मुंबई : कोरोनाग्रस्त गर्भवतींपैकी (corona infected pregnant woman) ८२ टक्के महिला रुग्णालयात उपचारांसाठी उशिरा दाखल झाल्या होत्या. त्याच वेळी मृत्युमुखी पडलेल्या ३१ टक्के महिलांना उच्च रक्तदाबाचा (High blood pressure) त्रास होता, असे निरीक्षण शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या डॉक्टरांनी नोंदवले आहे. टिळक रुग्णालय (sion hospital) आणि वैद्यकीय महाविद्यालय, पालिकेच्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागातील प्रमुख डॉ. निरंजन चव्हाण यांनी कोरोनाची पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत (१ एप्रिल २०२० पासून ते ३० जुलै २०२१ पर्यंत) रुग्णालयात दाखल झालेल्या ३९० गर्भवतींच्या वैद्यकीय अहवालाचा अभ्यास केला.
यापैकी १७ गर्भवतींचा या आजारामुळे मृत्यू झाला. त्यापैकी ८९ टक्के महिला २० ते ३० वयोगटातील होत्या. दरम्यान, गर्भवतींनी लस घेतल्यास त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल. लक्षण आढळल्यास तातडीने तपासणी करण्याची सूचना त्यांनी केली आहे. जीव गमावलेल्या एकूण रुग्णांपैकी ८९ टक्के महिला उपचारांसाठी उशिरा रुग्णालयात पोहोचल्या. व्यवस्थापन स्तरावरील विलंब हेही एक प्रमुख कारण आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्या वेळी ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांचे प्रमाण जास्त होते.
त्यामुळे, अहवाल येण्यास वेळ लागला. त्यानंतर, त्यांना रुग्णालयातून रेफर करण्यास उशीर झाला. ५५ टक्के गर्भवती रुग्णांना श्वास घेण्यास त्रास, ताप, सर्दी, खोकला अशा तक्रारी होत्या. चाचणी केलेल्या ६४ टक्के रुग्णांचा कोरोनाची पुष्टी झाल्यानंतर पाच दिवसांनी मृत्यू झाला; तर ४६ टक्के महिलांचा मृत्यू प्रसूतीच्या पाच दिवसांत झाला. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिप्रोडक्शन, ॲबस्टेट्रिक्स ॲण्ड गायनॅकॉलॉजी’ या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.
समस्या कमी असतील तिसऱ्या लाटेत टिळक रुग्णालयात आजवर फक्त नऊ गर्भवती महिला दाखल झाल्या आहेत. या अभ्यासात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ३९० गर्भवती महिलांवर उपचार करण्यात आले. यातील ८९ टक्के महिला या २० ते ३० वयोगटातील होत्या. ३९० पैकी १७ महिलांचा मृत्यू झाला. उपचारांत उशीर झाल्याने सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्यात बाहेरून रेफर केलेले बरेच रुग्ण दाखल झाले होते. त्यात उच्च रक्तदाब असलेल्यांचा समावेश होता. तिसऱ्या लाटेत मृत्यूची नोंद झालेली नाही. ओमिक्रॉनचा त्रास झाला तरी सर्दी, खोकला, दम आणि ताप अशी लक्षणे असतात. त्यातच लक्षण नसलेले जास्त आहेत. सर्व गर्भवती महिलांनी लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे; परंतु त्यातून उद्भवणाऱ्या समस्या कमी असतील, असा निष्कर्ष काढला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.