Paduka darshan sohala 2024 esakal
मुंबई

Paduka darshan sohala 2024: संत, श्रीगुरू यांच्या पादुकांविषयी जाणून घ्या

प्राचीन आध्यात्मिक परंपरांपासून आधुनिक आरोग्यतंत्र आणि योग्य आर्थिक व्यवहार ज्ञानापर्यंत जगण्यासाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टींचा अंतर्भाव ‘श्री फॅमिली गाईड’ प्रोग्रॅममध्ये आहे.

सकाळ वृत्तसेवा

अध्यात्म, आरोग्य, आणि संपत्ती व्यवस्थापनातील नामांकित शिक्षक, प्रशिक्षक, विचारवंत आणि तज्ज्ञांची अचूक शिकवण ‘श्री फॅमिली गाईड’च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. प्राचीन आध्यात्मिक परंपरांपासून आधुनिक आरोग्यतंत्र आणि योग्य आर्थिक व्यवहार ज्ञानापर्यंत जगण्यासाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टींचा अंतर्भाव ‘श्री फॅमिली गाईड’ प्रोग्रॅममध्ये आहे.

विविध स्वरूपांच्या कार्यशाळा, वेबिनार्स किंवा ऑनलाइन अभ्यासक्रम यांनी परिपूर्ण असा ‘श्री फॅमिली गाईड’ प्रोग्रॅम आहे. या प्रोग्रॅमची सुरुवात ‘श्री गुरू पादुका दर्शन उत्सवा’च्या माध्यमातून होत आहे. या आध्यात्मिक व सांगीतिक सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहा. या सोहळ्यात ज्यांच्या पादुका आहेत त्या सद्गुरु आणि संताविषयी जाणून घेऊया...

संत ज्ञानेश्वर महाराज

( नेवासा )

श्रीमत् भगवद्‍गीता जगाला मार्गदर्शक आहे. संस्कृतमधील हे ज्ञान संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी बोलीभाषा मराठीत ‘ज्ञानेश्‍वरी’ अर्थात भावार्थदीपिका ग्रंथरूपाने सर्वांसाठी खुले केले ते ठिकाण म्हणजे नगर जिल्ह्यातील नेवासे. तिथे पैसखांबाचे मंदिर आहे.

श्रीक्षेत्र नेवासा येथील पैसखांब दर्शन मंदिरातील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका.

सौजन्य ः संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नेवासा

संत जनाबाई

( गंगाखेड )

संत जनाबाई यांचे अभंग आणि ओव्या प्रसिद्ध आहेत. संत जनाबाईंनी पंढरपूरला श्री विठ्ठल-रुक्मिणीची निष्काम भक्ती केली. त्यांनी स्वकष्टाने दास्यत्व धर्मरूपी निष्काम सेवा केली. अभंग आणि ओव्यारूपी जनता जनार्दनाची सेवा केली. त्यांनी अतिशय परखड शब्दांत समाजाला अभंगांतून मार्गदर्शन केले.

श्री क्षेत्र गंगाखेड (जि. परभणी) येथील संत जनाबाई

मंदिरातील पादुका.

सौजन्य ः संत जनाबाई संस्थान,

गंगाखेड, परभणी

संत तुकाराम गाथा

ग्रंथ दर्शन

संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळ्यानिमित्त देहूसह राज्यभर कार्यक्रम सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पादुका दर्शन सोहळ्यात संत तुकाराम गाथा ग्रंथाचे व महाराजांच्या हस्तलिखिताचे विधिवत पूजन होणार आहे.

सौजन्य : डॉ. सदानंद मोरे

आणि डॅा. विवेक मोरे, देहू

श्री एकनाथी भागवत ग्रंथ दर्शन

श्री संत एकनाथ महाराज यांच्या श्रीएकनाथी भागवतास ४५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने अकरावे वंशज श्री रघुनाथबुवा नारायणबुवा गोसावी पालखीवाले यांच्या घरी असलेल्या श्री एकनाथी भागवत ग्रंथाच्या मूळ हस्तलिखित ग्रंथाचे पूजन होणार आहे.

सौजन्य : श्री संत एकनाथ

महाराज संस्थान, पैठण

संत निळोबाराय महाराज ( पिंपळनेर )

संत निळोबाराय महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे निष्ठावान भक्त. संत तुकाराम महाराजांची भेट व्हावी म्हणून संत निळोबाराय यांनी ४२ दिवस अन्न-पाण्याचा त्याग केला. त्यांच्या भक्तीमुळे संत तुकाराम महाराजांना वैकुंठातून निळोबाराय यांना दर्शन देण्यासाठी यावे लागले.

श्रीक्षेत्र पिंपळनेर (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील संत निळोबाराय महाराज मंदिरातील पादुका.

सौजन्य ः संत निळोबाराय संस्थान,

पिंपळनेर, अहमदनगर

श्रीगुरू महाअवतार बाबाजी

पूज्य श्री एम यांना श्रीगुरू महावतार बाबाजी यांच्या पादुका पदनपल्ली येथील आश्रमासाठी हव्या होत्या. श्रीगुरू महावतार बाबाजी कधीही पादुका वापरत नसत. एका पौर्णिमेच्या रात्री पूज्य श्री एम यांच्या उपस्थितीत या पादुका त्यांना प्राप्त झाल्या. हे अत्यंत गुप्तरीत्या पौर्णिमेच्या रात्री केले गेले आणि या वेळी श्रीगुरू महावतार बाबाजी यांनीही त्यांचे मोठे मंदिर बांधले जावे अशी इच्छा व्यक्त केली, तसेच तेथे आपली शाश्वत कृपादृष्टी असेल, असेही सांगितले.

श्रीगुरू महाअवतार बाबाजी यांच्या पादुका.

सौजन्य ः आध्यात्मिक गुरू श्री एम

प. प. टेंबे स्वामी महाराज ( माणगाव )

श्री दत्त संप्रदायाला ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा सर्वश्रेष्ठ मंत्र देणारे वासुदेवानंद सरस्वती (टेंबे महाराज) यांनी भारतीय तत्त्वज्ञान व वाङ्‌मय यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. टेंबे स्वामी महाराजांनी श्री दत्तमंदिर स्थापन केल्यापासून तिथे औदुंबर वृक्ष आहे. तिथे दत्त पादुका स्थापन केल्या आहेत.

दत्त संप्रदायातील थोर संत टेंबे स्वामी महाराज यांचे जन्मस्थळ माणगाव येथील पादुका.

सौजन्य ः श्री दत्त मंदिर ट्रस्ट, माणगाव

श्री शंकर महाराज

( धनकवडी )

सत्पुरुष श्री शंकर महाराज यांची समाधी पुणे येथे धनकवडी परिसरात आहे. अंतापूर (जि. नाशिक) गावातील चिमणाजी यांना स्वप्नात मिळालेल्या दृष्टांतानुसार त्यांना रानात एक बालक सापडले. ते शंकराचे भक्त असल्याने त्यांनी या सापडलेल्या बालकाचे नावही शंकर ठेवले.

श्री शंकर महाराजांनी १३ वर्षे वापरलेल्या अंतापूर येथील त्यांच्या घरातील मूळ पादुका.

सौजन्य ः श्री. पोपटदादा हिरे

(अंतापूर, नाशिक)

संत मुक्ताबाई

( मुक्ताईनगर )

संत मुक्ताबाई बाराव्या शतकातील थोर संत. संत ज्ञानेश्वर महाराजांना ताटीच्या अभंगातून बोधामृत देणाऱ्या मुक्ताबाई. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई यांच्यातील रक्षाबंधन, भाऊबिजेचा भावनिक उत्सव आजही त्याच श्रद्धेने केला जातो.

श्रीक्षेत्र मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथील विद्युल्लता समाधी मंदिरातील आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या पादुका.

सौजन्य ः संत मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर

संत नरहरी महाराज

( पंढरपूर )

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात संत नरहरी सोनार महाराजांचे समाधी मंदिर आहे. हरी आणि हर एकच आहेत, हा साक्षात्कार झाल्यानंतर नरहरी महाराज पांडुरंगाचे निस्सीम भक्त झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या अभंगातून समाज सुधारण्याचे मोठे कार्य केले.

श्रीक्षेत्र पंढरपूर (जि. पंढरपूर) येथील संत नरहरी सोनार महाराज

यांच्या पादुका.

सौजन्य ः श्री संत शिरोमणी नरहरी

महाराज समाधी मंदिर (ट्रस्ट)

श्री रामदास स्वामी

( सज्जनगड )

समर्थ रामदास स्वामींनी वेद, उपनिषदे, प्राचीन ग्रंथ, विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला. दासबोध, मनाचे श्लोक रचना यांची रचना त्यांनी केली. साधक अवस्थेत असताना श्रीरामांची केलेली प्रार्थनाच त्यांची ‘करुणाष्टके’ झाली.

इ.स. १६४४ मध्ये दिवाकर भट्ट गोसावी यांना अनुग्रह देऊन समर्थ रामदास स्वामी यांनी दिलेल्या आपल्या मूळ पादुका.

सौजन्य ः श्री दिवाकर भट्ट गोसावी

रामदासी मठ, महाबळेश्वर

श्री स्वामी समर्थ

( अक्कलकोट )

श्री स्वामी समर्थ म्हणजे दान, तप आणि कर्मातून भक्तांचे जीवन घडविण्याची शिकवण देणारे संत. शारीरिक, मानसिक स्तरावर भक्तांच्या दुःखमुक्तीचे कार्य त्यांनी केले. कुटुंबातील सर्वांमध्ये प्रेम असावे, हपापलेपणातून माणसाची सुटका व्हावी हे सांगण्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यातून वैराग्य आणि अनासक्तीचे दर्शन घडविले.

स्वामी समर्थांनी आपले उत्तराधिकारी श्री बाळाप्पा महाराज यांना दिलेल्या मूळ चैतन्य पादुका.

सौजन्य ः श्री गुरुमंदिर न्यास, अक्कलकोट,

विश्व फाउंडेशन, शिवपुरी

श्री गजानन महाराज

( शेगांव )

गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरेचे (संप्रदाय) गुरू होते. भक्तिमार्गाने देवापर्यंत पोहोचता येते, हा संदेश त्यांनी दिला. गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री दासगणू महाराज यांनी लिहिला असून, त्याचे नाव ‘श्री गजानन विजय’ असे आहे.

१९०८ मध्ये संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांनी त्यांचे परमभक्त भगवानराव देशमुख (बुलडाणा ) यांना दिलेल्या मूळ चरण पादुका.

सौजन्य ः श्री.दिनेशकुमार आनंदराव

देशमुख, जयपूर (बुलडाणा)

श्री गुळवणी महाराज

( पुणे )

‘वासुदेव निवास’ ही पवित्र वास्तू असून अनेक सत्पुरुषांच्या आगमन व निवासामुळे ती परम पवित्र झाली आहे. गुळवणी महाराजांनी स्वत:कडे काही ही शेष न ठेवता दोन्ही हातांनी भरभरून वाटले. परमेश्वरी कृपेचा खजिनाच भक्तांमध्ये रिता केला.

दत्त संप्रदायातील थोर संत गुळवणी महाराजांनी वापरलेल्या व नंतर आश्रमात स्थापन

केलेल्या मूळ पादुका.

सौजन्य ः श्रीवासुदेव आश्रम, पुणे

आणि मा. शरदशास्त्री जोशी महाराज

संत नामदेव महाराज

( घुमान-पंजाब )

वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला. त्याचा विस्तार संत नामदेव महाराजांनी केला. त्यांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्राबाहेर फडकवली. पंजाबमध्ये बाबा नामदेव अशी त्यांची महती वर्णन केली जाते.

श्री क्षेत्र घुमान (जि. गुरदासपूर, पंजाब) येथील श्री नामदेव दरबार गुरुद्वारातील संत नामदेव महाराज यांच्या पादुका.

सौजन्य ः श्री नामदेव दरबार

कमिटी, घुमान, पंजाब

संत सेना महाराज

( पंढरपूर )

पंढरीच्या सावळ्या पांडुरंगावर निष्ठा असलेले सेना महाराज जन्माने मध्य प्रदेशातील आहेत. मात्र, त्यांचे बहुतांश आयुष्य महाराष्ट्रात गेले. महाराष्ट्रातील तत्कालीन संतांसोबत त्यांनी भ्रमण केले. सेना महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून भक्तिरसाची उपासना केली. जन्माने हिंदी भाषिक संत असले तरी महाराष्ट्रात त्यांना मोठा सन्मान आहे.

श्री क्षेत्र पंढरपूर (जि. सोलापूर) येथील संत सेना महाराज मंदिरातील पादुका.

सौजन्य ः संत सेना महाराज संस्थान, पंढरपूर

संत वेणाबाई

( मिरज )

संत वेणाबाई मूळच्या मिरज इथल्या. खूप लहानपणी त्या विधवा झाल्या. समर्थ रामदास स्वामी मिरजेला आले असताना त्यांच्या भेटीमुळे, बोलण्यामुळे प्रेरित होऊन, वेणाबाई यांनी समर्थांचे शिष्यत्व स्वीकारले.

रामदासी परंपरेतील पहिल्या महिला मठाधिपती, आद्य स्त्री कीर्तनकार संत वेणाबाई यांनी त्यांच्या शिष्या बाय्याबाई यांना दिलेल्या मूळ पादुका.

सौजन्य ः श्री संत वेणास्वामी मठ, मिरज, स.भ. कौस्तुभबुवा रामदासी

श्री साईबाबा

( शिर्डी )

साईबाबांनी दिलेला ‘सबका मालिक एक है’ हा उपदेश सर्वदूर पोहोचला आहे. साईबाबांच्या पश्चात भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे शिर्डी धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्धी पावले आहे. मंदिरात देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात.

थोर साईभक्त नानासाहेब आमोणकर देशपांडे यांना श्री साईबाबांनी १८९८ मध्ये दिलेल्या मूळ चरण पादुका.

सौजन्य ः श्री. नंदकुमार रेवणनाथ देशपांडे निमोणकर (निमोण, अहमदनगर)

परमसद्‌गुरू श्री गजानन महाराज

( शिवपुरी )

परमेश्वर चरणी समर्पणातून मानवाचे जीवन सफल होते, या वाक्याची अनुभूती आपल्या जीवनकार्यातून शिवपुरीचे (अक्कलकोट) परमसद्‍गुरू श्री गजानन महाराजांनी दिली.

अग्निहोत्राचे थोर उपासक, श्री स्वामी समर्थांचे शिष्य परमसद््गुरू गजानन महाराज यांनी वापरलेल्या मूळ पादुका.

सौजन्य ः विश्व फाउंडेशन-शिवपुरी (अक्कलकोट)

श्रीगुरू बालाजी तांबे

( कार्ला )

आध्यात्मिक गुरू आणि आयुर्वेदिक तज्ज्ञ श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचा जन्म वेदशास्त्रसंपन्न श्री वासुदेवशास्त्री तांबे यांच्या घराण्यात झाला. त्यांच्या कुटुंबात लोकनाथतीर्थ व दत्त संप्रदायाचे टेंबे स्वामी यांची दीक्षा होती. पाच वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच कुणीही न शिकवता ते अस्खलित वेदमंत्र म्हणत.

आध्यात्मिक गुरू डॉ. बालाजी तांबे यांनी वापरलेल्या मूळ पादुका.

सौजन्य ः संतुलन आयुर्वेद, (कार्ला, पुणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT