नवी मुंबई - गुरू म्हटले की, डोळ्यांपुढे उभी राहते मायेची सावली. गुरू साधकाचे अज्ञान दूर करतो आणि त्याच्या आत असलेल्या निर्मितीचा स्रोत अनुभवण्याची क्षमता निर्माण करतो. अशी दिव्य अनुभूती कायमची स्मरणात राहावी म्हणून नवी मुंबईतील वाशी येथे होणाऱ्या भव्यदिव्य ‘श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्या’ची आतुरता आता सर्वांच्याच मनी दाटून आली आहे.
महाराष्ट्रातील १८ श्रीगुरूंच्या पादुकांच्या चरणी लीन होण्यासाठी अवघ्या राज्यभरातील साधकांची पावले आतापासूनच नवी मुंबईकडे वळू लागली आहेत. येत्या २६ आणि २७ मार्चला वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात होणाऱ्या ‘श्रीगुरू पादुका उत्सव’ सोहळ्यातील भक्तिरसात न्हाऊन निघण्यासाठी लाखो गुरुसेवक अधीर झाले आहेत.
आपल्या देशाला संपन्न आध्यात्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वैभव लाभले आहे. अध्यात्म आणि भावना यांचे अनोखे नाते आहे. आध्यात्मिक गुरूंनी सुदृढ, आरोग्यदायी, समाधानी आणि समृद्ध समाजाची रुजवणूक केली, ती जोपासली आणि पुढे नेली. अशा गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ‘सकाळ माध्यम समूहा’ने आनंदी जीवनशैलीसाठी मार्गदर्शक ‘श्री फॅमिली गाइड’ उपक्रम सुरू केला आहे.
त्याअंतर्गत सामाजिक, आध्यात्मिक, शारीरिक आणि आर्थिक प्रगती साधण्यासाठी ‘संकल्प ते सिद्धी सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. ‘श्रीगुरू पादुका उत्सव’ त्याचाच एक भाग आहे. त्यानिमित्त होणाऱ्या आध्यात्मिक आणि सांगीतिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा अतीव आनंद वारकरी आणि गुरुसेवक आतापासूनच व्यक्त करत आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून सोहळ्याच्या आयोजनाचे सुरू असलेले कागदावरील काम आता प्रत्यक्षात साकारले जात आहे. सोहळा होणाऱ्या सिडको प्रदर्शन केंद्राला हळू हळू एका तीर्थक्षेत्राचे स्वरूप येऊ लागले आहे. महाराष्ट्रातील जुन्या स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना असणाऱ्या ऐतिहासिक मंदिरांप्रमाणे हुबेहूब कलाकृती तिथे साकारण्यात येत आहेत.
सोहळ्यात ज्या गुरूंच्या पादुकांचे दर्शन होणार आहे, त्यांच्या मूळ स्वरूपानुसार तटी उभारण्यात येत आहेत. ऐतिहासिक कलेची साक्ष असलेल्या आणि कोरीव कामाचा विलक्षण अनुभव देणाऱ्या देवळांचा देखावा उभारण्याच्या कामाला वेग आला आहे.
श्रीगुरू बालाजी तांबे यांच्या आशीर्वादाने होत असलेल्या पादुका दर्शन सोहळ्यात आध्यात्मिक गुरू श्री एम. यांची विशेष उपस्थिती असणार आहे. डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पाच हजार भाविक एकाच वेळी अग्निहोत्र करणार आहेत. ओंकार जप आणि धुनी प्रज्वलन होणार आहे.
सोहळ्याच्या पहिल्या दिवशी ठाणे जिल्हा आणि नवी मुंबईतील वारकरी संप्रदायाच्या वतीने हरिपाठ आणि रिंगण सोहळा होणार आहे. दुसऱ्या दिवशी रायगड जिल्हा आणि पनवेल विभागातील वारकरी मंडळी रिंगण सोहळा साकारणार आहेत.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण-डोंबिवली आणि रायगड आदींसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदाय आणि भाविकांना आपल्या गुरूंच्या चरणाचे दर्शन घेण्याचा सुवर्णयोग प्राप्त होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील साधकांत उत्सुकता, उत्साह आणि भक्तिभाव दाटून आला आहे. गुरूंच्या चरणी लीन होण्याची आतुरता त्यांना लागून राहिली आहे.
मंत्रमुग्ध करणारा सुरांचा सोहळा
राज्यभरातील विविध देवस्थानांचे प्रमुख आणि मठांच्या विश्वस्तांबरोबरच सर्वच स्तरांतून ‘सकाळ’ने सुरू केलेल्या आध्यात्मिक उपक्रमास शुभेच्छा मिळत आहेत. पादुका उत्सवात भजन आणि कीर्तनाची परंपराही जपली जाणार आहे. त्यानिमित्त सुविख्यात गायक हरिहरन आणि प्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्या भक्तिगीतांचा संगीत सोहळाही रंगणार आहे. २६ मार्चला हरिहरन आणि २७ मार्चला शंकर महादेवन आपल्या सुरांच्या जादूने भाविकांना मंत्रमुग्ध करतील.
प्रवेशासाठी अशी करा नोंदणी
नागरिकांना पादुका दर्शन सोहळ्यासाठी विनामूल्य प्रवेश असेल, त्यासाठी https://srifamilyguide.com/event-page नोंदणी करावी लागणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल. अधिक माहितीसाठी 88888839082 या क्रमांकावर संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.