मुंबई : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना मोफत घरी पोहोचवण्यासाठी मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 20 कोटींची मदत जाहीर केली. नागरिकांसाठी गुरुवारपासून (ता. 7) एकूण 10 हजार बसगाड्या सोडण्यात येतील. या माहितीला परिवहन मंत्री अनिल परब यांनी दुजोरा दिला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्याठी राज्य सरकारने 23 मार्चपासून लॉकडाऊन जारी केला. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, शिक्षण व अन्य कारणांसाठी गेलेले नागरिक राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत अडकून पडले. एसटी महामंडळाने राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना नुकतेच महाराष्ट्रात परत आणले. आता राज्य सरकारने वेगवेगळ्या जिल्ह्यांत अडकून पडलेल्या नागरिकांना घरी पोहोचवण्यासाठी मोफत एसटी बसगाड्यांची व्यवस्था करण्यास सशर्त परवानगी दिली आहे.
या एसटी बसगाड्यांमधील प्रवाशांची संख्या, भाडे, बस क्रमांक, आगार याबाबतची माहिती मूळ आगारात नोंदवावी, असा आदेश एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक राहुल तोरो यांनी दिला आहे.
काही जिल्ह्यांमध्ये एसटीला प्रवेशबंदी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी एसटी बसला प्रवेशबंदी केली आहे. जिल्हा, तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षांनी तशा सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
महामंडळात समन्वयाचा अभाव?
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोफत 10 हजार एसटी बसगाड्या सोडण्याची घोषणा केली असून, परिवहन मंत्री अनिल परब यांनीही दुजोरा दिला आहे. परंतु, एसटी महामंडळाकडून बुधवारी रात्री उशिरापर्यंत अधिकृत माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे महामंडळात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले.
- प्रवास सुरू करू इच्छिणाऱ्या नागरिकांना माहिती देण्यासाठी आगार, विभागीय पातळीवर नियंत्रण कक्ष स्थापन करा.
- नियंत्रण कक्ष, विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी व आगार व्यवस्थापक यांचे भ्रमणध्वनी क्रमांक प्रसिद्ध करा.
- महसूल पोलिस विभाग व परिवहन अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून प्रवासासंदर्भात नोंदवलेल्या मागणीची माहिती घ्या.
- प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी सरकारने नेमलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
- नागरिकांनी सादर केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून प्रवासाच्या मार्गाबाबतची माहिती घ्यावी.
- प्रवासाच्या मार्गाची माहिती मिळाल्यानंतर सोडण्यात येणाऱ्या बसगाड्यांसाठी प्रवाशांचे गट करावे.
- नागरिकांना बस सुटण्याचे ठिकाण ते शेवटचे ठिकाण अशाच प्रवासाला परवानगी द्यावी; मधल्या थांब्यावर उतरता येणार नाही, अशी स्पष्ट कल्पना द्यावी.
- प्रवाशांचे गट तयार केल्यानंतर बसगाड्या सोडाव्यात; संबंधित आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना पूर्वसूचना द्यावी.
- प्रवास सुरू करण्यापूर्वी बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण करावे.
- नागरिकांनी संपूर्ण प्रवासात मास्क वापरणे अनिवार्य; बसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत.
- प्रवाशांना बसमध्ये घेताना सरकारने प्रवासाला परवानगी दिल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड अथवा अधिकृत ओळखपत्राची पडताळणी करावी.
- बसमध्ये दोन व्यक्तींमधील सुरक्षित अंतर ठेवण्याबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करावे; एका बाकावर एकच प्रवासी बसेल, याची काळजी घ्यावी.
- बसमधील प्रवाशांची तीन प्रतींमध्ये यादी करावी.
- प्रवासाच्या अंतिम ठिकाणी आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुख यांनी तेथील सरकारी नोडल ऑफिसरशी संपर्क साधून येणाऱ्या बसबाबत माहिती द्यावी.
- बस अंतिम ठिकाणी आल्यानंतर नोडल ऑफिसर, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा; बसमधून आलेल्या नागरिकांना नोडल ऑफिसरच्या ताब्यात द्यावे.
- प्रवासी घेऊन येणारी बस परत पाठवायची असल्याने व त्याबाबतची सूचना आधीच मिळणार असल्याने संबंधित आगार व्यवस्थापकांनी त्याच मार्गावरून प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी परतीच्या प्रवासाची व्यवस्था करावी.
- परतीच्या प्रवासासाठी रवाना करण्यापूर्वी बसगाड्यांचे पुन्हा निर्जंतुकीकरण करावे.
- लांब पल्ल्याच्या मार्गांवरील बसगाड्या नैसर्गिक विधी, चहा, नाश्ता, जेवण यासाठी फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानकांतच थांबवाव्यात. बस मार्गस्थ करण्यापूर्वी यादीप्रमाणे सर्व प्रवासी परत आल्याची खात्री करावी.
- बसगाड्यांसाठी पुरेशा इंधनाची व्यवस्था करावी; लांब पल्ल्याच्या बसगाड्यांना आवश्यकतेनुसार मार्गातील आगारात इंधन उपलब्ध करून द्यावे.
- प्रवासासाठी सुस्थितील बसगाड्या द्याव्या; मार्गात बिघाड झाल्यास बसची दुरुस्ती त्वरित करून द्यावी; आवश्यकता भासल्यास पर्यायी बसची व्यवस्था करावी.
एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन बुकिंग करता येईल. त्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात येणार आहे; मात्र त्याबाबत परिवहन मंत्र्यांनी अद्याप घोषणा केलेली नाही. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी घरबसल्या बुकिंगची सुविधा दिली जाईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.
state transport buses to resume their services form today check details about time table
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.