डासांकडे दुर्लक्ष महागात
२६२ जणांना कोर्टात खेचले ः मलेरिया आणि डेंगीच्या प्रसारास कारणीभूत साडेसात हजार मुंबईकरांना नोटीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः डेंगीचा फैलाव करणाऱ्या एडिस आणि मलेरियाच्या एनफोलीज डासांच्या उत्पत्तिस्थानांकडे दुर्लक्ष करणे मुंबईकरांना चांगलेच महागात पडले आहे. आतापर्यंत साडेसात हजार मुंबईकरांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून २६२ जणांना पालिकेने कोर्टात खेचले आहे. विशेष मोहिमेत सहा लाख ४१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे मुंबई पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख चेतन चौबळ यांनी सांगितले.
डेंगीच्या डासांचा फैलाव करणाऱ्या एडिस डासांची ३९ हजार ६६० ठिकाणे आढळली. मलेरियाचा फैलाव करणाऱ्या एनफोलीज डासांची ४,३३० उत्पत्तिस्थाने आढळल्याने तब्बल सात हजार ६९३ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या २६२ जणांना न्यायालयात खेचण्यात आले आहे. जानेवारी ते १५ जुलै २०२३ पर्यंत पालिकेच्या कीटकनाशक विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत ७३ लाख ५३ हजार ३९९ कंटेनर तपासणी करण्यात आली. ४३ हजार ९९० ठिकाणी डासांची उत्पत्तिस्थाने आढळल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाने जानेवारीपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत मलेरिया आणि डेंगीच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या उत्पत्तिस्थानांचा शोध घेत ती नष्ट करण्यात येत आहेत. लेप्टोच्या प्रसारास कारणीभूत ठरणारे उंदीरही मोठ्या प्रमाणात मारण्यात येत आहेत. जानेवारी ते १५ जुलैपर्यंत तब्बल तीन लाख १० हजार १८४ उंदीर मारण्यात आले, अशी माहिती पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख चेतन चौबळ यांनी दिली.
२६२ जणांना कोर्टात खेचले
१. मलेरियाचा फैलाव रोखण्यासाठी राबवलेल्या मोहिमेत एक लाख ९९ हजार ५९ कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यात एनफोलिज डासांचे ४,५६७ प्रकार आढळले. ४,३३० ठिकाणी डासांची उत्पत्तिस्थाने आढळून आली.
२. डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ७१ लाख ५४ हजार ३४० कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यात ४१ हजार ९७८ पॉझिटिव्ह आढळले. एडिस डासांची ३९ हजार ६६० उत्पत्तिस्थाने आढळून आली.
३. डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करा, अशी सूचना वारंवार करूनही दुर्लक्ष करणाऱ्या २६२ जणांना पालिकेने कोर्टात खेचले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.