खारघर : खारघर, तळोजा वसाहतीमधील नागरिकांना मुंबई परिसरात विनाअडथळा जाता यावे, यासाठी सिडकोने नवी मुंबई पामबीच मार्ग कोस्टल रोडचा नियोजन केले आहे. या महत्त्वाकांशी प्रकल्पाच्या उभारणीसाठी गेल्या पाच वर्षांपासून सिडकोकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळाली नसल्याने हा प्रकल्प रखडला आहे.
खारघर, सेक्टर ३४ पासून स्पॅगेटी वसाहतीपर्यंत चार पदरी रस्ता उभारला आहे; तर सेक्टर १६ स्पॅगेटी वसाहत, सेक्टर दहा, खारघर स्थानक आणि सीबीडी सेक्टर अकरा खाडी किनाऱ्यावरून कोस्टल रोडसाठी सिडको प्रयत्नशील आहे. त्यासाठी तीन वर्षांपूर्वी निविदादेखील काढण्यात आली होती.
मात्र, या निविदेला विविध मोठ्या कंपन्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, खाडीलगत असलेल्या कांदळवनाच्या जागेतून हा रस्ता जाणार असल्याने केंद्रीय पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळवण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून सिडकोचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, अजूनही परवानगी मिळण्यास विलंब होत असल्यामुळे खारघर कोस्टल रोड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
परवानगीसाठी कागदपत्रांची पूर्तता
रस्त्याचा कामाला विलंब होत असल्यामुळे यासाठीचा खर्च तीनशे कोटीहून अधिक वाढणार आहे. शिवाय भविष्यातील वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता हा प्रकल्प रखडल्याने मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे कोस्टल रोडच्या निर्मितीसाठी सिडकोकडून प्रयत्न केले जात आहेत. याविषयी सिडको अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता अलिबाग कार्यालयात परवानगीसाठी लागणारे कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.
कोस्टल रोडमुळे होणारे फायदे
- कोस्टल रोडमुळे खारघर येथील स्पॅगेटी वसाहत मार्ग खारघर टोल नाका ते सीबीडी, नेरूळ, सानपाडा दरम्यान होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
- तळोजा-खारघर मधील नागरिकांना नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होणार आहे.
- खारघर ते सीबीडी सेक्टर अकरा खाडीकिनारा अंदाजे पाच किलोमीटर अंतरचा रस्ता कोस्टल रोड आहे.
- खारघर सीबीडी दरम्यान होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
नेरुळ, बेलापूर आणि खारघर शहराला जोडणारा कोस्टल रोडचा प्रकल्प सिडकोसाठी महत्त्वपूर्ण आहे. या मार्गामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. तसेच शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे.
- प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.