'हिंदुत्व' हा मुद्दा या जिल्ह्याचा प्राण आहे. त्यामुळं विकासाच्या नव्हे, तर भावनिक मुद्द्यांवरच येथील निवडणुकांचा निकाल लागतो, हा आतापर्यंतचा इतिहास आहे.
एकेकाळी काँग्रेसचे (Congress) वर्चस्व पाहिलेला, पुढे संघ विचारसरणीमुळे भाजपचा वरचष्मा असलेल्या ठाणे जिल्ह्याची आता शिवसेनेचा (Shivsena) मजबूत बालेकिल्ला म्हणून ओळख आहे. ९० च्या दशकानंतर जिल्ह्यात सर्वाधिक प्रालभ्य शिवसेनेचे होते. या गडाला २०१४ मध्ये पहिला तडाखा बसला. भाजपसोबत युती तुटल्यानंतर मोदी लाटेमध्ये जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी (Nationalist Congress Party) हे दोन्ही पक्ष मागे पडले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2021) जिल्ह्यातील प्रमुख लढत ही शिवसेना आणि भाजप या दोनच पक्षांमध्ये आहे. आपला गड पुन्हा मजबूत करण्यासाठी शिवसेनेने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याची रंगीत तालीम ही आगामी पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
ठाणे जिल्ह्यात एकूण तीन लोकसभा, १८ विधानसभा, सहा महापालिका, दोन नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायती आहेत. तीन लोकसभांपैकी दोन शिवसेनेकडे, तर एक भाजपकडे आहे. १८ विधानसभांमध्ये आठ भाजपचे, शिवसेनेचे सहा, राष्ट्रवादीचे दोन आणि अपक्ष, समाजवादी, मनसे प्रत्येकी एक आमदार निवडून आले आहेत. सहा महापालिकांपैकी ठाणे, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर (कलानी गटाच्या मदतीने) या तीन महापालिका शिवसेनेकडे आहेत. मिरा- भार्इंदर पालिकेवर भाजपची सत्ता आहे. भिवंडी पालिकेवर कोणार्क आघाडी; तर नवी मुंबईत राष्ट्रवादीची सत्ता होती. अंबरनाथ, कुळगाव बदलापूरमध्ये शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मुंबईपेक्षाही ठाण्यात शिवसेनेचे प्राबल्य जास्त पाहायला मिळते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र थोडे बदलले. मोदी लाटेत शिवसेनेच्या गडाला तडे जाण्यास सुरुवात झाली. २०१४ ला शिवसेनेचे आठ आमदार होते, हीच संख्या २०१९ मध्ये सहावर आली. जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपचे सर्वाधिक मतदार आहेत. हिंदुत्व हा मुद्दा या जिल्ह्याचा प्राण आहे. त्यामुळे विकासाच्या नव्हे, तर भावनिक मुद्द्यांवरच येथील निवडणुकांचा निकाल लागतो, हा आतापर्यंतचा इतिहास आहे.
आज निवडणूक झाल्यास या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. जिल्ह्यातील प्रमुख विधानसभा मतदारसंघ म्हणून ठाण्याची ओळख आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांचा पराभव करून भाजपचे संजय केळकर आमदार झाले. हा शिवसेनेला सर्वात मोठा झटका होता. पुढे २०१९ ला युती झाल्यानंतरही हा मतदारसंघ भाजपच्याच ताब्यात गेला; मात्र २०२४ किंवा त्यापूर्वी निवडणूक झाल्यास हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवसेना संपूर्ण ताकद लावण्याची शक्यता आहे. त्यात जर भाजपने मनसेशी युती केल्यास मोठा संघर्ष करावा लागेल. मराठीबहुल मतदार असलेल्या या मतदारसंघात संघ विचारसणी आणि मराठी हाच मुद्दा मतदानावर परिणाम करणारा ठरेल. त्यामुळे येथे उमेदवार देताना शिवसेनेला तितक्याच ताकदीचा चेहरा द्यावा लागेल.
ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवाडा आणि जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण पश्चिम या चारही मतदारसंघांवर शिवसेनेचे प्राबल्य कायम राहील, असेच सध्याचे चित्र आहे. नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूरच्या दोन जागाही शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. विद्यमान भाजप आमदार गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांना फटका बसण्याची शक्यता आहे. २००० मध्ये शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर गणेश नाईक राष्ट्रवादीच्या गोटात गेले. तेव्हापासून ते नियमित राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येत होते; मात्र अंतर्गत गटबाजीमुळे मंदा म्हात्रे यांनी आधी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यापाठोपाठ मोदी लाट आणि राज्यात भाजपचे वाहते वारे पाहून गणेश नाईक यांनीही निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश घेतला होता; पण या शहरांमध्ये भाजप रुजवायला तितकेसे यश आलेले नाही, तर दुसरीकडे महाविकास आघाडी झाल्यास या दोन्ही जागा राष्ट्रवादी शिवसेनेसाठी सोडण्याची शक्यता आहे.
शहापूर आणि कळवा- मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यापैकी कळवा- मुंब्रामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची उमेदवारी कायम राहील; मात्र शहापूरचा निकाल अनपेक्षित लागण्याची शक्यता आहे. २०१४ साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले पांडुरंग बरोरा यांनी २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश घेतला, तर शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने दौलत दरोडा राष्ट्रवादीच्या गोटात गेले आणि विजयी झाले; मात्र आमदार दरोडा यांचा आतापर्यंत दोन वर्षांचा कार्यकाळ निराशाजनक राहिला आहे. त्यामुळे बरोरा यांनी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वास्तविक शहापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे ही जागा आघाडी झाल्यास किंवा न झाल्यासही ताब्यात घेण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असेल.
मिरा- भार्इंदरमध्ये भाजपचे वर्चस्व आहे; मात्र २०१९ मध्ये केवळ वादग्रस्त नरेंद्र मेहता यांना नाकारण्यासाठी येथील मतदारांनी अपक्ष उमेदवार गीता जैन यांना निवडून आणले. गीता जैन या भाजपच्या विद्यमान नगरसेविकाही आहेत. त्यामुळे त्या पुन्हा भाजपमध्येच जातील असा विश्वास येथील मतदारांना होता. पुढे त्यांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली असली, तरी प्रत्यक्षात पक्षप्रवेश केलेला नाही. तसे केल्यास आगामी निवडणुकीत त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे या मतदारसंघात जोर कमी आहे. त्यामुळे शिवसेनेच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवल्यास किंवा भाजपने नवीन चेहरा दिल्यास येथील निवडणूक चुरशीची होईल.
डोंबिवली, कल्याण पूर्व, मुरबाड, उल्हासनगर हे मतदारसंघांमध्ये सध्या भाजपचे आमदार आहेत. डोंबिवलीत मोदी लाट व संघाशी निगडित मतदार असल्यामुळे भाजपला त्याचा फायदा होताना दिसत आहे. मुरबाडमध्ये किसन कथोरे यांना सध्या तरी कोणता धोका दिसत नाही; पण उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढल्यामुळे येथे ते घड्याळाच्या चिन्हावर निवडून येण्याची शक्यता आहे. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनाही मोदी लाटेचा फायदा झाला होता. तो या वेळी होईलच असे सांगता येणार नाही; शिवाय हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी शिवसेना शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे दिसते.
राज्यातील मनसेचा एकमेव आमदार निवडून आलेल्या कल्याण ग्रामीणचे राजू पाटील यांचेही अस्तित्व पणाला लागले आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचाच; पण २०१९ च्या निवडणुकीत विद्यमान आमदार सुभाष भोईर यांचा पत्ता आयत्या वेळी कापून रमेश म्हात्रेंना उमेदवारी देण्यात आली. मतदारसंघ ग्रामीण म्हणून ओळखला जात असला, तरी सुशिक्षित डोंबिवली शहराचा मोठा भाग या मतदारसंघात येतो. त्यामुळे पुढील निवडणुकीत हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घ्यायचा असल्यास सुशिक्षित चेहरा शिवसेनेला द्यावा लागेल.
भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण, पूर्व आणि पश्चिम असे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी ग्रामीण- शिवसेना आणि पूर्व- समाजवादी पार्टी, तर पश्चिमध्ये भाजपचे आमदार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री असलेले कपिल पाटील याच मतदारसंघाचे नेतृत्व करत असल्याने हे तिन्ही मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपची रणनीती आहे. हा भाग मुस्लिमबहुल असल्याने एमआयएम, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा शिवसेना किंवा भाजपला होण्याची शक्यता आहे.
आघाडी की मैत्रीपूर्ण लढत
काँग्रेसचे प्राबल्य जिल्ह्यात जवळपास संपुष्टात आले आहे. भिवंडी वगळता महापालिकांमध्येही अस्तित्व धोक्यात आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे चार प्रमुख पक्ष स्वतंत्र्यरीत्या निवडणूक लढल्यास भाजपच्या पथ्यावर पडेल. ठाणे, नवी मुंबई, मिरा- भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली, कल्याण या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी- शिवसेना आघाडी झाल्यास येथील किमान तीन ते चार जागा आघाडीच्या वाढतील. यामध्येही ठाणे, नवी मुबंईतील तीन जागा प्रतिष्ठेच्या ठरतील. असे असले तरी जिल्ह्यात मुख्य लढत शिवसेना-भाजपमध्ये असेल. महाविकास आघाडी झाल्यास त्याचा फायदा घटक पक्षांना मिळणार नाही. त्यामुळे भाजपचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघामध्ये आघाडी होऊन उर्वरित ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.
महापालिकांच्या निवडणुकांमध्ये रंगीत तालीम
ठाण्यासह जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. या निवडणुकाच विधानसभेची रंगीत तालीम ठरणार असल्याचे मानले जात आहे. जिल्ह्यातील सहापैकी तीन महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहेत. यामध्ये ठाणे महापालिकेवर शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळेल, असा कल दिसतो. कल्याण- डोंबिवलीत शिवसेनेची सत्ता असली, तर ती एकहाती नाही. येथील २७ गावांचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल. राष्ट्रवादी, काँग्रेसचे येथे वर्चस्व नाही. मनसेचाही प्रभाव काहीसा कमी झालेला आहे. त्यामुळे लढत थेट शिवसेना, भाजपमध्ये होईल. नवी मुंबई महापालिकेतही हेच चित्र पाहायला मिळेल. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली ही महापालिका भविष्यात शिवसेना- राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता आहे. मिरा-भार्इंदर महापालिकेवर भाजपची सत्ता कायम राहील, असेच दिसते. भिवंडी आणि उल्हासनगर या दोन महापालिकांमध्ये मात्र बरीच उलथापालट होण्याची शक्यता आहे. उल्हासनगरमध्ये महाविकास आघाडी झाली आहे, तर भिवंडीत सर्वाधिक नगरसेवक असतानाही काँग्रेसमधील गटबाजीमुळे कोणार्कचा महापौर विराजमान झाला. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसचे अस्तित्व पणाला लागले आहे.
महत्त्वाचे चेहरे
नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे हे प्रत्येक निवडणुकीत गेमचेंजरच्या भूमिकेत दिसतात. महापालिकांमध्ये सत्तास्थापनेच्या वेळी ते संपूर्ण बाजी पलटवून सत्तेचा झेंडा फडकवत असल्याचा अनुभव आतापर्यंत आहे. याशिवाय भाजपचे आमदार संजय केळकर, रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्याभोवती जिल्ह्याचे राजकारण फिरत असल्यामुळे हेच महत्त्वाचे चेहरे मानले जात आहेत. याशिवाय भाजपचे आमदार किसन कथोरे हे ग्रामीण भागात सक्रिय आहेत.
मतदारसंघ आणि विद्यमान आमदार
ठाणे- संजय केळकर (भाजप)
कोपरी- पाचपाखडी - एकनाथ शिंदे (शिवसेना)
ओवळा- माजिवाडा- प्रताप सरनाईक (शिवसेना)
कळवा- मुंब्रा- जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)
मिरा- भार्इंदर- गीता जैन (अपक्ष)
ऐरोली- गणेश नाईक (भाजप)
बेलापूर- मंदा म्हात्रे (भाजप)
कल्याण पूर्व- गणपत गायकवाड (भाजप)
कल्याण पश्चिम- विश्वनाथ भोईर (शिवसेना)
कल्याण ग्रामीण- प्रमोद (राजू) पाटील (मनसे)
डोंबिवली- रवींद्र चव्हाण (भाजप)
अंबरनाथ- बालाजी किणीकर (शिवसेना)
उल्हासनगर- कुमार आयलानी (भाजप)
भिवंडी पश्चिम- महेश चौगुले (भाजप)
भिवंडी पूर्व- रईस शेख (समाजवादी)
भिवंडी ग्रामीण- शांताराम मोरे (शिवसेना)
मुरबाड- किसन कथोरे (भाजप)
शहापूर- दौलत दरोडा (राष्ट्रवादी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.