Palghar News: आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या राज्यातील शासकीय आश्रमशाळा कात टाकत असून या शाळांना अत्यंत चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जात असल्याने या शाळा आदर्श शाळांच्या यादीत येण्याच्या मार्गावर येऊन ठेपल्या आहेत.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत डहाणू तालुक्यातील आंबेसरी येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा यासाठी आदर्श ठरली आहे. पाहिली ते दहावीपर्यंतच्या या शाळेला आदिवासी विभागाकडून अत्यंत चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. या शाळेत जवळच असलेल्या जामशेत डोंगरी पाडा, जोगवे, हळदपाडा आदी आदिवासी पाड्यातील कातकरी, वारली आदी घटकातील 500 हून अधिक मुले- मुली शिक्षण घेत आहेत.
या परिसरात असलेल्या कातकरी वारली समाजातील शाळाबाह्य मुलांना शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ही शाळा एक वरदान ठरत आहे. यामुळे या शाळेतील मुले आता शिष्यवृत्ती परीक्षा सोबतच विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये समोर येत आहे. शाळेची इमारत आणि पायाभूत सुविधा सोबतच या शाळेमध्ये डिजिटल रूम, कम्प्युटर लॅब, दृकश्राव्य माध्यम तसेच इतर अनेक माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा स्तर वाढविला जात आहे.
वेदच्या उपक्रमाच्या माध्यमातून गुणवत्तेचा स्तर हा वाढत असल्याचेही इथे दिसून येते. विद्यार्थ्यांना मिशन स्कॉलरशिपसाठी अधिक वर्ग घेतले जात आहेत तर दुसरीकडे दहावीच्या मुलांना अधिक गुण मिळवण्यासाठी त्यांच्यासाठी येथील शिक्षक मुख्याध्यापक परीक्षेसाठी स्वतंत्र सराव घेत आहेत तसेच रात्रअभ्यासिकाही घेतल्या जात असल्याची माहिती प्राचार्य कांचन सातवी यांनी दिली.
शिक्षकांकडून घेतल्या जात असलेल्या अधिकच्या वर्गामुळे आम्हाला अभ्यासक्रमाच्या अनेक बाबी समजून घेण्यास मदत होत असल्याचे रविना दिंडे, तन्मया धानू या विद्यार्थिनींनी सांगितले तर पूर्वीपेक्षा आता आम्हाला सराव परीक्षेचा मोठा लाभ होत असल्याचे अल्पेश आणि अमित या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
आंबेसरीच्या या आश्रमशाळेत गुणवत्ता विकासासाठी विविध प्रकारचे प्रयोग केले जातात यामध्ये प्रामुख्याने वेदच्या माध्यमातून वाचन, लेखन तसेच त्याचा आढावा घेतला जातो. तर विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून या शाळेमध्ये मेत्ता फाउंडेशनने 3 हजार 200 हून अधिक कादंबरी, कथा, बालसाहित्य आणि इतर साहित्याची पुस्तके पुरवली असून हे पुस्तके शाळेच्या दर्शनी भागामध्ये ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना वाटेल तेव्हा ही पुस्तके घेऊन वाचता येतात,.
शाळेच्या प्रत्येक भिंतीवर विद्यार्थ्यांचे विविध विषयाचे ज्ञान वाढावे यासाठीची चित्र काढण्यात आली आहेत. प्रत्येक वर्गामध्ये त्या-त्या इयत्तानिहाय विषयाला धरून संपूर्ण वर्ग खोल्या चित्र आणि वेगवेगळ्या विषयाने सजवण्यात आल्या आहेत. वाचनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये एखादा विषय राहिला असेल तर त्या विद्यार्थ्यांना समूह तयार करून त्यामार्फत त्याची तयारी करून घेतली जाते. यासाठीची रचना प्रत्येक वर्गामध्ये करण्यात आली आहे. हुशार विद्यार्थ्यांची निवड करून प्रत्येक समूहामध्ये त्या विद्यार्थ्यांना दिले जाते आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या वाचन आणि आकलन या विषयावर भर दिला जातो.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सोबतच दहावीच्या परीक्षेची तयारी करावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सराव घेतले जातात. यासाठी शिक्षकांच्या समित्या येथे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्याच्या माध्यमातून प्रश्न आणि सराव करून घेतला जातो. यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांना याचा लाभ होत असल्याची माहिती प्राचार्य सातवी यांनी दिली. दीक्षा ॲप च्या माध्यमातून तसेच डिजिटल साक्षर चे व्हिडिओ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतात. इतर माध्यमांचा वापरही करून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासंदर्भातील माहिती उपलब्ध करून दिली जाते.
विज्ञान या विषयाच्या शिक्षिका सई कडू यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग केले आहेत. त्यामध्ये सोलारावर चालणारे मळणी यंत्र आहे. यासोबतच सोलारवर चालणारी गाडी, असे अनेक यशश्री प्रयोग येथील विद्यार्थ्यांनी केले असून त्यांचे विज्ञान प्रदर्शनामध्ये कौतुकही झाले आहे.
या आश्रम शाळेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी या शाळेतील शिक्षिका सुप्रिया कांबळे यांनी आपली एकुलती एक मुलगी याच शाळेत दाखल करून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांची मुलगी इयत्ता दुसरी मध्ये शिक्षण घेत आहे. आपले मूल जर या शाळेत शिकत असेल तर प्रत्येक मुलावर आपलेपणा आणि त्याची जाणीव कायम राहील असे त्यांना वाटते., यासाठी शिक्षिका कांबळे यांनी या शाळेत आपल्या मुलीला दहावीपर्यंत याच शाळेत शिकवण्याचा त्यांचा मानस केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.