बोरिवली-गोराईदरम्यान रो-रो धावणार
पर्यटकांना दिलासा; जेट्टीचे काम लवकरच
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : कमी कालावधीत मुंबई ते मांडवादरम्यान चालणारी रो-रो बोट लोकप्रिय झाल्यानंतर आता बोरिवली ते गोराईदरम्यान ही सेवा सुरू होणार आहे. सागरी महामंडळाने बोरिवलीला रो-रो जेट्टी उभारण्याचे काम सुरू केले होते. मात्र, वन विभागाच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाची अनुमती मिळाली नव्हती. आता सागरी महामंडळाने सर्व प्रकारची औपचारिकता पूर्ण केली आहे. त्यामुळे लवकरच जेट्टीचे काम सुरू होणार असून या सेवेमुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रो-रो सेवा सुरू झाल्यावर बोरिवलीवरून गोराई आणि मिरा-भाईंदरला जाणाऱ्या प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. तसेच गोराई बीच आणि विश्व विपश्यना पॅगोडाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पश्चिम उपनगरातील वाहतूक ‘कोंडीमुक्त’ करण्यासाठी महाराष्ट्र सागरी महामंडळाने गोराई आणि बोरिवली (पश्चिम) आणि ठाण्यातील घोडबंदरदरम्यान फेरी सेवेसाठी तीन जेट्टी बांधण्यात येणार आहेत. बोरिवली येथील प्रस्तावित रो-रो जेट्टीचे काम सुरू करण्यात आले होते. याशिवाय घोडबंदर येथे प्रस्तावित प्रवासी जेट्टी सेवा आणि मनोरी येथे तिसरी प्रस्तावित रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) जेट्टीमुळे मुंबई शहर आणि उपनगरांसाठी शाश्वत जलवाहतूक व्यवस्थेसाठी विकसित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
वन विभागाकडून हिरवा कंदील
वन विभागाच्या पहिल्या टप्प्याची मंजुरी मिळाल्यानंतर बोरिवली येथील प्रस्तावित रोरो- जेट्टीचे काम सुरू झाले होते. मात्र, वन विभागाच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाची अजून अनुमती मिळाली नसल्याने सागरी मंडळाला बोरिवली रो-रो जेट्टीचे काम थांबवावे लागले होते. आता वन विभागाच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्व प्रकारची औपचारिकता सागरी महामंडळाने पूर्ण केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात येत्या काही महिन्यांत बोरिवली येथील रो-रो जेट्टीचे काम सुरू होणार असल्याची माहिती सागरी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
वेळेची होणार बचत
निसर्गाने बहरलेल्या गोराईचे सौंदर्य आणि विश्व विपश्यना पॅगोडा (ग्लोबल विपश्यना पॅगोडा) बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. तसेच बोरिवली ते गोराई आणि बोरिवली ते मिरा-भाईंदर प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. रस्ते मार्गाने बोरिवलीवरून विश्व विपश्यना पॅगोडा हे अंतर २८ किलोमीटर आहे. साधरणतः १ तास २० मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागतोय. तसेच बोरिवली ते गोराई रस्ते मार्गाचे अंतर २५ किलोमीटर असून १ तास ५ मिनिटे लागतात. मात्र, जलवाहतुकीमुळे हे अंतर अवघ्या काही मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे सागरी महामंडळाने बोरिवली ते गोराई रो-रो बोट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
समुद्र, खाडी आणि नद्या जोडण्यावर भर
मुंबई आणि उपनगरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी व प्रदूषण टाळण्यासाठी समुद्र, खाडी आणि नद्या जोडून जलवाहतूक सुरू करण्यावर भर देत आहे. काही महिन्यांपूर्वीच ठाणे व वसई खाडी, उल्हास नदीला जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मार्गावर एकूण आठ जेट्टी उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी काळात दक्षिण मुंबई ते कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि वसईवरून जलमार्गाने प्रवास करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन पूर्ण झाले असून, जेट्टी उभारण्यासाठी सुधारित निविदा तयार झालेल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.