मुंबई: राज्यातील मत्स्यव्यवसायाचे केंद्र असलेल्या ससून डॉकचा व्यवसाय बंद होण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत. राज्याच्या मत्स्योद्योग विकास महामंडळाने गोदामे रिकामी करण्याची नोटीस पाठवली आहे. व्यापाऱ्यांची 22 गोदामे बंद झाल्यास पूर्ण मासळी बाजारच बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ससून डॉकमध्ये राज्यासह गुजरातमधील मासेमार मासे विक्रीसाठी येतात. हे 22 व्यापारी त्यांच्याकडून मासे विकत घेऊन परदेशात, देशात तसेच संपूर्ण मुंबईत विक्रीसाठी पाठवतात. 145 वर्षांचे हे भारतातील सर्वांत जुने मासे व्यापाराचे बंदर आहे. ही जमीन मुंबई विश्वस्त मंडळाची (बीपीटी) आहे. मत्स्योद्योग विकास महामंडळाने ही पोर्ट ट्रस्टची जमीन भाड्याने घेतली असून त्यात या 22 व्यापाऱ्यांना पोटभाडेकरू ठेवले आहे. हे व्यापारी महामंडळाकडे भाडे भरत असताना महामंडळाने मात्र हे भाडे गेल्या काही वर्षांपासून बीपीटीला न दिल्याने बीपीटीने ही गोदामे रिकामी करण्यास सांगितले होते. त्यानंतर मत्स्यव्यावसायिकांनी यासंदर्भात आंदोलने करून यावर तोडगा काढण्यासाठी 2015 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत थकलेल्या भाड्याच्या मोबदल्यात राज्य सरकारने बीपीटीला जालना येथे ड्राय पोर्टसाठी जमीन देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु गेल्या पाच वर्षांत याची अंमलबजावणी न झाल्याने आता पुन्हा गोडाऊन रिकामी करण्याच्या नोटिसा आल्या आहेत. या नोटिसांमुळे ससून डॉक येथील मत्स्यव्यावसायिक संकटात सापडला आहे.
नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत राज्य आणि केंद्र शासनाच्या संमतीने हा वाद मिटला होता. यासंदर्भात ठरावसुद्धा झाला आहे; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने पुन्हा एकदा गोडाऊन रिकामे करण्यासाठी नोटिसा मिळाल्या आहेत. यावर केंद्र आणि राज्य शासनाने एकत्र बसून तोडगा काढून मत्स्यव्यावसायिकांना न्याय द्यावा. गोडाऊनच राहिले नाही, तर संपूर्ण व्यवसायच बंद होईल.
- कृष्णा पवळे, मत्स्यव्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.