लठ्ठपणाचे मूल्यांकन ठरवणार शस्त्रक्रियेची गरज
देशभरातील तज्ज्ञांनी केला अभ्यास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : आता लठ्ठपणाने ग्रस्त नागरिकांना शस्त्रक्रियेची गरज आहे की नाही ते ठरवता येणार आहे. बॅरियाट्रिक सर्जन्स या दिशेने पावले उचलत आहेत. कोणाला शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे हे निर्धारित करण्यासाठी डॉक्टर मूल्यांकन ठरवत आहेत. आतापर्यंत लठ्ठपणाचे मूल्यमापन शरीराची उंची आणि वजनाच्या आधारे करत होते, पण आता त्यात मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजारांचा समावेश करण्यावर बेरिएट्रिक सर्जनने भर दिला आहे. या आधारावर सर्जन्सनी एका सर्वेक्षणात शस्त्रक्रियेसाठी मूल्यांकन ठरवले आहेत.
मुंबईसह देशातील आघाडीच्या बॅरिअॅट्रिक सर्जन्सनी एकत्रितपणे लठ्ठपणाबाबत अनोखे सर्वेक्षण केले आहे. लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या १,०४६ रुग्णांचा यामध्ये समावेश करण्यात आला. हे सर्वेक्षण नुकतेच ‘डायबेटिस अँड ओबेसिटी इंटरनॅशनल जर्नल’मध्येही प्रसिद्ध झाले आहे.
या तज्ज्ञांचा समावेश
मुंबई येथील डॉ. अपर्णा गोविल भास्कर, नवी दिल्लीचे डॉ. अतुल एन. सी. पीटर्स, जालंधरचे डॉ. जी.एस. जम्मू, अहमदाबादचे डॉ. मनीष खेतान, चेन्नईचे डॉ. राज पलानिप्पन, पुण्याचे डॉ. शशांक एस. शाह, बेंगळूरुचे डॉ. शिवराम एच.व्ही. आणि कोईम्बतूरचे डॉ. प्रवीण राज यांनी हे सर्वेक्षण केले आहे.
असे होत आहे मूल्यांकन
बेरिएट्रिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितले, की लठ्ठपणाच्या उपचारांसाठी मूल्यांकनात केवळ वजन आणि बॉडी मास इंडेक्सच (बीएमआय) नाही, तर लठ्ठपणाशी संबंधित आजारांचाही समावेश करणे महत्त्वाचे आहे. वय, बीएमआय, शारीरिक मर्यादा, रोगांची उपस्थिती, जीवनाची गुणवत्ता, मानसिक आरोग्य, यांत्रिक आणि अनुवांशिक घटक यांसारख्या जोखीम घटकांच्या विस्तृत श्रेणीचा वापर करून गुण विकसित केले गेले.
नागरिकही करू शकतील मूल्यांकन
एक स्कोअर असलेले लोक आहार किंवा औषधांच्या आधारे लठ्ठपणा कमी करू शकतात; तर दोनपेक्षा जास्त स्कोअर असलेल्या व्यक्तीने शस्त्रक्रियेचा मार्ग निवडला पाहिजे. या स्कोअरचा वापर करून आरोग्य सेवा संस्थांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधने तयार केली पाहिजेत, ज्याद्वारे नागरिकदेखील शस्त्रक्रियेसाठी त्यांच्या लठ्ठपणाचे मूल्यांकन करू शकतील.
६६ टक्के लोकांना शस्त्रक्रियेची गरज
या सर्वेक्षणात १५ ते ९७ वयोगटादरम्यानच्या ६३९ महिला आणि ४०७ पुरुष सहभागी झाले होते. यासाठी ६६.६३ टक्के रुग्णांवर बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेची गरज असल्याचे आढळून आले; याशिवाय ६.९ टक्के रुग्णांसाठी आहार आणि व्यायाम तसेच ४.६ टक्के रुग्णांसाठी फार्माकोथेरपी आवश्यक होती.
लठ्ठपणाचे प्रमाण वाढणार
भारतातील लठ्ठपणाचे प्रमाण चिंताजनक आहे. सर्वेक्षणानुसार २०४० पर्यंत लठ्ठपणाचे प्रमाण पुरुषांमध्ये ९.५ टक्के आणि महिलांमध्ये १३.९ टक्के होईल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
लठ्ठपणामुळे होणारे आजार
हृदयरोग
टाईप २ मधुमेह
कर्करोग
स्लीप एपनिया
वंध्यत्व
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२१
लठ्ठपणाचे प्रमाण
६.४ टक्के महिला
४.० टक्के पुरुष
९.४ टक्के पाच वर्षांखालील मुले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.