सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : पनवेलजवळ शनिवारी (ता. ३०) झालेल्या मालगाडी अपघातानंतर रेल्वे रद्दची उद्घोषणा करता आली असती, पण रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे कोकणी माणसाला चक्क १२ ते १५ तास रेल्वेमध्ये हाल काढावे लागले. केंद्र आणि राज्य सरकार कोकणी जनतेला गृहीत धरत आहे का, असा खरमरीत सवाल ठाणे भाजपचे माजी उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नीलेश चव्हाण यांनी रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विचारून घरचाच अहेर दिला आहे.
शनिवारी पनवेल ते कळंबोलीदरम्यान मालगाडीचा अपघात झाला. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर हा अपघात झाला. त्यामुळे रुळावरून मालगाडी हटवण्यासाठी किती वेळ लागू शकतो याचा अंदाज रेल्वे प्रशासनाला यायला हवा होता. जर जास्त वेळ लागणार आहे हे माहीत होते, तर मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गाड्या सोडून त्या दिवा परिसरात चक्क १२ ते १४ तास उभ्या ठेवण्यात आल्या. हा गंभीर प्रकार असून कोकणी जनतेच्या सहनशीलतेचा अंत रेल्वे प्रशासन पाहत होत का, असेही नीलेश चव्हाण यांनी म्हटले आहे. अपघातामुळे मेल गाड्या रद्द केल्याची उद्घोषणा किंवा गाड्या जास्त वेळ थांबणार आहेत याची उद्घोषणा झाली असती तर प्रवाशांनी आधीच घरचा रस्ता अन्य मार्गाने पकडला असता, असेही चव्हाण यांनी म्हटले.
------------
खडतर प्रवास कधी संपणार?
मुळात रेल्वे प्रशासनाने वेळेवर उद्घोषणा करून लोकांना वेळीच सावध केले असते तर लोकांवर अन्न-पाण्याशिवाय १२ ते १४ तास स्थानकात ताटकळण्याची वेळ आली नसती व त्यांच्या संयमाचा बांध फुटला नसता. रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार व मुंबई-गोवा महामार्गाचे मंदगतीने चाललेले काम पाहता केंद्र आणि राज्य सरकार कोकणी जनतेला गृहीत धरत आहेत असेच वाटते, असे नीलेश चव्हाण यांनी म्हटले आहे. कोकणी माणसाचा खडतर प्रवास कधी संपणार, असा प्रश्नही चव्हाण यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे विचारला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.