Gudi Padwa Festival sakal media
मुंबई

शोभायात्रेनिमित्त डोंबिवलीकर एकवटले; मराठी नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : ढोल-ताशांचा गजर... त्याला झांज-लेझीमची साथ... पारंपरिकतेला आधुनिकतेचा साज, अशा जल्लोषात डोंबिवलीत (Dombivali) मराठी नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. कोरोना संक्रमणामुळे (corona) गेली दोन वर्षे स्वागतयात्रा रद्द झाल्याने डोंबिवलीकर या साऱ्या उत्साहापासून वंचित होते. दोन दिवसांपूर्वीच कोरोनाचे निर्बंध (covid curbs) पूर्णपणे हटल्याने डोंबिवलीकरांनी पुन्हा त्याच जल्लोषात एकत्र येत नववर्षाचे जल्लोषात (Gudi Padwa) स्वागत केले. डोंबिवलीसह कल्याण, ग्रामीण भागातही शोभायात्रा (Shobhayatra) काढून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. मराठी नववर्षाच्या निमित्ताने राजकीय मंडळीही एकाच व्यासपीठावर एकवटली होती; तर कलाकारांनीही उपस्थिती लावत डोंबिवलीकरांच्या उत्साहात भर घातली.

गुढीपाडव्याचे औचित्य साधत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी डोंबिवलीत १९९९ पासून शोभायात्रा काढण्यास सुरुवात झाली. ही शोभायात्रा डोंबिवलीची एक वेगळीच ओळख बनली असून, यंदा यात्रेचे २३ वे वर्ष होते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. दुसरीकडे मास्क देखील ऐच्छिक केल्याने अनेकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आणि गुढीपाडव्याच्या शोभायात्रांमध्ये सहभाग घेत जल्लोष केला.

शनिवारी सकाळी ६.३० वाजता डोंबिवली पश्चिमेतील हनुमान मंदिर येथे पालखीचे पूजन झाले. यानंतर कोरोना काळात जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावणाऱ्या ५१ कोरोना योद्ध्यांचा सन्मान श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, रवींद्र चव्हाण, माजी महापौर विनीता राणे, पाटकर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यामध्ये आरोग्य, पोलिस, पालिका कर्मचारी, सफाई कामगार, स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश होता. त्यानंतर लेझीम, झांजच्या तालावर ढोल-ताशांच्या गजरात स्वागतयात्रेला सुरुवात झाली.


सायकलस्वार, बाईक रायडर यांनी स्वागतयात्रेचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्यापाठोपाठ पारंपरिक वेशभूषा करून बालकलाकार सहभागी झाले होते. यासोबतच माती वाचवा हे संदेश देणारी संस्था, हिरकरणी सायकल क्लब, एमआयएम डॉक्टरांची संस्था, प्रेरणा लाफ्टर क्लब, क्षीतिज मतिमंद मुलांची शाळा, तेजज्ञान फाऊंडेशन, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, स्वकुळ साळी हितसंवर्धक संस्था, महिला बाल विकास विभागाच्या वतीने शासकीय योजना सांगणारे फलक घेऊन पालिका कर्मचारी यांसह अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. संत गाडगेबाबा स्वच्छता रथ यात्रेच्या शेवटी होता. पारंपरिक वेशभूषा करून ज्येष्ठ नागरिकांसह अगदी छोटे बालकही यात्रेत सहभागी झाले होते.

ढोल-ताशा, भव्य रांगोळ्या


स्वागतयात्रेच्या निमित्ताने फडके रोडवर चौकाचौकांत ढोल-ताशा पथकांच्या वतीने वादन करण्यात येत होते. १० ते १२ ढोल-ताशा पथक स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. आपल्या पथकाचा नाद सर्वत्र दणाणला पाहिजे यासाठी पथकांची स्पर्धा सुरू होती. संस्कार भारतीच्या वतीने फडके रोड, श्री गणेश मंदिर संस्थान परिसर, मानपाडा रोड, डोंबिवली पश्चिम परिसरात संस्कार भारतीच्या भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या रांगोळ्या पाहाण्यासाठी, कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सारेजण गर्दी करत होते. संस्कार भारतीच्या वतीने फडके रोडवरही भव्य रांगोळी काढण्यात आली होती.

राजकीय मंडळी एकाच व्यासपीठावर

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचे वारे शहरात वाहत असून या निमित्ताने कायम एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारी राजकीय मंडळी स्वागत यात्रेच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आली. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मनसेचे आमदार राजू पाटील, भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण हे श्री गणेश मंदिर संस्थानच्या व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी एकमेकांच्या कानात ते हितगुज करत असल्याने, ते नेमके काय बोलत असतील या विषयी उत्सुकता होती. राजकीय आरोप-प्रत्यारोप हा केवळ राजकारणाचा एक भाग आहे. सण-उत्सवांच्या निमित्ताने नागरिकांच्या उत्साहात आम्हीही सहभागी होत असून राजकीय कामकाजाव्यतिरिक्त आम्ही सारे मित्रमंडळीच आहोत, असे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

कलाकारांची उपस्थिती

डोंबिवलीतील स्वागतयात्रेत आगामी `चंद्रमुखी` चित्रपटातील कलाकार आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकर सहभागी झाले होते. प्रथम पालखीचे पूजन केल्यानंतर लेझीम हाती घेत झांजच्या तालावर त्यांनी नृत्य केले. त्यानंतर श्री गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले. डोंबिवलीतील स्वागतयात्रेत सहभागी होण्याची माझी पहिलीच वेळ. यापुढे प्रत्येक वर्षी या यात्रेत सहभागी होण्याचा मी प्रयत्न करणार आहे. दोन वर्षे आपण या साऱ्या उत्साहाला मिस करत होतो, आज डोंबिवलीत हा उत्साह आम्हाला अनुभवता आला याचा आनंद आहे, असे अमृता खानविलकर म्हणाली; तर २०१६ मध्ये मी डोंबिवलीत एका मालिकेच्या प्रमोशनला आलो होतो. या वर्षी त्याच उत्साहाने डोंबिवलीकरांसोबत आम्ही पाडवा साजरा करत असून, खूप भारी वाटत आहे, असे आदिनाथ कोठारे म्हणाला.

राजकीय पक्षांचा प्रचार

आगामी निवडणुका लक्षात घेता राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षाची यानिमित्ताने प्रसिद्धी करून घेतल्याचे पाहायला मिळाले. बाजी प्रभू चौकात भाजपच्या वतीने राम मंदिराची प्रतिकृती असलेला चित्ररथ सजविण्यात आला होता; तर `आप` चे पदाधिकारी स्वागतयात्रेत झाडू घेऊन सहभागी झाले होते. कल्याण-डोंबिवलीतील भ्रष्टाचार झाडून टाकायचा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी दिली. शिवसेना-मनसेच्या वतीने स्वतंत्र व्यासपीठ उभारण्यात आले होते. मनसेने नागरिकांसाठी मोफत फेट्यांची सोय केली होती. त्यातच मनसेच्या व्यासपीठावर भाजप आमदार रवींद्र चव्हाण येताच मनसे व भाजपची युती होणार का, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT