ठाणे : दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील ७ ते १४ तारखेपर्यंतचा आठवडा `व्हॅलेंटाईन वीक` (valentines week) म्हणजेच प्रेमाचा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. हा आठवडा प्रेमीयुगुल आणि तरुणाईसाठी एक प्रकारे मोठा उत्सवच ठरतो. या काळात आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब (Rose), चॉकलेट, भेटवस्तू आणि इतर अनेक गोष्टी देऊन प्रेम व्यक्त (Love feelings) केले जाते. यंदा व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात सोमवारपासून झाली आणि पहिल्याच दिवशी ''व्हॅलेंटाइन वीक'' साजरा करण्याचा प्लॅन केलेल्या प्रेमवीरांच्या खिशाला महागाईची झळ बसल्याचे समोर आले.
व्हॅलेंटाईन वीकमुळे गुलाबांच्या मागणीत वाढ झाली असून, सध्या ठाणे शहरात लाल गुलाबाची फुले प्रतिनग २० ते २५ रुपये, तर इतर रंगाची गुलाबाची फुले ३० रुपयांपर्यंत विकली जात आहेत. गुलाबाचे फूल हे इतर फुलांच्या तुलनेत सुगंधी आणि आकर्षक असल्याने मनातील प्रेमाची ''नाजूक'' भावना व्यक्त करण्यासाठी ती हमखास प्रेमीयुगुलांकडून खरेदी केली जातात. मागील वर्षी कोरोनामुळे कॉलेज कट्टे, लोकल, बस सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने व्हेलेंटाईन वीकमध्येही गुलाबाच्या फुलांना हवी तशी मागणी मिळाली नव्हती. त्यामुळे गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन वीकदरम्यान लाल गुलाबाची फुले १० ते १५ रुपये, तर इतर रंगाची गुलाब फुले २० ते २५ रुपयांपर्यंत विकली जात होती; परंतु यंदा कॉलेज कट्टे, लोकल, पर्यटनस्थळे आदी सर्व ठिकाणे सुरू झाली असून व्हॅलेंटाईन वीकमध्ये गुलाबाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
सोमवारी रोझ डे या व्हॅलेंटाईन वीकमधील पहिल्याच दिवशी गुलाबाची मागणी वाढल्याने सध्या ठाणे शहरातील फूल विक्रेत्यांकडे लाल गुलाबाची फुले २० ते २५ रुपयांपर्यंत विकली जात आहेत; तर गुलाबी, पिवळा, केशरी या रंगाची फुले ३० रुपयांपर्यंत विकली जात आहेत. गुलाबाच्या फुलांपासून बनवलेल्या लहान गुच्छाची किंमत २०० रुपये, तर मोठे गुच्छ ४०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. व्हॅलेंटाईन वीकमध्ये गुलाबाच्या फुलांची मागणी अधिक वाढल्यास व्हेलेंटाईन डेपर्यंत लाल गुलाबाच्या फुलांच्या किमती ३० रुपायांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे ठाण्यातील फूल विक्रेत्यांनी सांगितले.
व्हॅलेंटाईन वीक सुरू असल्याने इतर फुलांच्या तुलनेत गुलाबाच्या फुलांनाच अधिक मागणी असते. यंदा पहिल्याच दिवसापासून गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल गुलाबाच्या फुलांच्या किमतीत ५ रुपयांची वाढ केली आहे. व्हेलेंटाईन डे पर्यंत गुलाबाच्या किमती १० रुपयांनी देखील वाढण्याची शक्यता आहे.
- पप्पू मेहंती, फूल विक्रेता, ठाणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.