गौराई माझी लाडाची...
आकर्षक मुखवटे, पारंपरिक दागिन्यांच्या खरेदीसाठी लगबग
शिवडी, ता. २० (बातमीदार) ः गणेशाच्या आगमनानंतर लगेचच भाद्रपद शुद्ध अष्टमीला घरोघरी वाजतगाजत येणाऱ्या गौराईचे आणि तिला सजविण्यासाठी लागणाऱ्या मंगळसूत्र, बांगड्या, नथ, मोत्यांच्या माळा, जोडवी अशा पारंपरिक दागिन्यांची खरेदी करण्यासाठी महिलांची एकच गर्दी मुंबईतील लालबाग, परळ आणि दादरच्या दुकानांमध्ये दिसत आहे.
समृद्धीच्या पावलांनी घराघरांत सुखाच्या राशी घेऊन येणाऱ्या गौराईचा गृहप्रवेश गुरुवारी (ता. २१) होणार असून शुक्रवारी (ता. २२) आई गौराईचे पूजन करण्यात येईल. त्यामुळे तिच्या स्वागताच्या तयारीची सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे. गौरीच्या आराशीसाठी विविध प्रकारचे मखर आणि आभूषणे दादर, लालबाग येथील बाजारात घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. सजावट केलेल्या रेडिमेड नववारी व सहावारी साडीत तसेच त्यांना शोभेल अशा पारंपरिक आभूषणाने नटलेल्या गौराई घेण्याची भाविकांची लगबग पाहायला मिळत आहे.
विशेष प्रकारचे मखर
गौराईच्या सजावटीसाठी विविध रंगांचे मखर बाजारात दाखल आहेत. त्यावर टिकल्या, हिरे, लटकन, कुंदन वर्क आणि विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या सौंदर्यात विशेष भर पडत आहे. वेलवेट, चमकी आणि नैसर्गिक रंगांचा वापर केला आहे. पर्यावरणपूरक मखर घेण्याकडे भाविकांचा ओढा आहे.
आकर्षक मुखवटे
गौरीचे आकर्षक, देखणे मुखवटे मुंबईतील लालबाग, परळ, दादरच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून यामध्ये चेहऱ्यापासून ते कमरेपर्यंतचे मुखवटे आहेत. त्याचबरोबर लाकडी व लोखंडी स्टँडच्या विविध डिझाईन्स बाजारात उपलब्ध आहेत. मुखवटे पाचशे रुपयांपासून ते साडेपाच हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. मुखवटे खरेदीसोबतच मंगळसूत्र, चपलाहार, मोत्याच्या माळा, जोडवी, बांगड्या, नथ अशा पारंपरिक दागिन्यांसह विविध साड्याही खरेदी केल्या जात आहेत.
पारंपरिक दागिने
गौरीसाठी इमिटेशन दागिन्यांची बाजारपेठ भरली आहे. ठिकठिकाणच्या मुख्य रस्त्यांवर दागिन्यांचे स्टॉल मांडले आहेत. मोत्यांचे शुभ्र दागिने, कोल्हापुरी साज, ठुशी, नथ अशा पारंपरिक दागिन्यांच्या खरेदीसाठी महिलांनी बाजारात गर्दी केली आहे. यंदा सिल्व्हर दागिन्यांचा ट्रेंड बाजारात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गौरीसाठी मोत्यांचे, फुलांचे हार आणि या हारांना मध्यभागी मोठे पदक, हिरव्या पानांचे हार आणि पदकाच्या जागी आंबा, सफरचंद, संत्री या फळांचे पदक असे नावीन्यपूर्ण हार बाजारात आले आहेत.
सुपांना मागणी
महत्त्वाचा मान म्हणून गौरीच्या पूजेसाठी सुपामध्ये ओवसा भरण्याची पद्धत आहे. यासाठी सूप खरेदी करण्यात येत असून २०० पासून ते ४०० रुपयांपर्यंत सुपांच्या आकार व दर्जानुसार किमती वाढत आहेत. विड्याची पाने, सुपारी, फुले, ओवसासाठी लागणारे बदाम, खारीक, खोबरे यांचीही बाजारपेठ बहरली आहे. फळे व फुलांचा बाजारदेखील तेजीत आहे.
असे आहे व्रत
गौराई अर्थात पार्वती मात्र अनेक भागांत तिला महालक्ष्मी असेदेखील म्हटले जाते. गौराईचे आगमन हा महिलांचा आवडता सोहळा असतो. घराची स्वच्छता करण्यापासून ते त्यांच्यासाठी वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची मेजवानी आणि रेखीव, कलाकुसरीच्या दागिन्यांची भेट देऊन महिला महालक्ष्मींचे स्वागत करतात. शेवटच्या क्षणापर्यंत महिलांचे सजावटीचे काम सुरू असते. नोकरदार स्त्रिया रात्री जागून जय्यत तयारी करतात. यंदाही घराघरांत महालक्ष्मींच्या स्वागतासाठी नावीन्यपूर्ण साहित्याची सजावट करण्यात आली आहे. गौरीच्या रूपाने सासुरवाशिणी लेकी माहेरी येतात, अशी धारणा आहे. काहींकडे खापराचे-पितळाचे मुखवटे तर काहींकडे धातूंचे, तसेच मातीच्या उभ्या अथवा पाटावर मांडलेल्या गौरी असतात. गौराईची तीन दिवस पूजा करून पंचपक्वान्नांचा नैवेद्य अर्पण केला जातो.
दरवर्षीप्रमाणे यंदाही घरी आई गौरीचे आगमन होणार आहे. तिच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. हा सोहळा आमच्यासाठी आनंदाचा सण घेऊन येतो, सामूहिक पद्धतीने गौराईची पूजा केली जाते. रात्री फुगड्या, गाणी गाऊन आई गौराईसाठी जागरण करण्यात येते. त्यामुळे घरात खूप आनंदाचे वातावरण असते.
- दीपा सागर भला, गृहिणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.