रात्रभर भक्तांचा मेळा
गणेशोत्सवाच्या अखेरच्या दोन दिवसांत अलोट गर्दीची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : गणेशोत्सवाला उधाण आले आहे. वाजतगाजत घरोघरी, मंडळांत विराजमान झालेल्या पाच आणि सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर मुंबईतील विविध सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मुंबईकरांसह ठाणे, नवी मुंबई, पालघर येथील भक्तांची गर्दी होत आहे. विशेष करून रात्री हे भाविक येथील मंडळांच्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहत आहेत. आता उत्सवाचे शेवटचे दोन दिवस राहिले असल्याने भक्तांच्या गर्दीला उधाण येणार असल्याचे सांगितले जात आहे.
चिंचपोकळी, करीरोड, ग्रँटरोड, परळ, लालबाग, खोताची वाडी या प्रमुख ठिकाणांसह विविध मंडळांचे मोठ्या उंचीचे गणपती आणि सजावट पाहण्यासाठी नागरिक रात्रभर गर्दी करत असून संपूर्ण कुटुंबे एकत्र येत दर्शन घेत आहेत. अनंत चतुर्दशीला दोन दिवस शिल्लक असल्याने शेवटची लोकल पकडूनही नागरिक प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. गर्दीत लांबच्या लांब रांगेत उभे राहून गणेशभक्त बाप्पाचे दर्शन घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
रेल्वे स्थानकांवर जत्रा
दिवसभर कामाने थकलेले मुंबईकर संपूर्ण रात्र गणेशाचे दर्शन घेत आहेत. त्यामुळे मुंबईतील काही ठराविक स्थानकांना जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. चिंचपोकळी, करीरोड, परळ, चर्नीरोड, ग्रँटरोड या स्थानकात दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस लोकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. गणेशाच्या जयघोषणा, नारे, भाविकांची गर्दी, अशा भक्तिमय वातावरणात सध्या मुंबईकर दंग झाले आहेत. शिवाय, रस्त्यांवर खाण्या-पिण्याचीही रेलचेल असल्याने मुंबई भ्रमंतीसह खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला जातो.
मध्यरात्री विशेष ट्रेन
गणेशभक्तांची वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वेने विशेष सोय केली असून अनंत चतुर्दशीनिमित्त १० उपनगरीय विशेष रेल्वे सेवेची सुविधा केली आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी मध्यरात्री सीएसएमटी-कल्याण/ठाणे/बेलापूर स्थानकांदरम्यान १० उपनगरीय विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत या लोकलची सुविधा असेल.
- प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
आमचा १० ते १२ जणांचा ग्रुप आहे. कोकणातल्या घरगुती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर दोन दिवसांपासून रात्रभर मुंबईतील वेगवेगळे बाप्पा पाहण्यासाठी आम्ही जात आहोत. रात्री सुरक्षित वातावरणात गणेशाचे दर्शन होते. गर्दी असल्याने आम्ही सर्व रात्री १२ वाजल्यानंतर प्रवास सुरू करतो.
- पल्लवी अनंत कणेरी, गणेशभक्त
कुटुंबासह रात्री गणेशाच्या दर्शनासाठी मुंबई फिरणे ही औरच मजा आहे. काम करून थकलो, तरी रात्रभर आम्ही कुटुंबीय एकत्र येत देवदर्शनाला जातो.
- शिवाजी तोडकर, भाविक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.