नवी मुंबई, ता. १ : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेने प्रस्थापित नगरसेवकांची झोप उडवली. बहुतांश मातब्बर नगरसेवकांचे प्रभागांमधील भाग वेगळ्या प्रभागात जोडला गेल्याने माजी महापौर सुधाकर सोनवणे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, विठ्ठल मोरे आदी ज्येष्ठ नगरसेवकांच्या प्रभागातील जुने भाग वगळण्यात आले आहेत. तर नव्याने काही परिसराचा समावेश झाला आहे. या प्रभाग रचनेवर माजी मंत्री आणि भाजपचे नेते आमदार गणेश नाईक यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून प्रभाग रचनांविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा दिला आहे.
गेले दोन वर्षे रखडलेली नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यांपर्यंत होण्याची दाट शक्यता आहे. यंदा महापालिकेची पॅनेल पद्धतींनी निवडणूक होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या १११ जागांच्या नगरसेवकांमध्ये वाढ होऊन आता १२२ जागांवर नगरसेवक निवडून जाणार आहेत. परंतु तीन आणि दोन सदस्यांचा नगरसेवकांचा एक पॅनेल असल्याने महापालिकेची ४१ प्रभागांमध्ये निवडणूक होणार आहे. बदललेले प्रभागांचे नकाशे आणि सीमाही महापालिकेच्या संकेतस्थळांवर जाहीर केल्या. सकाळपासून प्रभागांचे नकाशे आणि सीमा पाहिल्यानंतर समाजमाध्यमांपासून ते राजकीय वर्तुळात कार्यकर्त्यांच्या एकच चर्चा सुरु झाल्या आहेत.
ऐरोली विधानसभा मतदार संघातून प्रभाग रचना बदलण्यास सुरुवात झाली आहे. दिघा, रबाळे, ऐरोली, चिंचपाडा या भागातील प्रभाग फोडून एकमेकांना जोडले आहेत. त्यामुळे येथे गेले पाच टर्म निवडून येणाऱ्या माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या बालेकिल्ल्याला फटका बसला आहे. त्यांचे पूर्वीचे १९ आणि २० हे दोन्ही प्रभाग फोडून अगदी पाच किलोमीटर अंतरावरील चिंचपाडा, पावणे येथील भागांना जोडण्यात आल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे. स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार, माजी विरोधीपक्षनेते विजय चौगुले यांचा प्रभाग फुटला आहे. माजी विरोधीपक्षनेते विजय चौगुले यांचा प्रभागातील काही भाग रबाळेला जोडला आहे.
बहुतांश मतदार वेगळ्या प्रभागात गेले आहेत. तसेच माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या घरातील सदस्यांचाही प्रभागात काही नव्या आणि जुना भाग वगळण्यात आला आहे. बोनकोडे गावातील काही प्रभाग एकत्र आले आहे. मुनावर पटेल, वैशाली नाईक यांचे प्रभाग सलग एकत्र आले आहेत. माजी नगरसेवक दशरथ भगत यांचेही वाशीतील प्रभाग एकत्र जोडले गेल्याने त्यांना पोषक वातावरण निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. वाशी प्रभाग क्रमांक ६४ हा आता बदलून प्रभाग क्रमांक २७ झाला आहे. या प्रभागातून सद्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक दिव्या वैभव गायकवाड या स्थानिक नगरसेवक होत्या. पण हा प्रभाग आता माजी उपमहापौर अविनाश लाड आणि माजी नगरसेवक किशोर पाटकर यांच्या प्रभागांना जोडला गेला आहेत. त्यानंतर वाशी गावापासून प्रभाग क्रमांक २८ ला सुरुवात होते.
प्रभाग क्रमांक २७ मध्ये वाशी गावातील सेक्टर १ चा साईबाबा मंदिर आणि सेक्टर ६ काही भाग जोडला गेला आहे. तसेच पामबीच भागातील रस्ता जोडला आहे. माजी नगरसेवक संपत शेवाळे यांचा प्रभाग क्रमांक ६३ आता तो २६ झाला आहे. यात वाशी सेक्टर १ आणि २ पूर्णपणे आले आहेत. सेक्टर १७ आणि १६ पूर्ण प्रभाग आले आहेत. माजी नगरसेवक प्रकाश मोरे यांच्या मर्जीतील काही मते प्रभाग क्रमांक २६ मध्ये आल्याचे समजते. प्रकाश मोरे यांच्या प्रभागात एमजी कॉम्प्लेक्ससोबत जुहुगावाचा समावेश झाला आहे. माजी नगरसेवक अंजली भोईर आणि शिवसेनेचे हरिश्चंद्र भोईर आणि प्रकाश मोरे यांचा प्रभाग आता एकत्र झाला आहे. माजी नगरसेवक संतोष शेट्टी, माजी नगरसेविका मीरा पाटील पूर्वी प्रभाग क्रमांक ९० होता. त्याच्या जवळ संतोष शेट्टी यांचा ८८ होता. आता तीन प्रभाग एकत्र केल्यामुळे काँग्रेसच्या संतोष शेट्टींना विजयाची आशा निर्माण झाली आहे. माजी महापौर जे.डी सुतार यांच्या प्रभागात नव्याने एनएल टाईपचा भाग जोडण्यात आला आहे.
माझा प्रभाग क्रमांक पूर्वी १९ आणि २० होता. २०११ प्रमाणे एकूण लोकसंख्या २४ हजार होती. चिंचपाड्यापर्यंत तीन प्रभाग तयार होत होते. आता परंतु मुद्दामहून दिघा, पावणे, घणसोली पाच प्रभाग कार्यालयांमध्ये तुकडे केले आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वा विरोधात आहे. हे लोकशाहीला घातक आहे. आपल्या झोपडपट्टीबहुल प्रभागात शैक्षणिक प्रगती आणि समाजाचा विकास विभागला जाणार आहे. सूचना हरकती दाखल करणार असून न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. सुधाकर सोनवणे, माजी महापौर
भाजप न्यायालयात जाणार
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या नव्या प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. एखाद्या ठराविक पक्षाला लाभ मिळण्यासाठी नियमबाह्यपद्धतीने प्रभाग रचना केल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षांच्या दबावाखाली येऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे प्रभाग रचना केल्या आहेत. या प्रभाग रचनांविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.