मुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' या वृत्तपत्राच्या अग्रलेखात पार्थ पवार प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. सुशांत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणे हा मूर्खपणा असला तरी महाराष्ट्रातील अनेक अनुभवी, जुनेजाणते लोकही सीबीआयची ‘री’ ओढत आहेत. सीबीआयचा घाव घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता जखमी करायची असा डाव पडद्यामागून रचला जात आहे, हे समजून घेतले पाहिजे. त्याकरिता लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करून घेत नाही ना? अशी शंका घेण्यास वाव आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
पार्थ पवार हे राजकारणात नवीन आहेत. लोकसभेची त्यांची उंच उडी चुकली आहे. त्यांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. घरातच राजकीय व्यायामशाळा आहे. त्यामुळे मल्लखांब वगैरे कसरतीचे प्रयोग करून कसदार बनायची संधी आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे. राजकीय वर्तुळात तसंच सर्वसामान्यांमध्ये सध्या शरद पवार आणि पार्थ पवार यांची चर्चा सुरु आहे. शरद पवारांनी पार्थ पवार यांना अपरिपक्व म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, असंही शिवसेनेनं आपल्या अग्रलेखात लिहिलं आहे. तसंच शरद पवारांचे बोलणे हे 'आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद' यादृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल, असं म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून पार्थ पवार यांना सल्ला दिला आहे.
पक्षाची धुरा सांभाळणाऱयांना अनेकदा ‘कटू’ बोलावे लागते. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा हे कडू घोट स्वकीयांना पाजले आहेत. जाहीरपणे कान उपटले आहेत. महात्मा गांधी, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी इतकेच काय, पंतप्रधान मोदी यांनीही वेळोवेळी स्वकीयांना कडू कारल्याची भाजी खायला घातलीच आहे. प्रकृतीला ती बरी असते. ज्येष्ठांनी असेच वागायचे असते. शरद पवार वेगळे वागले नाहीत,” असं सांगत शिवसेनेने शरद पवार यांची बाजू घेतली आहे.
शरद पवार यांच्या एका वक्तव्यावरून वादळ उठले आहे. म्हटले तर वादळ, म्हटले तर काहीच नाही. हे चहाच्या पेल्यातील वादळही नाही, पण चर्चांचे रवंथ वृत्तवाहिन्यांवर सुरू आहे. चोवीस तास ‘सबसे तेज’ स्पर्धेतील वृत्तवाहिन्यांना मिरची मसाला हवा असतो. त्यामुळे हे लोक त्यांच्या उदरभरणासाठी अशी कृत्रिम वादवादळे निर्माण करीत असतात. आता निमित्त पार्थ यांचे आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे अधूनमधून पत्राद्वारे किंवा सोशल मीडियावर वगैरे आपली मते मांडत असतात. ती अनेकदा दखलपात्र असतातच असे नाही. अजित पवार यांचे पुत्र काहीतरी मत व्यक्त करतात एवढ्यापुरतेच त्याचे महत्त्व,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.
अधिक वाचाः दुसऱ्या टप्प्यातील इमारतींमधील सिरो सर्व्हेक्षणाआधी BMC कडून केलं जातंय 'हे' महत्त्वाचं काम
संपूर्ण पवार कुटुंब हे राजकारणातले तालेवार. हा तालेवारपणा अजित पवारांपर्यंत पोहोचला, पण माणसाची जीभ नियंत्रणात नसेल तर मोठा फटका बसतो. असे फटके अजित पवार यांनी राजकीय प्रवासात अनेकदा खाल्ले. त्यामुळे अजित पवार सावध झाले. सध्या अजितदादांचा त्यांच्या जिभेवर संयम आहे. सध्या मी तोलून मापून बोलतो असे अजित पवार जाहीरपणे सांगत असतात; पण पार्थ हे नवखे असल्याने जरा वेगात बोलतात. त्याचे पडसादही उमटतात. अर्थात छगन भुजबळ यांनी सांगितल्याप्रमाणे चि. पार्थ हे ‘नवे’ आहेत. त्यामुळेच त्यांच्या बोलण्यातून वाद निर्माण होतात. शरद पवार यांनी या वादावर पाणीच ओतले, असं सामनात म्हटलंय.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिस सक्षम आहेत असे गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्पष्ट केलेच आहे व आता शरद पवार यांनीही मुंबई पोलिसांवरच विश्वास व्यक्त केला. राजपूत प्रकरणी सीबीआय वगैरे ठीक आहे हो, पण मुंबई पोलिसांचे काय चुकले ते सांगा. पार्थ पवार यांनी थेट सीबीआयची मागणी करावी हा प्रकार अनेकांना खटकला. त्यामुळे पवार कुटुंबातील धाकल्या पातीस ब्रेक लावण्याचे काम झाले, यात इतके हवालदिल होण्याचे कारण काय? शरद पवारांनी एकप्रकारे पार्थ पवार यांना मार्गदर्शनच केले आहे. पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले. ते जिंकू शकले नाहीत. एका जयपराजयाने कुणालाही शिखर गाठता येत नाही वा कायमची घसरणही होत नाही,” असं या लेखात म्हटलं आहे.
शरद पवार हे आयुष्यभर माणसांत राहिले, जमिनीवरचे राजकारण त्यांनी केले. अजित पवार, सुप्रिया सुळेही तेच करीत आहेत. पवारांच्या तिसऱया पिढीने तोच मार्ग स्वीकारला तर वादळे निर्माण होणार नाहीत. पार्थ पवार यांनी राममंदिराचे स्वागत केले यात चुकीचे काहीच नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मर्जीने राममंदिर होत आहे, अयोध्येत राममंदिर होणे ही लोकभावना आहेच. त्या लोकभावनेच्या प्रवाहात सामील व्हायचा अधिकार प्रत्येकाचा आहे. पार्थ पवार यांचाही आहे. पण ते ज्या पक्षात काम करतात त्या पक्षाचे वेगळे मत असेल तर मतभिन्नतेचे स्फोट घडतात. स्वतः राहुल, प्रियंका गांधी हे त्या प्रवाहात सामील झाले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अयोध्यावारी केली तेव्हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँगेसने कसलीच खळखळ केली नव्हती. किंबहुना ज्या श्रद्धेने आपण सगळे पंढरपूरला विठोबाचे दर्शन घेतो त्याच श्रद्धेने उद्धव ठाकरे हे अयोध्येत जात आहेत, टीका कसली करता? असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले होते. फक्त पार्थप्रमाणे लांबलचक पत्र लिहून मत मांडले नव्हते,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.
Saamana editioral artical on sharad pawar and parth pawar shivsena role clear
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.