कोरोना मृत्यू नियंत्रणात
मुंबईसह राज्यभरात दिलासा; संसर्गाचे आव्हान कायम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मृत्यूने थैमान घातले होते. त्यामुळे तिसऱ्या लाटेबाबतही नागरिकांमध्ये धास्ती होती; मात्र मुंबईत तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात पालिका प्रशासनाला यश आल्याचे दिसून येत आहे. तसेच, तिसऱ्या लाटेत मुंबईसह राज्यात कोविड मृतांची संख्याही कमी असल्याने आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे; मात्र मृत्युदर कमी झाला असला, तरी संसर्गाची लाट संपली, असे आताच म्हणता येणार नाही. त्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागेल, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या दीड हजारापर्यंत खाली आली आहे. आज १,८१५ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी १,५२५ (८४ टक्के) रुग्ण लक्षणे विरहित आहेत. मुंबईत सध्या २१ हजार सक्रिय रुग्ण असून त्यापैकी केवळ ५८२ (२.८ टक्के) रुग्ण गंभीर आहेत. तिसऱ्या लाटेमध्ये गंभीर रुग्णांची संख्या घटल्याने दैनंदिन मृतांचा आकडादेखील नियंत्रणात आहे. आज मुंबईत १० रुग्णांचा मृत्यू झाला. रोज सरासरी १० ते १२ मृत्यू होत आहेत. त्यामुळे मुंबईतील दैनंदिन मृत्युदर ०.५८ इतका आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी पालिकेने ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर दिल्याने परिस्थिती नियंत्रणात असून चाचण्या करून घेण्याकडे लोकांचा कल वाढल्याने त्यांच्यावर योग्य वेळी उपचार होत आहे व त्यामुळे मृत्युदर घटल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असून कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्क्यांवर गेला आहे. आज ७५३ रुग्ण कोरोनातून बरे झाले; तर आज सापडलेल्या बाधित रुग्णांपैकी ६८ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर दाखल करण्यात आले. मुंबईतील एकूण उपलब्ध खाटांपैकी केवळ ९.१ टक्के खाटा भरल्या आहेत. मुंबईत सक्रिय रुग्णांचा आकडाही २२,१८५ पर्यंत कमी झाला आहे.
राज्यातदेखील कोरोनारुग्णांची संख्या आता स्थिर आहे; तर गंभीर रुग्णांची संख्या केवळ २५०८ (१२.४६ टक्के) इतकी आहे. राज्यातील दैनंदिन मृत्युदर केवळ ०.१२ टक्के आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेपासून धडा घेत मुंबईसह राज्यभरात सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पहिल्या लाटेप्रमाणे रुग्णाला सुविधा किंवा औषधे मिळाली नाहीत, असे प्रकार सध्या घडलेले नाहीत. ज्येष्ठ नागरिक किंवा दीर्घकालीन आजार असणाऱ्यांचा मृतांमध्ये अधिक प्रमाणात समावेश आहे, मृत्यू परीक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
कोट
कोरोना संसर्ग आणि मृत्यूवर यापुढेदेखील नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. शहरांपासून तालुक्यापर्यंत नागरिकांनी कोविड नियमांचे पालन केल्यास तिसरी लाट नियंत्रणात राहून महिन्याभरात संपेल.
- डॉ. अविनाश सुपे, प्रमुख, राज्य मृत्यू परीक्षण समिती
कोट
कोरोनाचे दैनंदिन रुग्ण कमी झाले असून मृत्यूचा दरही कमी झाला आहे; मात्र यामुळे तिसरी लाट संपली, असे म्हणता येणार नाही. त्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका
कोट
तिसरी लाट सुरू होण्याच्या आधीच पालिकेने रुग्णालयांतील सुविधा तयार ठेवल्या. सध्या लसीकरणावर अधिक जोर देण्यात येत आहे. त्यामुळे लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढली आहे.
- डॉ. रमेश भारमल, संचालक, पालिका प्रमुख रुग्णालये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.