अलिबाग, ता.३ (बातमीदार)ः गेल्या आठ दिवसांपासून रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. कधी दमदार तर कधी रिमझिम पडणाऱ्या पावसाने अनेक भागात पाणी साचले होते. या पावसात अनेकांच्या घरांची पडझड झाली असून महाड, पेणमध्ये दरड कोसळल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला असून पावसामुळे वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.
यंदा पावसाचे उशिरा आगमन झाले असले तरी त्याची तीव्रता अधिक असल्याने रायगड जिल्ह्यात विविध दुर्घटनांची नोंद आहे. जिल्ह्यामध्ये २४ जूनपासून आत्तापर्यंत १६७ मिमि. पाऊस पडल्याची नोंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी रौद्ररूप धारण केले असून त्याचा फटका किनाऱ्यालगतच्या गावांना बसला आहे.
यात पेणमधील खाडीलगत असलेली सागरीवाडी, अष्टविनायकवाडी, विठठलवाडीतील ४७ कुटूंबांना तर पेणमधील दूरशेत येथील दरडग्रस्त गावातील सहा कुटुंबे, मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील दरडग्रस्त गावातील नऊ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. याचबरोबर आठ तालुक्यातील ४१ घरांचे नुकसान झाले असून अलिबागमधील पाच, म्हसळ्यातील २०, पनवेलमधील दोन, तळा व सुधागड मधील प्रत्येकी एक, उरणमधील दोन, महाडमधील तीन, रोहामधील सात घरांचे नुकसान झाले असून माणगाव तसेच म्हसळ्यातही वित्तहानीची नोंद आहे.
दोन नद्या इशारा पातळीवर
रोहा तालुक्यातील कुंडलिका, अंबा, महाडमधील सावित्री, पनवेलमधील पाताळगंगा, गाढी तर कर्जतमधील उल्हास या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. या नद्यांमध्ये सध्या पावसाचे पाणी वाढू लागले आहे. कुंडलिका नदीत सध्या २२.४० मीटर , पाताळगंगा नदीत १८.७० मीटर इतका जलसाठा असून इशारा पातळीच्या मार्गावर आहे.
- - - - - -
तालुका नदी आजची पातळी धोका पातळी
रोहा - कुंडलिका - २२ .४० २३.९५
रोहा - अंबा - ४.७० ९.००
महाड - सावित्री - ३.६० ६.५०
पनवेल - पाताळगंगा - १८.७० २१.५२
कर्जत - उल्हास - ४४.१० ४८.७७
पनवेल - गाढी - २.३० ६.५५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.