मुंबई

Palghar News: आदिवासी नागरी संस्कृतीचे प्रतिक " बोहाडा ".

भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा

Mokhada News: पालघर जिल्ह्यातील शेवटचे टोक म्हणजे मोखाडा. मुंबई पासून अवघ्या शे- दिडशे किमी. तर गुजरात आणि नाशिकच्या सरहद्दी लगत सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सर्व सुविधांपासून वंचित असलेले दुर्गम,  डोंगराळ असे आदिवासीबहुल गाव. या गावाने सुमारे 300  वर्षाहुन अधिक वर्षापासून श्रध्दा आणि कलेचा अनोखा संगम असलेला ' बोहाडा ' उत्सवाचा वारसा अखंडपणे जोपासला आहे.

येथे दरवर्षी फाल्गुन पौर्णिमा होळीनंतर वसंतोत्सवारंभाच्या म्हणजे सोमवारी  25 मार्च  धुलीवंदनाच्या दिवसापासून पुढील आठ दिवस मोठ्या उत्साहाने प्रत्येक व्यक्ती हा आपला सण समजून साजरा करतात. काबाडकष्ट करणारे आदिवासी, कष्टकरी बांधव, नोकरदार तसेच सधन व्यापारी वर्ग, सर्व जाती धर्माचे, पंथाचे लोक हे आपल्या साऱ्या व्यथा, वेदना, व्याप, व्यापार झुगारून देऊन एकत्रितपणे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता जपत, जगदंबेचा बोहाडा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात.

 प्रामुख्याने आदिवासी समाज बांधवांचा असलेल्या ह्या उत्सवात कालांतराने पांढरपेशा समाजही स्थानिक बांधवांच्या प्रथा, परंपरेमध्ये सहभागी होऊ लागला. या महोत्सवाला स्थानिक ग्रामीण कलाकार राजनभाई वैद्य यांनी संपूर्ण महाराष्ट्र, हरियाणा, उत्तरप्रदेश, काशी, मथुरा, ओडीशा, छत्तीसगड, दिव दमण, गुजरात, राजस्थान, गोवा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि दिल्लीच्या राजपथावर कार्यक्रम करून सोबत आदिवासी तारपा आणि ढोल नाचाचा साज लेवून लोकांपर्यंत पोहोचवला आहे.

या महोत्सवाला भव्यदिव्य स्वरूप येत गेल्याने आदिवासी बोली भाषेतील बोहाडा आणि तसेच नागरजनांच्या भाषेतील जगदंबा उत्सव मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा होऊ लागला. अगदी कोरोनासारखे महाभयंकर संकटाचे आक्रमण होत असतानाही ग्रामस्थांनी आणि संपूर्ण तालुकावासीयांनी शासनाने आखून दिलेल्या अटी शर्तीनुसार त्याच तन्मयतेने, श्रध्देने आणि उत्साहाने बोहाडा साजरा केला.

          बोहाडा म्हणजे विविध देव-दानवांचे मुखवटे धारण करून पौराणिक तसेच ऐतिहासिक कथेतील प्रसंगाचे विशिष्ट नृत्यविष्काराने केले जाणारे सादरीकरण. स्थानिक कलाकारांनी आपल्या अप्रतिम हस्त कौशल्याने उंबराच्या व सागाच्या लाकडात कोरीव काम करून रेखीव पध्दतीने विविध दैवतांचे व दानवांचे मुखवटे रंग, कलाकुसर करून ते चित्ताकर्षक बनविले.

स्वतःचे व्यक्तीत्व विसरून धारण केलेल्या देव-दानवांच्या भूमिकेत प्रवेश करत नृत्य, गायन व अभिनयाद्वारे पौराणिक कथानके सादर करण्याचा हा अनोखा उत्सव. आपला इतिहास आणि त्यातील संदेश भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक जीवंत कलाविष्कार. माती किंवा लाकडावर अथवा कागद्याच्या लगद्याने कोरीव काम करून देवादिकांचे व दानवांचे मुखवटे तोंडावर बांधून नृत्य करणे असे या उत्सवाचे तिनशे वर्षापासूनचे स्वरूप मात्र बदलत्या काळानुसार हळूहळू बदलत गेले.

         विविध समाजातील प्रमुखांनी आराध्य दैवतांची रूपे या उत्सवात साकारण्यासाठी निवडली व वंशपरंपरेने आजपर्यंत ती पाळली जात आहे. दरवर्षी सोंगांना ( मुखवटे ) रंगसफेदी करून संबळ-सनई ( वाजंत्री ) च्या तालावर लयबद्ध नृत्याद्वारे हा बोहाडा साजरा केला जातो.

         गणपती, सरस्वती ( शारदा ), मच्छ-कच्छ-राक्षस, मारूती-जंबूमाळी, त्रिपूरासूर-शंकर, त्राटिका-राम-लक्ष्मण, खंडेराव-दैत्य, वेताळ-विक्रमराजा, भस्मासुर-मोहिनी, इंद्रजित-लक्ष्मण, रक्तादेवी-राक्षस, गजासुर-शंकर, वराह-राक्षस, भीम-जरासंध, चारण भीम-हेडींबा विवाह, वीरभद्र-दक्षप्रजापती, रावण-राम-लक्ष्मण, नरसिंह-हिरण्यकश्यपू-भक्त प्रल्हाद अशा सोंगांची ( मुखवटे ) व वेशभूषा परिधान करून आदिवासींचे पारंपारिक वाद्य संबळ-सनईच्या ( पिपाण्यांच्या) तालावरती काठीला कापड बांधून तयार केलेल्या टेंभे ( मशाली ) पेटवून रात्रभर त्या उजेडात व सकाळ होईपर्यंत ही सोंगे नाचवली जातात.

सोंगांच्या मधल्या वेळेत रात्रभर नाच्या व त्याचे सहकारी ढोलकीच्या तालावर गण- गवळण म्हणत, नाचत असतात. त्यात भर म्हणून विद्युत रोषणाई केलेला विंचू, भुतं, डाकीण, नंदी हे सुध्दा भाविकांना खूप वेगळाच आनंद देऊन जातात. गावातील कलाकार कोणताही मोबदला न घेता जगदंबेमातेवरील भक्ती व श्रध्देपोटी ह्या सोंगाना ( पात्रांना ) रंगवत ( मेकअप) असतात.

             उत्सवाचे प्रमुख आकर्षण आणि पंचक्रोशीतील जनतेची श्रद्धास्थान असलेली माता जगदंबेची मंदिरात यथासांग पूजा अर्चना करून समाजातील वाईट प्रवृत्तीचे प्रतिक असलेल्या महिषासूर व लोंढ्या या राक्षसांचा वध करून विजय प्राप्त केलेली आई जगदंबा मिरवणूकीने वाजत गाजत मोठ्या उत्साहात मानाच्या घरोघरी  दर्शनास जाऊन तिथे तिची माय भगिनी पूजा-अर्चा खण-नारळाने ओटी भरली जाते. नंतर यात्रेची सांगता होते.

कुस्त्यांचा फड रंगला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातील  व देशातील जगदंबेचे भक्त, गावकरी, पंचक्रोशीतील आबालवृद्ध,  हौशे-नवशे यांची प्रचंड गर्दी, चैतन्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. दरम्यान, हा ऊत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांसह ऊत्तर भारत आणि दक्षीणेच्या राज्यातही प्रसिद्ध झाला आहे. 

           आजकालच्या धकाधकीच्या आणि कृत्रिमतेच्या दुनियेत जिथे सगळे चित्रात बघण्याची मुलांना सवय झाली आहे तिथे ही सोंगे ( मुखवटे ) परिधान केलेली जीवंत माणसे बघताना एक वेगळीच  अनुभूती मिळते.  सासरी गेलेल्या सासुरवाशीणी या उत्सवाच्या निमित्ताने पुन्हा माहेरवाशीण होतात तर आबालवृद्ध दरवर्षी जरी उत्सव होत असला तरी नव्या नवलाईने सहभागी होतात. प्रतीवर्षीचा हा उत्सव माहेरवाशिणींचा, उत्सव कष्टकरी , दलित, आदिवासीचा श्रध्देचा झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT