सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : आरे दुग्ध वसाहतीमधील युनिट क्रमांक १६ मधील महापालिकेच्या शाळेचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. दोन सत्रांत चालणारी शाळा आता एका सत्रात करण्यात आली आहे. पालकांनी मात्र त्या बदलास विरोध केला आहे. त्यामुळे पालकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार असून बस सेवाही प्रभावित होण्याची भीती व्यक्त होत आहे. विद्यार्थी-पालकांच्या सोयीनुसार सकाळी ७ ते दुपारी १ दरम्यानच्या सत्रामध्ये शाळा सुरू ठेवण्याबाबत आदेश पारित करावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तीन दिवसांत द्यावा, असे निर्देश खासदार गजानन कीर्तिकर यांनी शाळा प्रशासनाला दिले आहेत.
आरे वसाहतीतील युनिट क्रमांक ४६ मध्ये बालवाडी ते दहावीची मराठी, हिंदी, तामिळ भाषिक शाळा आहे. येथे सुमारे १,५०० विद्यार्थी शिक्षण घेतात. आरे कॉलनी परिसर हा जंगलसदृश्य असल्यामुळे येथे बिबट्याचा देखील मुक्त संचार असतो. त्यामुळे पालकांना स्वतः शाळमध्ये मुलांना सोडावे लागते. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणे सोयीचे व्हावे, यासाठी बेस्ट प्रशासनाने सर्व पाड्यांमधून विद्यार्थ्यांची प्रवास सेवा सुरू ठेवली होती. आतापर्यंत सकाळ आणि दुपार असे दोन सत्रात विद्यार्थी वर्ग भरवण्यात येत होते. परंतु अचानक दोन्ही सत्र एकत्र करून सकाळी १०.३० ते सायंकाळ ४.३० असे वेळापत्रक प्रस्तावित आहे. यामुळे बससेवा उपलब्ध करून देणे बेस्ट व्यवस्थापनाला देखील शक्य नाही. परिणामी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात. स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर यांनी पालकांच्या नाराजीची दखल घेतली आहे.
…..
विद्यार्थी पटसंख्येत घट
‘राईट टू एज्युकेशन’ नियमानुसारे विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास व्हावा, यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. परंतु स्थानिक स्तरावर याबाबत योग्य ती पावले उचलली जात नाहीत. परिणामी मराठी शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अनेक शाळा बंद होत आहेत, अशी खंत कीर्तिकर यांनी व्यक्त केली.
.....................
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.