मुंबई

तुमच्या घरात बसण्याची किंमत अब्जावधींत...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये भारतात मोठ्या प्रमाणात परदेशी बनावटीच्या फॅन्सी गाड्यांची बाजारपेठ वाढली. कंपन्यांची नुसती नाव घ्यायची म्हंटली तरी देखील सर्वसामान्यपणे "कितना देती है" म्हणणाऱ्या भारतीय मानसिकतेपुढेही न झुकणाऱ्या अशा या गाड्यांच्या किंमती असतात. एरवी आपल्या आवाक्याबाहेरच्या वाटणाऱ्या या महागड्या गाड्या गेल्या पाच-दहा वर्षात अगदी सहजपणे आपल्या आयुष्याचा भाग झाल्या. केवळ चित्रपटांमध्ये पाहू शकणाऱ्या लांब तोंडांच्या या गाड्या भारतीयांच्या अगदी नाकापुढे नाचायला लागल्या.

मध्यंतरी मित्राच्या अशाच एका महागड्या गाडीतून प्रवास करीत असताना त्या गाडीला अपघात झाला. आम्हाला फार दुखापत झाली नाही. गाडीला मात्र दवाखान्यात भरती करायला लागलं. गाडीच्या कार्यशाळेच्या व्यवस्थापकांशी त्यावेळी काहीशी बातचीत झाली, तेव्हा त्यांनी सांगितलेली माहिती फार मजेशीर वाटली. मी त्यांना म्हंटल की किती सहजपणे घ्यायला लागलोत ना या इतक्या महागड्या गाड्या आपण. भारतीय माणसाची पैसे मोजण्याची ताकद वाढलीये खरं. तेव्हा ते म्हणाले अहो कुठे महाग राहिल्यात या गाड्या आता आपल्यासाठी. मला थोडा प्रश्न पडला. तेव्हा माझा प्रश्नांकित चेहरा पाहुन व्यवस्थापकांनी जरा विस्तृत उत्तर दिलं. ते म्हणाले पहा, या मोठ्या कंपन्या दररोज आपली उत्पादने घेऊन भारतीय बाजारपेठांमध्ये उतरताहेत.

रोज कितीतरी नव्या कंपन्याच्या गाड्या रस्त्यावर धावताना दिसत असतील तुम्हाला. पण जेवढ्या किंमतीला या गाड्या पाश्च्यांत्य देशांमध्ये विकल्या जातात तेवढी किंमत ते लावत नाही भारतीयांना. मी जरा अचंबित झालो. म्हंटल हे उपकार का आणि कशासाठी तर त्यांनी लगेच खुलासा केला. ते म्हणाले, आपल्यासोबत व्यवसाय करण्यात त्यांना इतका सर का असतो. कारण त्यांना मानसिकता माहिती झालीये आपली. युरोपात वगैरे माणसं गाड्या विकत घ्यायला जातात तेव्हा ती गाडी त्याच्यासाठी आणि त्यांच्या कुटूंबासाठी किती सुरक्षित आहे, हे पाहतो तो आधी. त्या गाडीत सुरक्षा यंत्रणा कुठली आहे, किती एअरबॅग्झ आहेत, ब्रेकिंग सिस्टीम कशी आणि कुठली आहे. अगदी गाडीचा पत्रा कुठल्या दर्जाचा आहे आणि इंजिन बसवलंय त्याच्या बेस किती मजबुत आहे, हे देखील बघतात लोक तिकडे. त्यामुळे त्या गाड्यांच्या किंमती इतक्या असतात.

आपल्याकडे पडलीये का कुणाला याची काही. आपण फक्त आपलं "कितना देती है" विचारलं आणि तोंडावळा पाहिला की झालं. त्याशिवाय जर भारतीयांना गाडीत काही हवं असतं तर चांगल्या दर्जाच म्युझिक सिस्टीम आणि रंगबेरंगी लाईटींग. मग हे लोक भारतात गाड्या लॉंच करताना त्यातला बहुतेक सुरक्षा यंत्रणा कमी करतात आणि गाड्यांच्या किंमती कमी होतात. त्यामुळे अगदी उच्च मध्यमवर्गीयांकडे देखील अशा मोठ्या गाड्या सहज दिसतात.

आता हा झाला व्यावसायिक चतुराईचा भाग पण यात दडलेलं गुपित हे आपल्या मानवी मुल्यांचं अचूक परिक्षण करणारं आहे. मुळात आपल्यालाच जर आपल्या आयुष्याची किंमत माहित नसेल तर त्यात इतरांना तरी का अधिक रस असावा. मुळात भारतीयांचं त्यांच्या आयुष्याबाबतच गणित आहेच इतक सहज. त्यामुळेच कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी ज्या जहाजात आपल्याला बसविण्यात आलं होतं त्या जहाजात बसविणारे आणि बसणारे दोघांनाही कुठल्याच सुरक्षा नियमांची पडलेली नव्हती. टाळेबंदीच्या प्रवासाला सुरुवात करण्याआधी किमान जुजबी सुरक्षेच्या गोष्टींची तरी आपण तपासणी करायला हवी होती. ती केल्या गेली नाही. यात नुसतं राज्यकर्त्यांनाच धारेवर धरुन जमणार नाही.

तर सर्वसामान्य नागरिक म्हणुन पार पाडायची जबाबदारी देखील आपल्याला नीट निभावता आली नाही. ऐरवी चुकूनही भाजीबाजाराकडे न फिरकणारे देखील ज्या पद्धतीने भाज्या घेण्यासाठी गर्दी करीत होते त्यावरुनच आपल्या सामाजिक भानाची कल्पना येते. त्यात नंतर सुरु झालेल्या दारुच्या दुकानांसमोर आपण दाखवलेल्या पराक्रमाची तुलना तर थेट युद्धभूमीशीच करावी, अशी आहे. एकंदरीतच काय तर टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात प्रवेश करताना कदाचित सरकार आणि यंत्रणेने कोरोनाचा सामना करताना केलेल्या उपाययोजनांची तुलना करता येऊ शकेलच. पण हे करीत असताना झालेल्या चुका आणि अडथळ्यांच्या शर्यती पार पाडत आधुनिक भारतातील सर्वात महागडी आणि सर्वोत्तम मानवी प्रयत्नांची आतपर्यंतची सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य सुविधा पुरवण्यात आली याची देखील नोंद घ्यायलाच पाहिजे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी टाळेबंदी आणि केलेल्या उपाययोजनांची आपण मोजलेली किंमत ही दरदिवशी पाच अब्ज रुपयांच्या घरात होती. २८ राज्य आणि आठ केंद्रशासीत प्रदेशांमधील १.३ अब्ज भारतीयांना तब्बल दहा आठवडे घरांमध्ये ठेवून त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी पुरविण्यासाठी सरकार, यंत्रणा, उपाययोजना, मेहनत आणि संयोजनांची साखळी कशा पध्दतीने काम करीत असेल याचा विचारही करणे कठीण आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या तशी कमीच आहे. भारतातीलच इतर रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी पाहिली तर त्यावर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.

भारतात दर दिवसाला जवळपास १५०० लहान मुलांचा लसीकरणाच्या अभावी मृत्यू होतो. टीबीसारख्या रोगाने देखील या देशात दररोज जवळपास १२०० लोक रोज दगावतात. या रोगांमुळे दगावणाऱ्यांची एका दिवसाची संख्या देखील आतापर्यंत कोरोनामुळे दगावलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा कमी आहे. असे असताना देखील मग सरकारने या रोगाच्या उपाययोजनांसाठी इतकी मोठी रिस्क घ्यायला हवी होती का, असा प्रश्न देखील सहजच उपस्थित होतो. पण, इतर रोखले जावू शकणारे आजार आणि कोरोना यात फरक आहे. पैसे असलेल्या श्रीमंत माणसाला देखील यातून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे आणि रस्त्यांवरुन चालत निघालेल्या श्रमीकांसाठी देखील तोच उपाय आहे. जोपर्यंत यावर कुठल्या पध्दतीची लस किंवा जबाबदार उपचारपध्दतीचा शोध लागत नाही तोवर सर्वांवरच कोरोनाच्या रुपाने मृत्यूची टांगती तलवार लटकतच राहणार आहे. 

त्यामुळेच आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा करणारे डॉक्टर, वैद्यकिय कर्मचारी आणि लोकांना घरात ठेवण्यासाठी दिवसरात्र एक करणारे पोलिस आज देवदूतांपेक्षा कुणाला कमी वाटत नाहीत. भारताते असे अजुनही कित्येक रोग आहेत ज्यावर औषध नाही. ते रोग होणारे रोग त्यासाठी करावा लागणारा खर्च सोसू शकत नाहीत. त्यामुळे सहाजिकच पाश्चात्यांना त्यावर औषध शोधण्यात काहीएक रस नाहीये. कोरोनाच्या निमित्ताने मात्र अशा रोगांनी ग्रासलेल्या रोग्यांसाठी देखील आशेचा किरण निर्माण झाला आहे.

गेल्या दोन महिन्यांमध्ये भारताच्या आरोग्य क्षेत्रात कधी झाले नसतील इतके प्रयोग झाले. यातील अनेक प्रयोग यशअपयशाच्या पायऱ्यांवर गटांगळ्या खात आहेत. तर काही प्रयोगांमधुन सकारात्मक परिणाम देखील समोर येत आहेत. त्यामुळे आरोग्याच्या कल्पनांमध्ये यापुढच्या काळात आपण मागे नसू हे मात्र यानिमित्ताने निश्चित झाले आहे.
गेल्या दोन महिन्यांमधील टाळेबंदीने अनेकांवर संकट आणले. कुणाला कायमस्वरुपी घरी बसायची वेळ आली तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना घरीच येता आले नाही. इतर रोगांनी आजारी असलेल्यांची आबाळ झाली. एरवी आपले हसतमुखाने स्वागत करणारे अनेक डॉक्टर दवाखाने बंद करुन बसले. तर इतरवेळी आपल्याला नको वाटणाऱ्या सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपला जीव वाचवला. काही मिनीट कामावर यायला उशीर झाल्यावर खेकसणारा बॉस स्वतःच दोन महिन्यांपासून घरात दबा धरुन बसलाय.

एकंदरीतच काय तर बदल होत असतो. तो अपरिहार्य आहे. कोरोनाच्या निमित्ताने झालेला बदल चांगला होता असे निश्चितच म्हणता येणार नाही. पण यानिमित्ताने आपण स्वतःच्या पायावर उभ राहण्याची आपली ताकद आपल्याला तपासता आलीये. मोदीजी सांगताहेत ते आत्मनिर्भर काय हे नाही समजलंय अजून निटसं पण असंच काहीसं असेल कदाचित...

special article on covid 19 and changes that are happening due to lockdown and coronavirus

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हातातून महाराष्ट्र गेला, आता मुंबईही जाणार? महापालिका निवडणुकीत महायुतीचा प्रभाव

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT