आदिवासी समाज न्यायासाठी एकवटला
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
अलिबाग, ता. ९ (बातमीदार) ः रेशन दुकानात धान्य पाहिजे पैसे नको, गाव तिथे रस्ता झालाच पाहिजे, अशा अनेक मागण्यांसाठी अलिबागमध्ये बुधवारी आदिवासी समाज एकवटला होता. जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात शेकडो आदिवासी सहभागी झाले होते.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा भाजपचे दक्षिण विभागाचे उपाध्यक्ष दिलीप भोईर यांच्यासह मुकेश नाईक, कृष्णा पिंगळा धर्मा पिंगळा, भगवान नाईक, धर्मा लोभी आदी या वेळी उपस्थित होते. मोर्चात महिलांसह, तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. आदिवासी समाजाच्या न्याय हक्काची जाणीव घोषणाबाजीतून सरकारला करून देण्यात आली. खालापूर येथील इर्शाळवाडीतील दरडग्रस्ताचे पुनर्वसन करताना त्यांना चांगली घरे बांधून द्यावीत, मणिपूर येथे झालेल्या महिला अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
समान नागरी कायद्यामुळे आदिवासी समाजाला मिळणाऱ्या सुविधा बंद होणार आहेत. यात आदिवासी समाज भरडला जाण्याची भीती असल्याने हा कायदा रद्द करावा, वन हक्क कायद्यांतर्गत येणारा दावे तत्काळ मंजूर करावे, जात पडताळणी कार्यालय रायगड जिल्ह्यात सुरू करावे, आदिवासी वाड्यांकडे जाणारा रस्ता तयार करावे, आदिवासी वाड्यांना गावठाण जागेचा दर्जा मिळावा. त्या ठिकाणी रस्ते, पाणी, वीज सुविधा मिळाव्यात, ८१ आदिवासी वाड्यातील दरडप्रवण क्षेत्रात सुविधा उपलब्ध कराव्यात तसेच पुनर्वसन करण्यात आले अशा अनेक मागण्यांसाठी आदिवासी समाजाने मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
------------
पोयंजे वाडीत जागतिक आदिवासी दिन साजरा
रसायनी (बातमीदार) : पनवेल तालुक्यातील पोयंजे आदिवासी वाडीत जीवन विकास केंद्र, कोळखे आणि सेंटर फॉर सोशल ॲक्शन यांचे संयुक्त विद्यमाने आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात मुलींनी पारंपरिक नृत्य, गीत सादर केले. सेंटर फॉर सोशल अॅक्शनचे मनीष भालेराव यांनी, आदिवासी दिनाचे महत्त्व सांगितले.
जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका बबिता जाधव यांनी, आदिवासी आणि शिक्षणाचे महत्त्व तसेच महिलांनी मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी काय करावे, याची माहिती दिली. जीवन विकास केंद्राच्या दामिनी पाटील यांनी, बचत गट सक्षमीकरण आणि उपजीविकेबाबत मार्गदर्शन केले. तर आशा वर्कर्स वासंती चौधरी यांनी, महिलांचे आरोग्य आणि घ्यावयाची काळजीबाबत माहिती दिली. कार्यक्रमात ६० महिला आणि मुलींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका गायकर यांनी केले. कार्यक्रमानिमित्त महिलांना आधार कार्ड वाटप करण्यात आले.
रसायनी ः आदिवासी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
----------------------
मणिपूर घटनेचा निषेध करीत मोर्चा
नेरळ (बातमीदार) ः आदिवासी बहुल कर्जत तालुक्यात सहा वर्षांपासून ठाकूर-कातकरी आदिवासी संघटनेच्या वतीने आदिवासी दिनाचे आयोजन केले जाते. यावेळी रॅली काढून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. मात्र यंदा खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी दुर्घटना, मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आदिवासी दिवस साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नेरळ येथील कोतवालवाडीत बुधवारी सकाळी एकत्र येत आदिवासी बांधवांनी हुतात्मा स्तंभास मानवंदना दिली. त्यानंतर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास व नामफलकास पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर कर्जत मार्केट यार्ड येथे जमा होत इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या आदिवासी बांधवांना श्रद्धांजली अपर्ण केली.
आदिवासी बांधवांनी न्यायहक्कांसाठी एकत्र लढा येण्याची गरज आहे. आजही अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये पोहोचण्यासाठी रस्ता
नाही. आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे विश्वास यावेळी युवा नेते प्रसाद थोरवे यांनी व्यक्त केला. मोर्चा कर्जत विभागीय कार्यालयात धडकून शिष्टमंडळाने नायब तहसीलदार प्रसाद पाटील यांना निवेदन दिले. त्यानंतर आदिवासी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांना मणिपूर घटनेचा निषेध करत कारवाई करण्याची मागणी केली तसेच आदिवासी समाजाला भेडसावणाऱ्या प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.