Shinde Vs Bjp : कल्याण पूर्व मध्ये एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गुन्हेगारी देखील तितकीच फोफावत आहे. असे असताना भाजप व शिवसेना शिंदे गट मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये गुंतले आहेत. पक्षाचे चिन्ह भिंतीवर रंगवण्यावरून भाजप शिंदे समर्थक आपापसात काल भिडले होते.
त्यानंतर रात्री याच प्रकरणा वरून समाज माध्यमातील एका ग्रुपवर आमदार गणपत गायकवाड व शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड एकमेकांना भिडले. अनधिकृत बांधकाम तसेच भ्रष्टाचार यावरून एकमेकांचे वाभाडे यावेळी दोघांनी काढले असून त्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वरिष्ठ पातळीवर सारे काही आलबेल असले तरी स्थानिक पातळीवर पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात कुरबुरी असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. बुधवारी कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात भाजपचे कार्यकर्ते पक्षाचे चिन्ह भिंतीवर रंगवत असताना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या समर्थकांनी त्यांना विरोध केला. यावरुन झालेल्या बाचाबाची मध्ये दोन्ही समर्थक आपआपसात भिडले व भाजपच्या समर्थकांना बेदम मारहाण केली.
या घटनेनंतर भाजपा व शिंदे दोन्ही गटाचे समर्थक कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जमले होते, तेथेही महिला कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. ही घटना होत नाही तोच सायंकाळी कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला करत तिची हत्या झाल्याची घटना घडली. ही घटना घडूनही भाजप व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मात्र त्याचे काहीही सोयरे सुतक नसल्याचे दिसून आले.
बुधवारी रात्री समाज माध्यमावरील एका ग्रुप मध्ये कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि कल्याण शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात शाब्दिक चकामक झाली. यात एकमेकांना शिंतोडे उडवत आरोप प्रत्यारोप करण्यात आले. यामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप एकमेकांवर केले गेले. तसेच कोविड आणि अनधिकृत बांधकाम रजिस्टेशन मध्ये कोणी किती पैसे खाल्ले आणि भ्रष्टाचार केला याचे आरोप सुद्धा झाले.
अगदी खालच्या पातळीवर जाऊन टिका करण्यात आली. यामध्ये दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते देखील या चर्चेदरम्यान एकमेकांशी भिडले. गुरुवारी दोन्ही नेते सायंकाळी 5 वाजता लोकांसमोर येणार असून चर्चा करणार असल्याचे बोललेत जात आहे.
एकीकडे कल्याण पूर्वेकडील तीसगावं परिसरातील राहणारी अल्पवयीन मुलगी तिच्या आईसह घरात जात असताना एका तरुणाने तिच्यावर चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली असताना या घटनेचे गांभीर्य नाही का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यावर काय प्रतिक्रिया देतात हे पहावे लागेल.
आपण सर्व लोकप्रतिनिधी आहोत,कल्याण मध्ये दुःखद घटना घडली आहे,असे प्रकार होऊ नये म्हणून पक्षाचे मतभेद दूर ठेवुन कल्याण पूर्वेतील नागरिक कसे सुरक्षित राहतील याकडे पाहू - शदर पाटील, उद्धव ठाकरे गटातील पदाधिकाऱी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.