Thane News: पाण्याचे ९५ टक्के नमुने हे पिण्यायोग्य असावेत असा मानक आहे. या मापदंडात ठाणे महापालिका सपशेल अपयशी ठरल्याचे समोर आले आहे. पालिकेकडून घराघरांत पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सलग दुसऱ्या वर्षी घसरली आहे.
पाणी विभागातून वितरित होणारे पाणी ९३ टक्के, तर साठवण टाक्यांमधून पुरवठा होणारे पाणी ८४ टक्के शुद्ध असल्याचा अहवाल खुद्द ठाणे पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रसिद्ध केला आहे. धक्कादायक म्हणजे विकासात भरारी मारणारी पालिका ठाणेकरांना शुद्ध पाणी देण्यात तब्बल पाच वर्षे बॅकफूटवर गेली आहे.
ठाणे महालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळातून दरवर्षी वार्षिक अहवाल प्रसिद्ध होतो. या अहवालात प्रथमदर्शनी सर्वकाही आलबेल असल्याचे दाखवण्यात आले आहे; मात्र त्याचवेळी पाण्याच्या शुद्धतेबाबतचा अहवाल तितकासा चांगला नसल्याचे दिसून आले आहे.
दरवर्षीप्रमाणे ठाणे महपालिकेने पिण्याच्या पण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध ठिकाणाहून पण्याचे नमुने घेऊन चाचण्या केल्या. २०२२- २३ मध्ये वितरण प्रणालीच्या पाण्याचे १३ हजार २४ पैकी ९३ टक्के पाण्याचे नमुने पिण्यायोग्य व ७ टक्के नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे आढळले.
आरोग्य विभागाद्वारे साठवणूक केलेल्या पाण्याचे नुमने तपासले असता २६,७९६ नमुने पिण्यायोग्य आढळले व १६ टक्के नमुने पिण्यास अयोग्य आढळले. पिण्याच्या पाण्याचे ९५ टक्के नमुने हे पिण्यायोग्य असावेत असा मानक आहे.
मात्र या निकषाची पूर्तता करण्यास ठाणे पालिकेला अपयश आल्याने या मानकाचा उल्लेख अहवालात करणे प्रशासनाने टाळले असल्याचे दिसले. २०२० ते २०२३ पर्यंतचा पाणी अहवाल तपासला असता हे शुद्धतेचे प्रमाण तीन टक्क्यांनी घटले आहे.
पाण्याचे वितरण
ठाणे महापालिका हद्दीत सुमारे ५८५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी २५० दशलक्ष लिटर पाणी ठाणे महापालिकेतर्फे; तर ३३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मुंबई महापालिका, एमआयडीसी आणि स्टेमकडून होतो.
हे पाणी टेमघर येथील केंद्रात प्रक्रिया करून ते जलकुंभात साठवले जाते. ७८० किमी लांबीच्या जलवाहिन्यांतून हे पाणी शहरातील प्रत्येक घरी पोहचावे, यासाठी शहराची तीन मुख्य विभागात ४४ ठिकाणी विभागणी केली आहे. सुमारे ७१ जलकुंभात हे पाणी साठवण्यात येते. या साठवण टाक्यांसह शहरातील ठिकठिकाणच्या पाण्याची गुणवत्ता दरवर्षी तपासली जाते.
२०१७- १८ मध्ये पाण्याची गुणवत्ता ९३ टक्के होती. ती २०२०- २०२१ ला ९६ टक्क्यांवर पोहचली. त्यानंतर २०२१- २२ ला पुन्हा त्यात घसरण होत ९५ टक्के झाली; पण २०२२- २३ मध्ये ही शुद्धता पुन्हा घसरली आहे.
वितरण प्रणालीचा अहवाल
वर्ष एकूण नमुने पिण्यायोग्य पिण्यास अयोग्य गुणवत्ता
२०२०- २१ १४,३०५ १३,७५५ ६२० ९६ टक्के
२०२१- २२ १४,९०३ १४,११७ ७८६ ९५ टक्के
२०२२- २३ १३,०२४ १२,०९९ ९२५ ९३ टक्के
साठवण टाक्यांमधील अहवाल
वर्ष एकूण नमुने पिण्यायोग्य पिण्यास अयोग्य गुणवत्ता
२०२०- २१ १४,१७६ ११,९७२ २,२०४ ८४ टक्के
२०२१- २२ २४,११० १९,६७० ४,४४० ८३ टक्के
२०२२- २३ २६,७९६ २२,४४२ ४,३५४ ८४ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.