भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात असलेल्या सेंट जॉर्ज रुग्णालयात लवकरच यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अल्प दरात करणे शक्य होणार आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत यासाठीची संपूर्ण कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होऊन हे केंद्र तयार करण्याचा प्रस्ताव आहे. एच. एन. रिलायन्स रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टर्स आणि सर्जन्सकडून यासंदर्भातील सूचना मागवण्यात आल्या आहेत. उपकरणांची पूर्तता योग्य वेळेत झाल्यास प्रस्ताव पुढच्या १५ दिवसांत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठवला जाणार आहे.
एच. एन. रिलायन्सच्या मदतीने सेंट जॉर्ज रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाला सुरुवात होणार असून त्यानंतर टप्प्या टप्प्याने यकृताशी निगडित सर्व शस्त्रक्रिया एकाच ठिकाणी देण्याचा रुग्णालय प्रशासनाचा मानस आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे यकृत प्रत्यारोपण कमी खर्चात झाल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. यकृत प्रत्यारोपण आणि यकृतासंबंधी इतर आजारांवर उपचार, निदान आणि शस्त्रक्रियेच्या प्रस्तावासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण अत्याधुनिक केंद्रासाठी अंदाजित ५ कोटी रुपयांर्यंत खर्च येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
४ खाटांचा वॉर्ड तयार करणार
यकृत प्रत्यारोपणानंतर रुग्णाला संसर्ग होऊ नये यासाठी २५० चौरस फुटांच्या खोलीत एक चार खाटांचा वॉर्ड तयार केला जाणार आहे. शिवाय, आता असलेल्या आयसीयूमध्येही सुधारणा केली जाणार आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर आणि पीडब्लूडी यांनी एच. एन. रिलायन्स रुग्णालयातील गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विभागाला भेट दिली आणि तिथे इन्टेस्टिव्हिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. राहुल पंडित यांची भेट घेऊन केंद्र स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
पाच लाखांपर्यंतचा खर्च
१) खासगी रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाचा खर्च २० ते २५ लाखांपर्यंत होतो; परंतु सेंट जॉर्ज रुग्णालयात जवळपास पाच लाखांपर्यंत यकृत प्रत्यारोपणाचा खर्च होऊ शकेल, असे सांगण्यात आले आहे. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डॉ. आकाश शुक्ला, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. रवी मोहंका हे रुग्णालयासाठी सहकार्य करणार आहेत.
२) पहिल्या टप्प्यात फक्त ‘कॅडेवर डोनेशन’ म्हणजेच मेंदूमृत रुग्णाचे अवयवदान करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासंदर्भात जनजागृती केली जाईल. शिवाय रुग्णालयाला ‘झेडटीसीसी’च्या परवानगीचीही प्रक्रिया करावी लागणार आहे. वैद्यकीय उपकरणे आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्यासाठी सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.