Shetkari Kamgar Paksh esakal
मुंबई

..असं झालं तर 'शेकाप'ला निवडणूक जिंकण्याची संधी

महेंद्र दुसार

महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि पुन्हा निवडणुका लागल्यास रायगडमधील विधानसभेतील चित्र फार वेगळे असेल.

भाजपला (BJP) बाजूला ठेवून महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यापासून हे सरकार काही दिवसांतच पडेल, असा दावा भाजपकडून वारंवार केला जात आहे. बघताबघता दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि पुन्हा निवडणुका लागल्यास रायगडमधील विधानसभेतील (Raigad Assembly Election 2021) चित्र फार वेगळे असेल. आजच्या घडीला जिल्ह्यातील सात आमदारांपैकी भाजप आणि शिवसेनेचे (Shivsena) प्रत्येकी तीन आणि राष्ट्रवादीचा एकमेव आमदार आहे. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात अनेक आरोप, प्रत्यारोप, घटना, भ्रष्टाचाराची प्रकरणे, सरकारी यंत्रणांचा वापर करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

विधानसभेच्या अचानक निवडणुका घोषित झाल्यास शेतकरी कामगार पक्षाला त्याचा चांगला फायदा होईल. सध्या शेतकरी कामगार पक्षाचा (Shetkari Kamgar Paksh) विधानसभेवर रायगडमधून प्रतिनिधित्व करणारा एकही आमदार नाही. अलिबाग, पेण हे शेकापचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात; मात्र मागील निवडणुकीत अलिबागमध्ये सुभाष (पंडित) पाटील आणि पेणमधून धैर्यशील पाटील यांना पराभव पत्करावा लागला. या दोन्ही मतदारसंघात शेकापचे उमेदवार सातत्याने विजयी झालेले आहेत. या पक्षाची चांगली कामेदेखील या मतदारसंघात आहेत; परंतु बदल म्हणून येथील मतदारांनी शिवसेना आणि भाजपला मतदान केले होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये या दोन्ही पक्षांकडे मतदारांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. उरण, पनवेल या मतदारसंघात शेकापचा प्रभाव दिसून येईल. एकेकाळी शेकापची ताकद असलेले हे दोन्ही मतदारसंघ होते. आजही जिल्हा परिषदेमध्ये याच भागातून शेकापचे सर्वाधिक सदस्य प्रतिनिधित्व करीत आहेत.

सोयीच्या आघाड्या हे ‘रायगड पॅटर्न’चे वैशिष्ट्य राहिलेले आहे. हेच वैशिष्ट्य मध्यवर्ती निवडणुकांमध्येही दिसू शकते. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी पुढाकार घेत ज्याठिकाणी भाजपचे वर्चस्व असेल त्याठिकाणी शिवसेना, शेकाप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congress Party) यांनी एकत्र येत भाजपविरोधात मोर्चेबांधणी करण्याचे ठरले होते. यास काही प्रमाणात यश येत आहे. मात्र यातून काही विचित्र आघाड्या होण्याची जास्त शक्यता आहे. अलिबागमध्ये शेकाप-राष्ट्रवादी, पेणमध्ये भाजप-शिवसेना, कर्जतमध्ये राष्ट्रवादी-शेकाप, महाडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी अशा अंतर्गत आघाड्या स्थानिक पातळीवर होऊ शकतात. यास श्रीवर्धन मतदारसंघ अपवाद असून या मतदारसंघात राष्ट्रवादीला कोणाबरोबर आघाडी करण्याची गरज नाही. श्रीवर्धनमध्ये एकहाती सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने आपली ताकद लावल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादीचा एकच आमदार असतानाही पालकमंत्री पदाची संधी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना देण्यात आली आहे. शिवसेनेचे तीन आमदार अनुभवी असतानाही त्यांना डावलण्यात आल्याने पालकमंत्री पदावरून वादंग उठले होते. कोरोना कालावधीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सर्वाधिक नाराजीचा सामना करावा लागला. निवडणुकीतही विरोध होण्याची शक्यता अधिक आहे. कोविडदरम्यान झालेल्या चुका, निर्णय घेण्यास झालेला विलंब, रखडलेले प्रकल्प हे प्रमुख कारण आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीचे असमान वाटप होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीवर मित्रपक्षही सातत्याने करत आलेले आहेत. त्याचे पडसाद निवडणुकीमध्येही दिसू शकतात. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आपल्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शेकापचे आमदार जयंत पाटील, सुभाष (पंडित) पाटील, महेंद्र दळवी, भरत गोगावले यांनी जाहीर सभांमध्ये आरोप केलेला आहे. डोईजड झालेल्या राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांनाही बाजूला ठेवण्याचे काम सुनील तटकरे करीत असल्याची खदखद येथील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे सत्ताधारी असूनही राष्ट्रवादीला जनतेच्या रोषाला सर्वाधिक सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

पक्षांतर्गत नाराजीचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. कर्जतमध्ये महेंद्र थोरवे यांना पुन्हा निवडून येण्यासाठी गटबाजांना शांत करावे लागेल, त्याचप्रमाणे अलिबाग-मुरूड मतदारसंघातही महेंद्र दळवी यांचे काही कार्यकर्ते नाराज आहेत. शेकापने या नाराज कार्यकर्त्यांना जवळ केल्याने महेंद्र दळवी यांनाही सहजासहजी विजय मिळवणे कठीण जाणार आहे. मध्यावधी निवडणुकीचा सर्वाधिक फायदा शेकापला होऊ शकतो; परंतु अलिबाग मतदारसंघात गृहकलहाचा फटका शेकापलाच बसू शकतो. पाटील कुटुंबीयांच्या हातात असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा भावी प्रतिनिधी कोण असेल यावरून वाद आहे. मागील निवडणुकीच्या तोंडावर हा वाद दिसून आला. हा वाद पुन्हा उफाळून आल्यास शेकापची अस्तित्वाची लढाई धोक्यात येईल, असे मतदारांनी मांडलेल्या मतावरून दिसून येते.

एकेकाळी कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या रायगड जिल्ह्यात कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. महेंद्र घरत यांच्याकडे कॉंग्रेसचे नेतृत्व आल्यानंतर थोड्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला आहे; परंतु हा उत्साह विरोधकांवर मात करण्यासाठी पुरेसा ठरणार नाही. महाडमध्ये माजी आमदार माणिक जगताप आणि अलिबागमध्ये माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या निधनाने येथे कॉंग्रेसचे फार मोठे नुकसान झालेले आहे. कॉंग्रेस व्यतिरिक्त मनसे, बहुजन वंचित आघाडी यांचे अस्तित्व नगण्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT