मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील विहार तलावात उगम पावणारी १७.८ किलोमीटर लांबीची मिठी नदी ‘अत्यंत प्रदूषित’ असल्याचे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) पाण्याच्या दर्जाच्या स्थिती अहवालात आढळून आले आहे. प्रक्रिया न केलेले घरगुती सांडपाणी समुद्रात सोडणे हे एक प्रमुख कारण त्यामागे असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे २०१२-१३ हे वर्ष गेल्या ११ वर्षात प्रदूषणात अपवाद ठरले होते. या वेळी मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता ‘अ-प्रदूषित’ श्रेणीत होती.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२०-२१ च्या महाराष्ट्रातील पाण्याच्या गुणवत्तेच्या स्थितीचा अहवाल या आठवड्यात प्रकाशित केला. मंडळाने पाणी गुणवत्ता निर्देशांक वापरून प्रदूषण पातळी मोजली, ज्यात प्रदूषण वाढल्याचे दिसले. गेल्या अनेक वर्षांपासून गाळ काढणे आणि साफसफाईची कामे करूनही मिठी नदी चिंतेचे कारण बनलेली आहे. २०२१ च्या सुरुवातीला मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने मिठी नदीत सांडपाणी सोडण्यासाठी पातमुखांना झाकण बांधण्यास मान्यता दिली आहे. मात्र, या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.पाणी गुणवत्ता निर्देशांकाची गणना करण्यासाठी एकूण ४३ पॅरामीटर्सचा विचार केला जातो, त्यापैकी पीएच पातळी, विरघळलेला ऑक्सिजन, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड आणि फेकल कोलिफॉर्म हे चार मुख्य पॅरामीटर्स आहेत.
नदी प्रदूषणाचे परिमाण
पाणी गुणवत्ता निर्देशांक दर्जा पाण्याचा रंग
३८ किंवा त्यापेक्षा कमी वाईट ते खूप वाईट लाल
३८ ते ५० खराब किंवा प्रदूषित नारिंगी
५० ते ६३ मध्यम ते चांगले, गैर-प्रदूषित पिवळा
६३-१०० उत्कृष्ट ते उत्कृष्ट हिरवे
अहवाल काय सांगतो?
१) वर्षभरात मिठी नदीचा एकूण पाणी गुणवत्ता निर्देशांक ४४ होता, जो ‘प्रदूषित’ किंवा ‘खराब’ श्रेणीमध्ये येतो. मिठी नदी आणि ती ज्या खाडीमध्ये जाऊन मिळते ती माहीम खाडी एप्रिल २०२० मध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषित होती. मिठी नदीची प्रदूषण पातळी २५.८४; तर माहीम खाडीची पातळी ३७.५५ होती.
२) वर्सोवा, जुहू, नरिमन पॉईंट, गेटवे ऑफ इंडिया, मलबार हिल, गिरगाव चौपाटी, हाजी अली, शिवाजी पार्क दादर आणि वरळी सी फेस येथील प्रदूषणाची पातळी ५१ आणि ५८ मधील आहेत, म्हणजेच गैर-प्रदूषित नोंद झाली. हा कोरोना टाळेबंदीचा काळ होता.
३) ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नाल्यांमधून गोळा केलेले नमुने सातत्याने प्रदूषित श्रेणीमध्ये नोंदवले गेले आहेत. हे जवळपासच्या भागातून सोडले जाणारे औद्योगिक सांडपाणी आणि नाल्यांभोवती मानवी वस्तीतील कचरा यामुळे असू शकते, असे अहवालात नमूद केले आहे.
नदीचे प्रदूषण असे वाढले...
उच्च पातळीच्या प्रदूषणामागे प्रक्रिया न केलेले घरगुती सांडपाणी समुद्रात सोडणे हे प्रदूषणाचे एक प्रमुख कारण आहे. अहवालानुसार, शहरात दररोज २,१९० दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. त्यापैकी केवळ १,२८५ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रतिदिन शहरात स्थापित केलेल्या सात ट्रीटमेंट प्लांटद्वारे प्रक्रिया केली जाते. तथापि, सातही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून निघणारे पाणी समुद्रात सोडण्यापूर्वी त्यावर केवळ प्राथमिक प्रक्रिया करतात. शहरातील अनेक भागात मलनिस्सारणाचे जाळे नाही. त्यामुळे ते सांडपाणी थेट मिठी नदीसारख्या जलकुंभात सोडतात. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढले असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.