मुंबई ः अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे, त्यानुसार अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी उपनगरी रेल्वे सुरु झाली, पण खाजगी कंपन्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही उपनगरी सेवा बंदच आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या अनेकांचे हाल होत आहे. काहींचा तर कामापेक्षा प्रवासातच वेळ जास्त जात आहे. विशेषतः ठाणे, बोरीवली, वाशीच्या पलीकडे राहणाऱ्यांचे हाल जास्त होत आहेत.
विरारला राहणाऱ्या आणि अंधेरीत काम करणाऱ्या हेमांगी भोसले यांना केवळ कामावर जाण्यासाठी दोन बस बदलाव्या लागत आहेत. त्यांना केवळ कार्यालयात जाण्यासाठी तीन तास लागतात आणि त्यापूर्वी रांगेत दोन्ही थांब्यावर प्रत्येकी पाऊण ते एक तास प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यांना आता सात हजार रुपये पगार मिळत आहे आणि त्यातील तीन हजार प्रवासावर जात आहे. अंधेरी ते विरारचा पास मिळतो फक्त 315 रुपयांना. बोरीवलीत काम करणारे पतिराम यादव हे विरारला राहतात. सकाळी 8 वाजता विरार बस स्टँडवर पोहोचल्यावर त्यांना बोरीवलीला काम करीत असलेल्या दुकानात पोहोचण्यास बारा वाजतात. त्यांना दैनिक भत्ता मिळतो 400 रुपये आणि प्रवासावर एकंदर 150 रुपये खर्च होता. मासिक पास 215 रुपयांऐवजी हा अतिरीक्त खर्च ते करीत आहेत. कोरोनामुळे काय होईल ते माहीती नाही, पण घरी बसलो तर भुकेमुळे मरुन जाऊ असे ते सांगतात.
डोंबिवलीच्या शिल्पा सडवलीकर यांना कामामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा बदलापूरला जावे लागते. बदलापूरला जाण्यासाठी प्रथम किमान पाऊण तासाची प्रतिक्षा करुन कल्याणला जावे लागते आणि तेथून बदलापूर. या प्रवासात रोज किमान दीड तास लागतो. ट्रेन सुरु असती तर अर्ध्या तासात हा प्रवास झाला असता. छत्रपती शिवाजी टर्मिनसला जावे लागले तर येताना किमान दोन तास बससाठी थांबावे लागते आणि परत कधी येऊ हे सांगता येत नाही असे त्या म्हणतात.
कल्याणचे दीपक अहिरे भाईंदरला कामाला जातात. त्यासाठी दोन बसचा प्रवास असतो. तीन तासाचा प्रवास आणि दोन तासाची प्रतिक्षा केवळ जाताना. येताना तर हे वाढते. कधी कल्याणहून बोरीवली आणि तेथून भाईंदर किंवा कधी कल्याणहून ठाणे आणि तेथून भाईंदर असा त्यांचा प्रवास असतो. यात दिवसाला तीनशे रुपये जातात. आता एवढे केल्यानंतरही क्लाएंट भेटतीलच याची खात्री देता येत नाही. अनेक बस स्टँडमध्ये असतात, प्रवासीही असतात, पण कर्मचाऱ्यांच्या अभावी त्या चालवल्या जात नाहीत, अशीही त्यांची खंत आहे.
वसईतील अजित नायर भिवंडीला रोज चार तास प्रवास करुन जातात. त्यासाठी त्यांना दोन बस बदलणे भाग पडते. रोजच्या प्रवासाचा खर्च होतो दोनशे रुपये. वसईहून ठाणे बस पकडून कापूरबावडीला ऊतरतात. तेथून कंपनीची बस नेते. मात्र जाताना कापूरबावडीला बस क्वचितच थांबते, त्यामुळे त्रास जास्त वाढत.
--------------------------------------------------------------
संपादन - तुषार सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.