Maharashtra Politics: वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर झाल्यानंतर पुन्हा एकदा किमान समान कार्यक्रम तयार करायचा असे ठरले खरे, पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील या समितीची अद्याप एकही बैठक झाली नसल्याचे समजते.
आठ दिवसांत किमान समान कार्यक्रम निश्चित होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले होते. त्यातील तीन दिवस आता संपले आहेत. या समितीत कोण काम करणार ते विचारले असता ते अध्यक्षच सांगू शकतील, असे उत्तर मिळाले. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्याने या आघाडीत सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत दिल्लीत गेले असल्याने एकत्र बांधणारा घटक सध्या वेगळ्या कामात व्यग्र झाला आहे.
वंचितला दोन किंवा फार तर तीन जागा देण्याची तयारी आहे. हा आकडा त्यांना पटणारा नाही. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने ‘मोदी आम्ही तुमचे शत्रू कधीच नव्हतो, तुम्ही आम्हाला दूर ढकललेत’ हे विधान ‘एक्स’वर केले. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ही पोस्ट उचलून व्हायरल केली आहे. काँग्रेससमवेत सेना राहणार का, असा प्रश्न आज काँग्रेस वर्तुळात केला जात होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे दोघेही संसद कामकाजात आहेत. पंतप्रधान मोदी यांनी फार तर १०० ते १२५ दिवसांत आमचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येईल असे विधान केले. त्यातच ‘मविआ’तील सामसूम हा घटक पक्षांच्या चिंतेचा विषय ठरला आहे. किमान समान कार्यक्रमासंदर्भात काँग्रेस नेत्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
राज्यसभेच्या निवडणुकीत या वेळी काँग्रेसची मते फुटू नयेत या काळजीने नेत्यांना घेरले आहे. पक्षाची पडझड थांबवण्यात आजवर यशस्वी झालो असलो, तरी पुढे तसेच सगळे एकत्र राहतील अन् चांगले घडेल काय, याबद्दल बडे नेतेही काहीशी चिंता व्यक्त करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.