तुर्भे : नवी मुंबई महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमाची वाटचाल सध्या पर्यावरणपूरक वाहतुकीकडे सुरू आहे. त्यानुसार इलेक्ट्रिकल वाहनांसाठी वाहन चार्जिंग स्टेशन उभारले जात आहेत.
यानुसार तुर्भे, घणसोली आगारात इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन उभारल्या नंतर आत्ता नेरूळ आणि वाशीमध्ये ही इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली असून ती कार्यान्वितही झाली आहेत. त्यामुळे परिवहनच्या इलेक्ट्रिकल बसेससाठी चार्जिंगचे इतर पर्याय ही उपलब्ध झाले आहेत.
पर्यावरण पूरक प्रवासासाठी सीएनजी बसेस नंतर एनएमएमटीच्या वतीने इलेक्ट्रिकल बसेस खरेदी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. बहुतांशी प्रवासी मार्गांवर पर्यावरणपूरक इलेक्ट्रिकल बसेस अधिक प्रमाणात धावताना दिसत आहेत.
मात्र या बसेससाठी चार्जिंग स्टेशनची पुरेशी व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने तुर्भे बस आगार येथील चार्जिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नंतर घणसोली बस आगारातील चार्जिंग स्टेशन ही सुरू करण्यात आले होते.
मात्र या दोन आगारातील चार्जिंगच्या सुविधा बसेसच्या मानाने कमी पडत असल्याने, इतर ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणे गरजेचे होते. त्यामुळे एनएमएमटीच्या वतीने शहरात २१ ठिकाणी पॉवरग्रीडच्या सहाय्याने चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी झाला होता.
मात्र पॉवरग्रीडकडून अजून हे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने या २१ चार्जिंग स्टेशनचा विषय मागे पडला आहे. मात्र सध्याची गरज लक्षात घेता एनएमएमटीच्या वतीने नेरूळ आणि वाशीमध्ये दोन स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत.
नेरूळ सेक्टर तीन आणि वाशी रेल्वे स्थानकातील बस डेपोमध्ये सध्या या इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. येथे सध्या एनएमएमटीच्या बसेसना चार्जिंग करण्याची सुविधा आहे. मात्र त्याच बरोबर याठिकाणी इतर व्यावसायिक बसेसनांही चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिवहनने आराखडा तयार केला आहे.
ऐरोली बस डेपोमधेही इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ठेकेदाराला काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हे इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन सुरू होईल असा विश्वास परिवहनने व्यक्त केला आहे.
परिवहनच्या ताफ्यात सध्या १८० इलेक्ट्रिकल बसेस आहेत. शिवाय आणखी ५० बसेस येण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच त्या ५० बसेस परिवहनमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर आणखी २५ बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बसेसची एकूण संख्या २५५ इतकी होणार आहे.
एनएमएमटी परिवहनकडून पॉवरग्रीडच्या माध्यमातून शहरात २१ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार होती. या माध्यमातून एकूण १८० चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध होणार आहेत. मात्र ही चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम काही कारणास्तव रखडले आहे. ती पूर्ण झाली कि खासगी वाहनांना देखील चार्जिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.
शहरातील अनेक चार्जिंग स्टेशनच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. सध्या नेरूळ आणि वाशीत नव्याने चार्जिंग स्टेशन सुरू झाली आहेत.
-योगेश कडुसकर, परिवहन व्यवस्थापक एनएमएमटी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.