ठाणे : ठाणे शहराच्या उष्म्यात गेल्या काही दिवसात वाढ झाली असताना, शहराचा कारभार जेथून हाकला जातो अशा ठाणे महापालिकेचे वातावरणही गेल्या काही दिवसांपासून "गरम' झाले आहे. महापालिकेतील खांदेपालटावरून स्थानिक आणि प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांमध्ये आधीच शीतयुद्ध पेटले आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी तंबी दिल्यानंतर या बदल्या रद्द करण्यात आल्या. हा विषय थंड होतो तोच महापालिका अधिकाऱ्यांच्या "व्हॉट्सअप' चॅटवरून पालिकेतील वातावरणात आणखीनच भडका उडाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने इतर अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांबाबत विशेषतः महिलांवरून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे आजच्या महासभेत त्याचे चांगलेच पडसाद उमटले. अखेर या विषयावरून सभा तासभरासाठी तहकूब करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला.
महापालिका अधिकाऱ्यांच्या "व्हॉट्सअप ग्रुप'वर काही आक्षेपार्ह मजकूर टाकून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांबाबत आक्षेपार्ह टीका टिप्पणी केल्याचा प्रकार आजच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला आला होता. शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
त्यावर भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे, नंदा पाटील, नगरसेवक कृष्णा पाटील यांनी असा प्रकार घडला असेल तर तो चुकीचा असल्याचे सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी या प्रकरणाबाबत विचारणा केली. यावेळी महापालिका सचिव अशोक बुरपुल्ले यांनी हा प्रकार घडल्याची माहिती सभागृहाला दिली.
मात्र संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव उघड केले नाही. सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी अशाप्रकारे आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमांवर टाकणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी माजी महापौर मीनाक्षी शिंदे याही आक्रमक झाल्या. त्यांनी यावेळी महिलांबाबत अशाप्रकारे आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई होणे आवश्यक असल्याची भूमिका मांडली.
या अधिकाऱ्यांच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झालेले असताना ज्या अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर हा मेसेज टाकण्यात आला, त्या ग्रुपवरील अधिकाऱ्यांनी बांगड्या घातल्या आहेत का? अशी संतापजनक विचारणाही त्यांनी केली. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या महिला कुटुंबीयांबाबत अशी घटना घडल्याने महापौर नरेश म्हस्के यांनी अर्ध्या तासासाठी महासभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
...मीही बांगड्या भरलेल्या नाही
माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी अधिकाऱ्यांना बांगड्या घाचल्या आहेत का, अशी विचारला केली. त्यावर महापालिका सचिव अशोक बुरपुल्ले यांनी तत्काळ जागेवरून उठून इतर अधिकाऱ्यांचे मला माहिती नाही, पण मी बांगड्या भरलेल्या नाहीत. अशाप्रकारे आक्षेपार्ह मेसेज टाकणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी माझ्या 80 वर्षीय आईला गावावरून ठाण्यात आणणार असल्याचे सांगितले. तसेच या विषयावर वकीलाबरोबर चर्चा करून तक्रार दाखल करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सर्वसाधारण सभेत सांगितले. त्यामुळे व्हॉट्सऍपवरील या "चॅट'ने आता गंभीर वळण घेतले आहे. बुरपुल्ले यांच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.