Raigad - उरण रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, पेणमधील शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे. कळंबोली येथील विकसक रमेश रामदुलार यादव यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे.]
त्याचबरोबर न्याय न मिळाल्यास कोकण आयुक्तालय कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी घेतला आहे.
रमेश यादव यांनी उरण, पनवेल, पेण तालुक्यातील अनेक शेतजमिनी विकत घेतल्या आहेत; मात्र ठरलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम शेतकऱ्यांना दिली. अनेक शेतकऱ्यांचे ३० ते ४० लाखांपर्यंत व्यवहार असताना प्रत्यक्षात मात्र ५ ते १५ लाख मिळाले आहेत.
अनेकांचे धनादेशही बाऊन्स झालेले आहेत. पीडित शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम दिलीच नाही. शेतकऱ्यांना आजपर्यंत पूर्ण रक्कम मिळालेली नाही. दिगंबर पाटील, तुकाराम शंकर, लक्ष्मण भोईर, विष्णू ठाकूर, गणेश कोळी, वैभव पाटील, यशवंत कोळी, मंदा गुजर यांनी मुख्यमंत्री,
गृहमंत्री, कोकण आयुक्त, अंमलबजावणी संचालनालय, जिल्हाधिकारी रायगड, नवी मुंबई पोलिस आयुक्तालय, पनवेल प्रांताधिकारी, पनवेल तहसीलदार यांच्याकडे संबंधित विकासकवर कारवाई करावी, अशी मागणी पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.
शेतकऱ्यांची जमीन परत मिळाली नाही आणि न्याय मिळाला नाही तर २८ ऑगस्टपासून नवी मुंबईतील कोकण आयुक्त कार्यालयासमोर पीडित शेतकरी बेमुदत उपोषणाला बसणार, असा इशारा देण्यात आला आहे.
जमिनीसंदर्भातील कोणतेही विषय दिवाणी न्यायालयात दाखल केले जातात. शेतकऱ्यांची फसवणूक हा जुना विषय असावा, तो माझ्यापर्यंत आला नाही. काही अडचणी असतील, तर त्यांनी मला भेटावे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. तथ्य असल्यास संबंधित फसवणूक करणाऱ्या विकसकाविरुद्ध तक्रार घेण्यात येईल.
- अनिल पाटील, वरिष्ठ निरीक्षक, पनवेल तालुका पोलिस ठाणे
रायगड जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणूक केलेली नाही. तसेच कोणालाही त्रास दिलेला नाही.
- रमेश रामदुलार यादव, विकसक
कोकण भवनसमोर २८ ऑगस्टपासून उपोषण
जमिनीचा पूर्ण मोबदला न देता पॉवर ऑफ ॲटर्नीनुसार एजंटमार्फत मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे.
तरी नवी मुंबई पोलिस आयुक्त, ईडी, पोलिसांनी गुन्हा नोंदवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा; अन्यथा २८ ऑगस्टपासून कोकण आयुक्त कार्यालयासमोर सर्व शेतकरी कुटुंबीयांसह बेमुदत उपोषणास बसतील, असा इशारा फसवणूक झालेले शेतकरी दिगंबर पाटील यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.