डोंबिवली, ता. २१ : शहर स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली शहरासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहरातील रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचबरोबर पर्यावरणाचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता अभियान महापालिकेच्या सर्व प्रभाग क्षेत्र परिसरात टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी (ता. १९) ''फ'' प्रभाग क्षेत्रात श्री गणेश मंदिर संस्थान येथून या अभियानाची सुरुवात झाली. शहरातील दहा प्रमुख रस्त्यांवर ही डीप क्लिनिंग मोहीम राबवण्यात आली. या डीप क्लिनिंग मोहिमेत फ प्रभाग क्षेत्रातील मुख्य रस्ते महापालिका स्वच्छता कर्मचारी व २०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केले. रस्ते, फूटपाथ, डिव्हायडर आदी ठिकाणी तीन टँकर पाण्याने स्वच्छ धुतले. मागील तीन आठवड्यात दर शुक्रवारी विविध प्रभागात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत २६१ मेट्रिक टन कचरा, धूळ आणि डेब्रिज जमा केली आहे.
तत्पूर्वी राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील मुख्य ४३ मंदिरांपैकी २२ मंदिर परिसर आणि मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांची सफाई महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली. या स्वच्छ तीर्थ अभियानात ट्रिपल आर केंद्रे स्थापित केली. तसेच मंदिरात पूजास्वरूप येणारे निर्माल्य आणि वस्तूंचे संकलन केले. मंदिर परिसरात निर्माल्य कलशांची व्यवस्था, प्लास्टिक बंदी आणि मंदिर परिसर स्वच्छता याविषयी जनजागृती करण्यात आली. प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक, नागरिक, शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी, सेवाभावी संस्था, महिला बचत गटांना यात सहभागी करून घेतले. या मोहिमेअंतर्गत सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळांची स्वच्छता केली असून या सर्व कामांची जबाबदारी सर्व सहायक आयुक्त आणि स्वच्छता अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली होती.
माजी पालिका सदस्य मंदार हळबे, राहुल दामले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, उपायुक्त धैर्यशील जाधव, फ प्रभागाचे सहायक आयुक्त चंद्रकांत जगताप, श्री गणेश मंदिर संस्थानचे सचिव प्रवीण दुधे, विवेकानंद फाऊंडेशनचे अनिल मोकल, ऊर्जा फाऊंडेशनच्या मेधा गोखले, श्री लक्ष्मीनारायण संस्थेच्या सुरेखा जोशी, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, उपमुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र खैरे, सर्व स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, महापालिका स्वच्छता कर्मचारी व कंत्राटदार यांचे कर्मचारी यांच्या सहभागाने मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.
धूळशमन वाहनांमार्फत फवारणी
शुक्रवारी दिवसभरात फ प्रभाग क्षेत्रातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सफाईची साधने, वाहतूक यंत्रणा, पाण्याचे टँकर, दोन धूळशमन वाहने या यंत्रणेमार्फत प्रभागातील १० मुख्य रस्त्यांवर स्वच्छता केली. हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी दोन धूळशमन वाहनांमार्फत पाणीफवारणी व तीन टँकरद्वारे रस्ते स्वच्छ पाण्याने धुतले. या मोहिमेत स्थानिक महापालिका सदस्य, नागरिक, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे, मंदिर व्यवस्थापन समिती सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला.
नागरिकांकडून मोहिमेला हरताळ
कचराप्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिकेकडून ओला-सुका कचरा वर्गीकरण, बायोगॅस प्रकल्प, खत प्रकल्प, प्लास्टिक बंदी अशा अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर रस्त्याच्या मधील दुभाजक आणि भिंती रंगकाम आणि आकर्षक चित्रे रेखाटून सुशोभित केल्या होत्या. अस्वच्छ शहराचा शिक्का पुसून काढण्यासाठी पालिकेने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र त्याला अनेकदा नागरिकांची साथ मिळत नाही. अनेक नागरिक या भिंतीवर आणि दुभाजकावर थुंकतात. तसेच रस्त्यावर कचरा टाकून घाण केल्याने तत्कालीन पालिका आयुक्तांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती.
अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी दौरा
कल्याण, डोंबिवली शहरांत नियमित घनकचरा विभागाकडून शहराचा प्रत्येक कोपरा साफ केला जातो की नाही, याची पाहणी करण्यासाठी नुकतीच अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी कल्याण शहराचा दुचाकीवरून पाहणी दौरा केला. यावेळी घनकचरा विभागाचे अधिकारी त्यांच्या सोबत होते. कल्याण, डोंबिवली शहरे कचरामुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहिमा सुरू आहेत. कल्याण शहराच्या वसंत व्हॅली, मोहन अल्टिझा, विद्यापीठ रस्ता, गोदरेज हिल रस्ता, जेल रस्ता, बिर्ला महाविद्यालय रस्ता भागाची पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.