'श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाचे सारे श्रेय गुरुजींचेच आहे. असे सद्गुरू आपल्या नशिबात असतील, तर आपल्याला अजून काहीही नको. त्यामुळे मी पूर्ण समाधानी असून गुरूंची सेवा हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे.'
नवी मुंबई : ‘‘अठरा संत-सद्गुरूंच्या पादुकांसमोर आज हजारो भाविक नतमस्तक झाले. या संत-सद्गुरूंच्या ऊर्जेची स्पंदने हजारो गुरूसेवकांमध्ये परावर्तित झाली. एकप्रकारे साऱ्या भाविकांचे प्रसादात रूपांतर झाले. ऊर्जेच्या या प्रसादात साऱ्या विश्वाला सामावून घ्यावे,’’ अशी हाक ‘एपी ग्लोबाले’चे संस्थापक आणि सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार (Abhijit Pawar) यांनी दिली.
‘‘संत-सद्गुरूंच्या विचारांच्या मार्गावर चालण्यासाठी संपूर्ण कुटुंबाला मार्गदर्शक ठरेल, असा श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम (Sri Family Guide Program) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होत आहे,’’ अशी घोषणाही त्यांनी केली. ‘‘अठरा प्रमुख संत आणि सद्गुरूंच्या पादुका (Paduka Darshan Sohala 2024) एकत्र याव्यात, ही फक्त दैवी योजना आहे. त्यामागे सद्गुरूंची इच्छा आणि आशीर्वाद आहेत. यात आपले आणि ‘सकाळ’चे काहीही श्रेय नाही. आम्ही फक्त सेवेचा प्रयत्न केला आहे,’’ असे श्री. पवार यांनी सुरुवातीला नम्रपणे सांगितले.
‘‘मंदिरात प्रवेशानंतर आपण आधी कासवाचे दर्शन घेतो. कासव ज्याप्रमाणे आपले चारही पाय आणि मस्तक आत खेचून एकाग्र आणि स्थिर राहते, त्याप्रमाणे आपण पंचेंद्रिये नियंत्रित करून एकाग्रतेने प्रवेश करावा, अशी त्यामागील योजना. मंदिरात संत-सद्गुरूंची ऊर्जा-स्पंदने असतात. त्यांच्या चरणी आपण स्थिर चित्ताने लीन होतो, तेव्हा ती ऊर्जा स्पंदने आपल्याही शरीराचा भाग बनतात. आपलेही सद्गुरूंच्या प्रसादात रूपांतर होते. आज असा अनुभव हजारो भाविकांनी घेतला. या ऊर्जेच्या प्रसादात आपण विश्वाला सामावून घ्यावे. केवळ कुटुंबाचा नव्हे, तर वसुधैव कुटुंबकम् हा विचार ठेवावा. तरच आपण खरे भारतीय होऊ,’’ असे श्री. पवार यांनी सांगितले.
‘‘ही ऊर्जा आपल्याला गुरूंकडून, गुरूंच्या आशीर्वादाने मिळाली आहे. आपण नमस्कार करून परत जाताना चिंतन करायला हवे की ही स्पंदने आपल्यात आल्याने आपल्यात काय बदल व्हायला हवेत. हे बदल कसे होतील याचा विचार करावा, त्यासाठी श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम सुरू करीत आहोत. रोजच्या जगण्यामध्ये आध्यात्मिक आणि भौतिक संतुलन कसे राखले पाहिजे, यासाठी श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम मार्गदर्शन करेल,’’ असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले.
श्रीगुरू बालाजी तांबे (Sriguru Balaji Tambe) यांच्या शिकवणीबद्दल सांगताना श्री. पवार म्हणाले, ‘‘आपण गुरूंना किंवा इतरांना बघतो ते सुरती मिलन असते. आरती करताना ज्योत दिसते ती जेव्हा ईश्वरात किंवा इतरांच्यात दिसते त्याला आरती म्हणतात. आरती आणि सुरती मिलन यांच्यातला फरक जाणतो तो भारतीय. हे मला श्रीगुरूंनी शिकवले.’’ ‘‘ज्ञान, यज्ञ, तप केले तरच कर्माचे सत्कर्म होईल, ही शिकवण मला श्रीगुरू बालाजी तांबे यांच्याकडून मिळाली. त्यांच्याच प्रेरणेने सद्गुरू श्री एम यांची सेवा करण्याची संधी मिळाली. ज्यांना अशा सद्गुरूंची ओळख पटली ते खरोखर नशीबवान आहेत.
श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाचे सारे श्रेय गुरुजींचेच आहे. असे सद्गुरू आपल्या नशिबात असतील, तर आपल्याला अजून काहीही नको. त्यामुळे मी पूर्ण समाधानी असून गुरूंची सेवा हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे. गुरूसेवेसाठी हा आणि पुढचा जन्म खर्ची जावो, हाच माझा संकल्प आहे. हे मला आतून आचरणातून करायचे आहे. सद्गुरू श्री एम यांचे ऋण फेडण्यासाठी मला किती जन्म घ्यावे लागतील हे माहीत नाही,’’ असे भावुकपणे सांगत श्री. पवार यांनी श्री एम यांना व्यासपीठावर नमस्कार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.