकल करण्यात मात्र पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय नसल्याचे आकडेवारीवरून दिसते.
मुंबईत गेल्या वर्षी ऑनलाईन लोन ॲपद्वारे फसवणुकीचे ४२ गुन्हे दाखल झाले होते. यंदा गेल्या महिन्यापर्यंत ९६ गुन्हे दाखल झालेत. २०२१ च्या तुलनेत यंदा सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन कर्ज फसवणुकीचे गुन्हे ५० टक्के वाढल्याचे दिसते. वर्षभरात केवळ पाच प्रकरणे सायबर पोलिसांना तडीस नेण्यात यश आले असून १६ जणांना अटक करण्यात आली आहे.
एकीकडे गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे पोलिसांचे प्रकरण उकल करण्याचे प्रमाण फक्त ५.५ टक्के असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. सप्टेंबरपर्यंत सायबर गुन्ह्यांसाठीचे ३,३०१ गुन्हे नोंदवले गेले; परंतु त्यापैकी केवळ १८२ प्रकरणे सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे.
अशी असते ‘मोडस ऑपरेंडी’
कर्ज फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगार खास कार्यपद्धती वापरतात. ज्या ॲपद्वारे फसवणूक केली जाते त्यांची रिझर्व्ह बँकेकडे अधिकृत नोंदणी केली जात नाही. ॲप किंवा वेबसाईटवर कर्ज देणाऱ्या कंपनीचा कार्यालयीन पत्ता किंवा संपर्क माहिती उपलब्ध नसते. अशा कंपन्या फक्त ऑनलाईन विश्वात असतात. खास ऑफर देत प्रलोभन दाखवत गुन्हेगार कर्ज घेण्यासाठी इच्छुक ग्राहकांना आपली शिकार बनवतात. ग्राहकांच्या मोबाईलवरील सर्व वैयक्तिक तपशिलात ॲपद्वारे प्रवेश करतात आणि नंतर माहितीचा दुरुपयोग करत ग्राहकांना ब्लॅकमेल केल्याच्या सायबर नोंदी आहेत.
ऑनलाईन कर्ज फसवणूक
२०२१
दाखल गुन्हे : ४२
तपास पूर्ण : ४
अटक आरोपी १४
२०२२ (जानेवारी ते सप्टेंबर)
दाखल गुन्हे ः ९६
तपास पूर्ण ः ५
अटक आरोपी ः १६
फसवणुकीमुळे जीवन संपवले
ऑनलाईन कर्ज फसवणूक करणाऱ्या ॲपमुळे काही मुंबईकरांचे बळीही गेले आहेत. अशाच एका प्रकरणात मे महिन्यात ३८ वर्षीय संदीप कोरगावकर यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. संदीप यांना धमकावले जात होते. कर्ज फेडूनसुद्धा त्याचे फोटो मोर्फ करून त्यांचा छळ केला जात होता. त्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.
मार्चमध्ये एका ४३ वर्षीय महिलेने कर्ज फसवणूक आणि नंतर मानसिक छळामुळे आत्महत्या केली. मोबाईल ॲपद्वारे कर्ज घेतल्यावर पीडितेला फोन करून रक्कम द्या नाही तर मॉर्फ केलेले फोटो कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना पाठवू, अशी धमकी तिला देण्यात आली होती. अखेर कंटाळून महिलेने जीवन संपवले. पोलिसांनी १३ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. दोघांना अटक केली.
काय करता येईल?
अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी सत्यता तपासा
ऑफरच्या अटी आणि नियम तपासा
लिंक वा कोणतेही ऑनलाईन फॉर्म क्लिक करताना पडताळणी करा
पैसे मिळवण्यासाठी कोणतेही क्यूआर कोड कधीही स्कॅन करू नका
कर्ज अॅपवर केवायसी कागदपत्रे कधीही शेअर करू नका
पोलिसांची हेल्पलाईन
मुंबई पोलिसांनी १७ मे २२०२२ रोजी सायबर गुन्ह्यासाठी हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. हेल्पलाईन क्रमांक १९३० सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत असतो. काही आपत्ती घडल्यास हेल्पलाईन क्रमांक किंवा ‘https://cybercrime.gov.in’ वर सायबर गुन्ह्याची तक्रार करता येईल.
सायबर फसवणूक झाल्यावर पीडित व्यक्तीने पोलिसांना शक्य तितक्या लवकर माहिती देणे आवश्यक आहे. आम्ही मुंबई पोलिस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, रेडिओ चॅनेल आणि मीडिया हाऊसच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत. नागरिकांना सायबर फसवणूक टाळण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे. सायबर गुन्ह्यांबाबत पथनाट्यातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न आहे.
- हेमराज राजपूत, सायबर क्राईम, मुंबई पोलिस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.