मुंबई, ता. १ : मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातील एम. ए. मराठी पदवी परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांस ‘राजकवी भा. रा. तांबे पुरस्कार’ दिला जाणार आहे. व्यवस्थापन परिषदेने केलेल्या ठरावानुसार चालू शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक वर्षी हा पुरस्कार सुनील तांबे, मेधा जोशी आणि अविनाश डिके यांनी दिलेल्या देणगीतून दिला जाणार आहे.
राजकवी तांबे यांचे नातू सुनील तांबे यांनी पुरस्कार सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे पुरस्कार समितीच्या वतीने मराठी विभागप्रमुख डॉ. विनोद कुमरे यांनी सांगितले. या पुरस्कारामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होईल व मराठी भाषेच्या अभ्यासाकडे चांगले विद्यार्थी आकर्षित होतील, असा आशावाद मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला असून पुरस्काराकरिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भा. रा. तांबे यांचा जन्म मध्य प्रदेशातील मुंगावली येथे झाला. शिक्षण मध्य प्रदेशात देवास येथे झाले. राजकवी तांबे यांनी ग्वाल्हेर संस्थानाच्या न्याय, शिक्षण, पोलिस विभागात अनेक पदांवर काम केले. त्यांनी मराठीबरोबरच संस्कृत, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषांत विपुल लिखाण केले. १९२६ मध्ये ते साहित्य अकादमी इंदूर येथे कविता विभागाचे अध्यक्ष होते. त्यांना साहित्याबरोबरच शास्त्रीय संगीताचे उत्तम ज्ञान होते. प्रतिभाशाली कवी तांबे यांना तत्कालीन ग्वाल्हेर नरेश रा. रा. सिंदिया यांनी राजकवी ही पदवी बहाल केली होती. त्यांनी अमराठी प्रांतात वास्तव्यास असूनही मराठी कविता लिहिली. ‘तांबे यांची समग्र कविता’ या संग्रहात त्यांच्या कविता समाविष्ट आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.