बोईसर, ता. १९ : पंधरा किमी अंतर असलेल्या चिल्हार-बोईसर रस्त्यावर सुरक्षित उपाययोजनांचा अभाव आहे. मालवाहू अवजड वाहनांची बेशिस्त वाहतूक व अतिवेग, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेकायदा पार्किंग, अनेक ठिकाणी खड्डेमय व असमतल असलेला रस्ता, चुकीचे दुभाजक, अनधिकृत कट, अपघातप्रवण जागांवर पथदिव्यांची कमतरता, धोकादायक वळणे यामुळे लहान वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
वारांगडे येथील विराज कंपनीसमोरील वळण, तर सर्वाधिक धोकादायक अपघातप्रवण मानले जाते. तेथे टाकण्यात आलेल्या सहा गतिरोधकांपैकी तीन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नसल्याने हटवण्यात आले आहेत. त्यामुळे भरधाव येणार्या अवजड वाहनांवर नियंत्रण नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने सुरक्षिततेसाठी संबंधित प्रशासनाने योग्य पावले उचलण्याची मागणी होत आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणारा चिल्हार-बोईसर रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर २० जणांचा अपघाती बळी गेला असून, ३० पेक्षा अधिक जण गंभीर झाले आहेत. या रस्त्यावरून तारापूर एमआयडीसी, अणुऊर्जा प्रकल्प, बीएआरसीसारख्या मोठ्या प्रकल्पात कामासाठी रोज हजारो कामगार दैनंदिन प्रवास करत असतात.
आधी दुपदरी असलेला हा रस्ता चौपदरी झाल्यापासून अवजड वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. येथून डम्पर, हायवासारख्या अवजड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गौणखनिज भरून वाहतूक केली जाते. यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक नियमांची पायमल्ली करून भरधाव वाहतूक होते.
पालघर जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणार्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षित उपाययोजना आखण्यासाठी कळवले आहे.
तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बोईसर-चिल्हार रस्त्यावर विराजजवळ अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनीमार्फत प्रशिक्षित मनुष्यबळ नेमण्यात यावे किंवा कंपनीचे सध्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून ते इतर जागी स्थलांतरीत करण्याची मागणी होत आहे.
चिल्हार-बोईसर रस्त्यावरील वारांगडे येथील विराज कंपनीसमोरील वळण सर्वाधिक धोकादायक अपघातप्रवण मानले जायचे. या ठिकाणी भरधाव वाहने अनियंत्रित होऊन वारंवार अपघात होत असतात.
हे अपघात रोखण्यासाठी एमआयडीसी व वाहतूक शाखेच्या माध्यमातून कंपनीच्या आवारातून चिल्हार-बोईसर या मुख्य रस्त्यावर गतिरोधक टाकले होते. तेव्हापासून अपघात झाले नाही. मात्र, हे गतिरोधक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नसल्याने ते तातडीने हटवण्यात आल्याने सद्यस्थितीत तेथे तीनच आहेत.
अपघातांची प्रमुख कारणे
* वाहनांचा मर्यादेपेक्षा अधिक वेग
* बेशिस्त वाहतूक
* रस्त्याची असमतल बांधणी
* निकृष्ट दर्जाचे व चुकीची आखणी असलेले दुभाजक
* रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी-झुडुपे
* अपघातप्रवण जागी असलेले क्रॉसिंग व कट
* हायमास्ट व पथदिव्यांची कमतरता
* धोकादायक वळणे
* साईडपट्टीचा अभाव
* रस्त्यावर सांडणारे बारीक खडी, रेती गौणखनिज
अपघात टाळण्यासाठी एमआयडीसी व वाहतूक शाखेच्या माध्यमातून वारंगडे येथील धोकादायक वळणाजवळ गतिरोधक टाकल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अपघात झाला नव्हता.
मात्र, काही लोकांनी या गतिरोधकांविरोधात वरिष्ठ पातळीवर तक्रार करून ती हटवण्याची मागणी केली. नाईलाजास्तव एमआयडीसीकडून गतिरोधक काहीसे कमी केले आहे. मात्र, महिन्याभरापासून पुन्हा अपघात होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे तक्रारदारांविरोधात आंदोलन छेडले जाईल.
बोईसर-चिल्हार राज्य मार्गावर ग्रामीण भागातून बोईसरकडे मोठ्या प्रमाणात खडी, डबर, आरएमसी सिमेंटमिश्रित खडी इत्यादी वाहतूक होत असते. त्यामुळे रस्त्यावर हा माल पडत जात असतो.
चढणीच्या ठिकाणी म्हणजेच गुंदले वाघोबा खिंडीत हा माल मोठ्या प्रमाणात पडलेला असतो. दुचाकी नेहमी घसरून पडत असतात. यात मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते.
वाहतूक करणाऱ्या मालकांसोबत वारंवार चर्चा करूनही त्यांच्यामार्फत काहीही उपाययोजना होत नाही. वाहतूकदारांनी गाडीतून माल पडणार नाही, याची काळजी घ्यावी; अन्यथा अशा वाहनांना नागरिकांकडून अडवण्यात येईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.