घाटकोपर : घाटकोपर आणि कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी (MNS) लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा (Hanuman chalisa) वाजवण्यास सुरुवात केल्यावर आज कुर्ल्यात न्यू मिल रोड, राजे शिवाजी क्रीडांगणाशेजारील कलिमाता मंदिरावर मनसे कार्यकर्त्यांनी (MNS Loudspeaker) भोंगे लावले होते. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसा वाजवण्यात येणार होती, मात्र त्याआधीच कुर्ला पोलिसांकडून (kurla police) मंदिरावरील भोंगे खाली उतरवले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली.
मशिदींवरील भोंगे उतरवा; अन्यथा आम्ही लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या जाहीर मेळाव्यात देताच मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उपनगरातील कुर्ला हा मुस्लिमबहुल परिसर असून सध्या रमजान महिना सुरू आहे. मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींवरील बेकायदा भोंगे खाली उतरवा अशी मागणी केली आहे.
मशिदींवरील भोंगे चालतात; तर मग मंदिरावरील भोंग्याना परवानगी का नाही, असा सवाल करत राज्य सरकारच्या या भूमिकेचा कार्यकर्त्यांनी निषेध करत तोंडाने हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली. या वेळी काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आधीच मंदिरावरील भोंगे जप्त करत कडक बंदोबस्त ठेवला होता. या वेळी मनसेचे रोहित जाधव, सागर देवरे आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपस्थित कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणादेखील देण्यात आल्या.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आम्हाला आमच्याच भूमीत सणउत्सवांसाठी परवानगी घ्यावी लागते. मशिदींवरील भोंगे चालतात; मग मंदिरावरील भोंगे का चालत नाहीत. तुम्ही आमचे भोंगे जप्त करत राहाल, तर आम्ही मोठमोठ्याने तोंडाने हनुमान चालिसा म्हणत राहू. पोलिसांनी आमचे भोंगे हनुमान चालिसा वाजवण्याआधीच जप्त केले.
- रोहित जाधव, मनसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.