नवी मुंबई : नवी मुंबईकरांना २०२० नवीन वर्षाचे स्वागत सुरक्षितपणे करता
यावे, थर्टीफर्स्टच्या रात्री शहरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये,
याकरिता नवी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. त्यासाठी पोलिसांकडून
शहरातील हॉटेल, बार, ऑर्केस्ट्रा बार, रेस्टॉरंट, परमिट रूम; त्याचप्रमाणे
खासगी सोसायट्यांमध्ये, इमारतींच्या छतांवर होणाऱ्या नववर्ष पार्ट्यांवर विशेष
लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच विनापरवाना मद्य, विदेशी दारू पिणाऱ्यांवर;
तसेच परवानाधारक नसलेल्या व्यक्तींना मद्यविक्री करणाऱ्या बारवर, वाईन
शॉपवरदेखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नवी मुंबई पोलिसांकडून
सांगण्यात आले.
थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात कडेकोट
बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिमंडळ स्तरावर ठेवण्यात आलेल्या
बंदोबस्तावर पोलिस उपायुक्त, तसेच सहायक पोलिस आयुक्त विभाग
स्तरावरून देखरेख ठेवणार आहेत. याशिवाय गुन्हे शाखेकडून देखील स्वतंत्र
बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ज्या बार, हॉटेल्स रेस्टॉरंटने वेळेसंबंधी परवाना
प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतली, त्याच आस्थापनांना पहाटे ५ वाजेपर्यंत बार,
ऑर्केस्ट्रा बार, रेस्टॉरंट सुरू ठेवता येणार आहेत. पूर्वपरवानगी न घेतलेल्या व
वेळेपेक्षा अधिक काळ सुरू राहणाऱ्या बार, हॉटेल्स व इतर आस्थापनेवर
कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. ऑर्केस्ट्रा
बार, रेस्टॉरंट, बार-हॉटेल्स चालकांनी आपल्या आस्थापनेच्या आवारात आणि
बाहेर खासगी सुरक्षा रक्षक तैनात करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या
आहेत.
ड्रंक ॲण्ड ड्राईव्हविरोधात विशेष मोहीम
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात (ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह) विशेष मोहीम
राबविण्यात येणार आहे. संशयित मद्यपी वाहनचालकाची तपासणी करून,
त्यात तो दोषी आढळणाऱ्यावर दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात येतील.
सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर देखील कायदेशीर कारवाई केली
जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
मोठा फौजफाटा तैनात
थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात कडेकोट
बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी २००० अधिकारी कर्मचारी, वाहतूक
विभागाचे ३५० अधिकारी कर्मचारी, मुख्यालयातील अतिरिक्त ३०० कर्मचारी,
त्याशिवाय दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलाची ४ पथके, १५० होम गार्ड व
फिरती गस्त पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय परिमंडळ स्तरावर
४४; तर वाहतूक विभागाकडून १८ ठिकाणी नाकेबंदी आणि तपासणी केली
जाणार आहे.
लाऊडस्पीकरसाठी १२ वाजेपर्यंत सूट
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रात्री १० नंतर लाऊडस्पीकर
वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी नववर्षाच्या
निमित्ताने थर्टीफर्स्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजविण्यास सूट
देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित सोसायट्या, पार्टी आयोजकांनी
सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच
ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे
आवाहनदेखील पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पोलिसांचे आवाहन
बेवारस वस्तू, संशयित व्यक्ती, संशयित वाहन, दारू पिऊन वाहन चालविणारे,
मुलींची छेड काढणारे, अफवा पसरविणारे, आढळले तर अशा व्यक्तींची माहिती स्थानिक पोलिसांना अथवा नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकावर त्वरित द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.