Hitendra Thakur esakal
मुंबई

Sakal Survey : पालघरात बहुजन विकास आघाडीचाच वरचष्मा

प्रसाद जोशी

महाविकास आघाडीने युती करून या जागेवर उमेदवार दिल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतात.

पालघर (Palghar) जिल्ह्यातील विधानसभेच्या (Assembly Election 2021) सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ हे बहुजन विकास आघाडीच्या Bahujan Vikas Aghadi (बविआ) ताब्यात आहेत. वसई-विरार महापालिकेवरही (Vasai-Virar Municipal Corporation) ‘बविआ’ची एकहाती सत्ता आहे. उर्वरित तीन मतदारसंघात सीपीएम (CPM), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी पक्षाची (Nationalist Congress Party) सत्ता आहे. जिल्ह्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहिल्यास, जिल्ह्यात ‘बविआ’चे वर्चस्व असल्याचे दिसून येते.

2019 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी विक्रमगड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील भुसारा (Sunil Bhusara) आणि भाजपचे डॉ. हेमंत सावरा (Hemant Savara) यांच्यात थेट लढत झाली होती. त्यात भुसारा विजयी झाल्याने राष्ट्रवादीने विक्रमगडमध्ये पकड निर्माण केली. पुढल्या विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून सुनील भुसारा व नीलेश सांबरे दावेदार मानले जात आहेत. सांबरे यांचे विक्रमगड परिसरात काम चांगले आहे. त्यामुळे त्यांना लॉटरी लागू शकते. डहाणू मतदारसंघ हा सीपीएमचा बालेकिल्ला आहे. भाजपचे पास्कल धनारे यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करून सीपीएमचे विनोद निकोले यांनी गड राखला. याठिकाणी अन्य पक्षाची ताकद वाढली नाही. महाविकास आघाडीने युती करून या जागेवर उमेदवार दिल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतात.

पालघर मतदारसंघातून भाजपचे चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने आमदारकीचे तिकीट दिले आणि ते निवडून आले. त्यामुळे सेनेची ताकत आणखी वाढली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतही सेनेने बाजी मारली. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पालघरमध्ये काँग्रेस, मनसेनेदेखील जोर लावला होता, तरी काँग्रेसच्या सुधीर नम आणि मनसेच्या उमेश गोवारेंचा पराभव झाला होता. भाजपची बांधणी या मतदारसंघात कमी आहे. महाविकास आघाडीने युती केल्यास शिवसेनेचा मतदारसंघावर दावा असेल, परंतु त्यामुळे अन्य पक्षातील बंडाळी देखील निर्माण होऊ शकते.

बोईसर मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी सेनेचे उमेदवार विलास तरे आणि अपक्ष संतोष जनाठे यांना मागे टाकत विजयी झाले होते; परंतु सद्यस्थितीत या मतदारसंघातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी सेनेने वर्चस्व निर्माण केले आहेत. पंचायत समितीच्या तीन आणि जिल्हा परिषदेवर दोन जागा सेनेने मिळवल्या. त्यामुळे तरे यांच्याकडून पक्षबांधणी जोरात सुरू असल्याचे दिसून येते. तरे यांचा गेल्या विधानसभेत पराभव झाला असला, तरी त्यांचा मतदारांशी असलेला दांडगा जनसंपर्क भविष्यात बविआला धोका निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे. नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेने स्थानिक चेहरा न देता माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिली होती; परंतु त्याचा सेनेला कोणताही फायदा झाला नाही. बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर यांनी मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला.

वसई मतदारसंघ हा हितेंद्र ठाकूर यांचा गड मानला जातो. याठिकाणी त्यांनी विजय मिळवून पुन्हा आमदारकीचा बहुमान मिळवला. त्यामुळे वसई विधानसभा क्षेत्रात राजकीय दबदबा निर्माण केला आहे. वसई-विरार शहर महापालिका निवडणुका लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. तीन प्रभाग एकत्र केल्याने हे बहुजन विकास आघाडीला फायदेशीर ठरणार आहे. शिवसेना, भाजप, मनसे, आम जनता पार्टी आपले नशीब आजमावणार आहे. वसई-विरार शहर महापालिकेत ११५ पैकी १०९ नगरसेवक हे बविआचे, तर पाच शिवसेना आणि एक नगरसेवक भाजपचा आहे. येत्या निवडणुकीत प्रभागांची संख्या वाढणार आहेत. महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीने युती केल्यास सेनेला अधिक जागा मिळतील आणि त्याचा फटका भाजपला बसू शकतो. युती न झाल्यास मात्र सेनेला ताकद लावावी लागणार आहे; अन्यथा बविआच्या नगरसेवकांची संख्या निश्चित वाढेल. वसई-विरार शहरासाठी खोलसापाडा पाणी योजना, अमृत योजनांमुळे आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुल, पाईपलाईन गॅस, कोरोनाकाळात नागरिकांसाठी केलेली धावपळ, आरोग्यसुविधा व अन्य विकास कामे बहुजन विकास आघाडीने केली आहे.

भाजप-पालघर जिल्ह्यातून हद्दपार झाली तर काँग्रेसचे देखील राजकीय अस्तित्व दिसत नाही. मनसे, जनता दलासह आम आदमी पार्टीकडेदेखील मतदारांचा कौल अत्यल्प आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सेना, बहुजन विकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे; तर वसई-विरार शहर महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडी सत्ता पुन्हा मिळवेल, असे भाकीत राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे.

...तर ठाकूर यांच्या पारड्यात पालकमंत्री

विधानसभा निवडणुका आणि वसई-विरार शहर महापालिकेत सेना, बहुजन विकास आघाडीची युती झाल्यास भविष्यात बविआ सेनेसोबत असेल. त्याचबरोबर विधानसभा आणि महापालिकेत सत्ता असल्याने भविष्यात ठाकूरांच्या पदरात पालकमंत्री पद देखील पडू शकते. त्यामुळे सरकारसोबत बविआ देखील मोठा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही; परंतु राजकीय निर्णय घेताना अनुभवाचा वापर करणारे हितेंद्र ठाकूर हे कोणता निर्णय घेतील यावर सारे राजकीय गणित अवलंबून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT