आयआयटी मुंबईत नवे संशोधन
सूर्याची ८७ टक्के उष्णता साठवून ठेवता येणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः सौरऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतानाही त्याचा अजूनही योग्य वापर होत नाही, त्यावर आता आयआयटी मुंबईने नवीन संशोधन समोर आणले आहे. सूर्याची उष्णता शोषून आणि साठवून ठेवण्याची मोठी क्षमता असलेले तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. झेंडूच्या फुलासारखी रचना असलेले एक मटेरिअल त्यांनी विकसित केले असून त्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशापैकी ८७ टक्के सूर्यप्रकाश शोषून घेऊन त्यातून उष्मा ऊर्जेत रूपांतर करण्याची किमया हे मटेरिअल करत असल्याचे संशोधक व आयआयटी मुंबईमधील रसायनशास्त्र विभागातील प्रा. सी. सुब्रमण्यम यांनी सांगितले.
सूर्यापासून मिळणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी काही अंशच आपण वापर करतो. त्यासाठी आयआयटी मुंबईतील संशोधकांनी सूर्याची उष्णता शोषून ती साठवून ठेवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. नॅनोस्ट्रक्चर्ड हार्ड-कार्बन फ्लोरेट्स (एनसीएफ) असे या पदार्थाचे नाव आहे. या अभ्यासातून संशोधकांनी दाखवून दिले आहे की एनसीएफचा उपयोग करून सामान्य तापमानाला असलेली हवा ६० डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम करता येते आणि कोणत्याही प्रकारचा धूर किंवा प्रदूषण न करता खोली, कोठी किंवा तत्सम जागा गरम करता येते. भरपूर सूर्यप्रकाश मिळणाऱ्या थंड हवेच्या प्रदेशात- उदाहरणार्थ, लेह आणि लडाख- याचा उपयोग विशेषतः इमारती गरम ठेवण्यासाठी होऊ शकतो, असे प्रा. सी. सुब्रमण्यम यांनी सांगितले.
कसा आहे हा पदार्थ
नॅनोस्ट्रक्चर्ड हार्ड-कार्बन फ्लोरेट्स (एनसीएफ) नावाच्या या पदार्थामध्ये सौर-उष्मा रूपांतराची अभूतपूर्व अशी ८७ टक्के कार्यक्षमता आढळली आहे. एनसीएफवर पडणाऱ्या अतिनील (अल्ट्रावायोलेट), दृश्य (व्हिसिबल) आणि अवरक्त (इन्फ्रारेड) प्रकाशातील ९७ टक्के प्रकाश शोषला जातो आणि त्याचे प्रभावीपणे उष्मा ऊर्जेत रूपांतर होते. ही ऊर्जा हवा किंवा पाणी गरम करायला वापरून त्याचे विविध व्यावहारिक उपयोग करता येतात.
एनसीएफ असे बनते
एनसीएफ हे प्रामुख्याने कार्बनचे बनलेले नवे मटेरियल तयार करण्यासाठी मोठा खर्च लागत नाही. शिवाय एनसीएफ पर्यावरणपूरक आणि वापरायला सोपे आहे. रासायनिक वायू निक्षेपण (केमिकल व्हेपर डेपोसिशन) नावाचे तंत्र वापरून अमॉर्फस डेंड्रायटिक फायब्रस नॅनोसिलिकाच्या अधःस्तरावर (सब्सट्रेट) कार्बन अणूंचा थर देऊन एनसीएफ तयार करता येते. हे लागणारे पदार्थ सहज उपलब्ध असतात आणि मोठ्या प्रमाणात एनसीएफ तयार करण्यासाठी हे तंत्र वापरता येऊ शकते. त्यामुळे याचे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक उत्पादन फारसे खर्च होणार नाही.
असे आहे पारंपरिक साधन
सूर्यप्रकाशाचे उष्णतेत रूपांतर करणारे पारंपरिक साधन आणि लेप (कोटिंग्स) क्रोमियम किंवा निकेलच्या फिल्म्सवर आधारित असतात. अॅनोडाइज्ड क्रोमियम एक जड धातू आहे आणि पर्यावरणासाठी विषाक्त (टॉक्सिक) असतो. क्रोमियम आणि निकेलच्या फिल्म्सची सोलार-थर्मल रूपांतरक्षमता ६० ते ७० टक्के दरम्यान असते. बाजारात उपलब्ध असलेले सर्वोत्तम कन्व्हर्टर्ससुद्धा ७० टक्के रूपांतरक्षमता दर्शवतात, असे एनसीएफ अभ्यासाच्या प्रमुख लेखिका डॉ. अनन्या साह यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.