अलिबाग : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे बुधवारी (ता. ३०) रायगड (Raigad) दौऱ्यावर येत आहेत. याचदरम्यान माणगाव येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा (shivsena leader) मेळावा होणार आहे. यासाठी ठिकठिकाणी बॅनरबाजी (Baner advertisement) करण्यात आली आहे. मात्र, या बॅनरवर सलग सहा वेळा खासदार आणि दोन वेळा केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी संभाळणाऱ्या अनंत गीते (Anant geete) यांना स्थान नाही. त्यामुळे याबाबत जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात विविध विकासकामांची उद्घाटने, भूमिपूजने तसेच शिवसेना कार्यकर्त्यांबरोबर संवाद असा कार्यक्रम आहे. यानुसार ते लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात वसतिगृहाचे भूमिपूजन आणि माणगाव येथे मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. याबाबत माहिती देणारे बॅनर ठिकठिकाणी झळकावून कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले जात आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांचे सर्वात मोठे छायाचित्र आहे.
त्याबरोबरच उद्योगमंत्री सुभाष देसाई, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांची छबी झळकलेली दिसते. याखेरीज जिल्ह्यातील आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांचीही छायाचित्रे आहेत. मात्र अनंत गीते यांच्या छायाचित्राला स्थान मिळालेले दिसत नाही. त्यामुळे चर्चा रंगली आहे. याबाबत शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी सर्व प्रकार नजरचुकीने झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे; तर मेळाव्यासाठी मला वैयक्तिक निमंत्रण न मिळाल्याने, उपस्थित राहण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे म्हणत अनंत गीते यांनी आपली भूमिका मांडली आहे.
असा सुरू झाला राजकीय विजनवास
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनंत गीतेंचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यानंतरही मागील लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर अनंत गीते हळूहळू राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहू लागले. या कार्यक्रमांना शिवसेनेचे पक्षश्रेष्ठीच त्यांना टाळू लागले. यामुळे कार्यकर्त्यांबरोबर असलेला संपर्क कमी होत गेला असून ३० वर्षांहून जास्त काळ नेतृत्व करणाऱ्या नेत्याचा विसर तीन वर्षातच शिवसेनेपासून दूर का व्हावे लागले, असा प्रश्न आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबरची जवळिक नकोशी ?
मागील लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांचा सुनील तटकरे यांनी पराभव केला. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी कॉँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पददेखील मिळाले. तेव्हापासून गीते पक्षनेतृत्वावर नाराज आहेत, अशी चर्चा आहे.
श्रीवर्धनच्या मेळाव्यात भावनांना वाट मोकळी
अतिशय संयमी अशी ओळख असलेल्या अनंत गीते यांनी सप्टेंबरमध्ये श्रीवर्धन येथे झालेल्या मेळाव्यात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी थेट टीका केली होती. यामुळे जिल्ह्याच्याच नव्हे, तर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. मातोश्रीबरोबरचे दुरावलेले संबंध आणखी ताणले गेले. गीतेंच्या वक्तव्याची पक्षनेतृत्वाला गंभीर दखल घ्यावी लागली. यामुळे अनंत गीते यांना जाहीर कार्यक्रमाला बोलावणे टाळले जाऊ लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.