मुंबई: मराठी भाषा भवन, रोहिदास भवन, डबेवाला भवन, मराठी रंगभुमी भवन यानंतर आता शिवसेनेने 'उर्दू भाषा भवन' उभारण्याची घोषणा केली आहे. भायखळा येथे उर्दू भाषा भवन उभारण्यात येणार असून त्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूदही महानगर पालिकेकडून करण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अर्थसंकल्पात ही तरतूद केली आहे. हे भवन फक्त मुस्लिमांसाठीच नसून उर्दू भाषेच्या अभ्यासकांसाठीही खुलं असेल. यात, उर्दू भाषेतील साहित्यदेखील उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, उर्दू भाषेसंदर्भातील कार्यक्रमांसाठी या भवनाची जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी उर्दू भाषा भवनाबद्दलची संकल्पना आहे, अशी माहिती यशवंत जाधव यांनी दिली.
उर्दू भाषा भवन नक्की कसं असावं? या भवनामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला जाऊ शकतो? त्यात काय काय असायला हवं? याबाबतीत नीट विचार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नियुक्त केली जावी, असा विचार पालिकेकडून केला जात आहे. मुंबईत सध्या 15 ते 18 लाख मुस्लीम मतदार आहेत. आगामी महानगर पालिकेत ही मते शिवसेनेसाठी निर्णायक आहेत. मुंबईतील अनेक भागात गेल्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचा पारंपारिक मतदार स्वत:च्या बाजूने वळवण्यात यश मिळवलं होतं. त्यामुळे आता नव्या मतदारांची मोट बांधण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून उर्दू भाषा भवन उभारण्याची घोषणा आहे असं मानलं जात आहे.
मुंबईत उर्दू भाषा भवन उभारण्याचा निर्णय चांगला आहे. समाजवादी पक्षानेही अशी मागणी केली होती. मात्र, अवघ्या दीड कोटी रुपयांमध्ये हे भवन कसे उभे राहणार? असा आम्हाला प्रश्न आहे. उर्दू भाषा भवन उभारणीची घोषणा ही केवळ निवडणुकीपुरती घोषणा ठरू नये अशी अपेक्षा.
- आमदार रईस शेख, समाजवादी पक्षाचे गटनेते
दरम्यान, शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील विभाग प्रमुख पांडूरंग सकपाळ यांनी गेल्या वर्षी अजान स्पर्धा घेण्याची घोषणा केली होती. त्या स्पर्धेवरुन शिवसेनेच्या भुमिकेवर अनेकांनी प्रश्न निर्माण केले. त्यानंतर ही स्पर्धा मी आयोजित केली नसल्याचे पांडुरंग सकपाळ यांच्याकडून सांगण्यात आले. अखेरीस ती स्पर्धा झालीच नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.