अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, अलिबाग, पेण, रोहा-माणगावपर्यंत ‘सेकंड होम’ खरेदी (Second home purchasing) करणाऱ्यांकडे मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या मोठ्या शहरातील नागरिकांचा कल वाढू लागला आहे. त्यातच या परिसरात घरांच्या किमती (Home price) अद्यापही आवाक्यात आहेत. त्यामुळे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) शनिवारी घर खरेदीला अनेकांनी पसंती दिली. कोरोना कालावधीत बांधलेली हजारो घरे सध्या कमी किमतीत उपलब्ध आहेत, त्याचाही फायदा घेत ही खरेदी झाली. नजीकच्या काही महिन्यांत घरे, जमिनीच्या किमतींत (Land price) मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही संधी साधून आगाऊ नोंदणी झाली.
कोरोना कालावधीत बांधलेल्या घरांना फारशी मागणी नव्हती. यामुळे कर्जत, खालापूर, अलिबाग येथील बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलती दिल्या होत्या. या सवलती गुढीपाडव्यानंतर संपणार आहेत. राज्य सरकारनेही रेडीरेकनरचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून सुरू झाली. त्याचबरोबर मजुरीही दोन महिन्यांपासून २० टक्के वाढली आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे स्टील, सिमेंटच्यकिमतीतही लक्षणीय वाढ होत आहे. यामुळे घरे महाग होण्याआधीच खरेदी करण्यासाठी गुढीपाडवा हा शेवटचा मुहूर्त अनेकांनी साधला. घर किंवा जमीन खरेदीच्या व्यवहारांची बोलणी झाल्यानंतर ठराविक रक्कम देत त्यांनी हा संकल्प सोडला.
ग्रामीण भागातील नागरिकांचाही वाढता कल
ग्रामीण भागात काम करणारे शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह राजकीय पदाधिकारी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी गृहसंकुलात घर खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असतात. काही सधन शेतकरी, बागायतदार शहरात घर खरेदी करतात. यामुळे मुंबईतील खरेदीदारांबरोबर रोहा, माणगाव, कर्जत, खालापूर येथील गृहसंकुलातील घरांना मागणी वाढू लागली आहे.
अलिबागच्या घरांना सर्वाधिक मागणी
मुंबईपासून समुद्रमार्गे अलिबाग हे निसर्गरम्य असे जवळचे ठिकाण आहे. त्यामुळेच परिसरातील मालमत्तांचे दर गगनाला भिडले आहेत. बिनशेती जमिनीचे दर गुंठ्याला २० लाखांहून अधिक झाल्याने आता मांडवा, किहीम या परिसरातील शेत जमिनी विकत घेऊन फार्महाऊस बांधण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. यामुळे येथील शेत जमिनींनाही सोन्याचा भाव येऊ लागला आहे. पनवेल, उरण या तालुक्यांनंतर अलिबागमधील जमिनींना किंमत मिळत आहे.
अनेक वर्षे दादर येथे लहानशा खोलीत राहिलो. प्रवासाची साधने कमी असल्याने लांबच्या अंतरावर घर घेऊन कामाला येणे शक्य नव्हते. आता रायगड जिल्ह्यातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. शिवाय येथे दुकाने, लहान-सहान उद्योग किंवा पर्यटनासंदर्भातील एखादा उद्योग सुरू करणे शक्य आहे. अशा अनेक कारणांमुळे आम्ही रोहा तालुक्यात घर खरेदी करणे पसंत केले.
- जयदीप सावंत, ग्राहक
अनेक जण गुंतवणूक म्हणून तयार घर विकत घेण्याचा प्रयत्न करीत असतात. ज्यांच्याकडे गावाकडच्या जमिनी विकून काही रक्कम आलेली आहे, असे अनेक जण शहरातील मालमत्तांना भविष्यात वाढीव किंमत मिळेल, या अपेक्षेने शहरात घर विकत घेऊन वास्तव्यास येण्याचा प्रयत्न करीत असतात.
- प्रशांत नाईक, एबी बिल्डर, अलिबाग.
गुढीपाडव्याच्या दिवशी निबंधक कार्यालये बंद होती. त्यामुळे ज्यांना व्यवहार करायचा आहे, त्यांनी ठराविक रक्कम दिली. पुढील काही दिवसांत हा व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. रायगडमध्ये ही पद्धत घर खरेदीसाठी नव्हती; परंतु भविष्यातील बदलत्या परिस्थितीमुळे आजचा मुहूर्त अनेकांनी साधला असावा.
- दिलीप जोग, बांधकाम व्यावसायिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.